हिंगोलीः हिंगोली जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्या टक्केवारीच्या वादावरून चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. भरबैठकीतच दोघांनी असंवैधानिक शब्दांचा वापर करत एकमेकांना शिवीगाळ केली. ‘निधीवाटपात टक्केवारीचे शेण कुणी खाल्ले?’ असा थेट सवाल खा. पाटील यांनी केल्यामुळे पेटलेला वाद थांबण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे अखेर खा. पाटील यांचा माइक म्यूट करून ही बैठक सुरू ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली. विशेष म्हणजे हे मंत्री-खासदार दोघेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचेच आहेत.
हिंगोली जिल्हा नियोजन समितीची ऑनलाइन बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीला हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, खासदार हेमंत पाटील, आ. तानाजी मुटकुळे, आ. संतोष बांगर, आ. राजू नवघरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समितीची ही बैठक प्रत्यक्ष घेण्याचे ठरलेले असताना जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी अचानकपणे आपला हिंगोली दौरा रद्द करून ही बैठक ऑनलाइन घेण्याची सूचना प्रशासनाला केली होती. बैठकीच्या सुरूवातीलाच खा. हेमंत पाटील यांनी निधीवाटपातील भेदभावाचा मुद्दा उपस्थित करत आक्रमक पवित्रा घेतला आणि वादाला तोंड फुटले. या बैठकीची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
राज्यात इतके जिल्हे असताना हिंगोलीसारख्या मागास जिल्ह्यात येऊन निधीवाटपात शेण खाणे योग्य नाही, असे म्हणत खा. हेमंत पाटील यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आरोपाचे अस्त्र डागले. त्यामुळे अब्दुल सत्तार भडकले आणि दोघांमध्ये चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली.
निधीवाटपात असे शेण खाणे सुरू राहिले तर शिवसैनिक तुम्हाला पायाखाली घेतील, असा इशारा खा. पाटील यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना दिला. त्यामुळे संतापलेले मंत्री अब्दुल सत्तार तावातावाने बोलू लागले. दोघांनीही मर्यादा सोडून एकमेकांच्या बाबतीत असंवैधानिक शब्दांचा वापर केला. मंत्री आणि खासदारामध्ये सुरू असलेली ही खडाजंगी पाहून बैठकीतील अधिकारी आणि सदस्य अवाक झाले.
हिम्मत असेल तर या जिल्ह्यात. सहासहा महिने बैठक घेत नाहीत. लाज वाटली पाहिजे. शेण खायला हाच जिल्हा आहे का. तुम्हाला याच्यासाठीच पाठवले का?, असे खा. हेमंत पाटील म्हणत असतानाच मला विचारल्याशिवाय कुणाचाही आवाज सुरू करू नका, असे अब्दुल सत्तार हे जिल्हाधिकाऱ्यांना सांगत होते. त्यावर आवाज दाबतो का. माझा आवाज दाबू शकत नाही, असे खा. हेमंत पाटील म्हणाले. हिम्मत असेल तर ये जिल्ह्यात, असे आव्हानच खा. पाटील यांनी अब्दुल सत्तारांना दिले. त्यावर अरे येतो तुझ्यासाठी जिल्ह्यात, असे सत्तार म्हणाले.
या खडाजंगीमध्येच पालकमंत्री अब्दुल सत्तार हे आमदारांना बोला म्हणून सांगत होते. परंतु ऑनलाइन बैठकीत काहीच ऐकू येत नसल्याची तक्रार आमदारांनी केली. त्यामुळे त्यांना बैठकीत जे काही मांडायचे होते, हे काही मांडणे झालेच नाही. मुख्यमंत्री शिंदे गटाच्याच मंत्री आणि खासदारामध्ये भरबैठकीत झालेली ही बाचाबाची आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
हिंगोली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाचे पालकमंत्री श्री . अब्दूल सत्तार साहेब आणि जिल्हाचे खासदार श्री . हेमंत पाटील साहेब यांच्या मध्ये निधि च्या टक्केवारी वरून जी शाब्दीक खडाजंगी झाली त्यामध्ये नवल किंवा आश्वर्य वाटण्या सारखे काहीही नाही .
कारण महाराष्ट्रांतील सत्तेत असलेले सरकार हे फक्त स्वार्थासाठी , पैसे कमविण्यासाठी , आपसात निधिची टक्के वारी समप्रमाणात वाटून घेण्यासाठीच सहभागी झालेले आहे .
ज्याया त्याला हिस्सा समप्रमाणात मिळत नसेल तर वाद होणारच . I
त्यात काय नवल ?
पैशापुढे “नाहिरे …
नाही कुणाचे कुणी …?
येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत जनतेने भानावर राहणे गरजेचे आहे .
अॅड केशव भालेराव
मा .सदस्य पं.स. सेनगाव
मो .९८२२४०३२९८