नागपूर: सन २०१७ नंतर शिक्षक भरती करताना जिल्हा परिषद शाळांच्या बिंदूनामावलीमध्ये त्रुटी असल्याबाबत या विभागास तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर दिलेल्या निर्देशानुसार सर्व जिल्हा परिषद शाळांची बिंदूनामावली प्रक्रिया तपासून पूर्ण झाली असून राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची २४ हजार ४६२ पदे रिक्त आहेत, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत सांगितले.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत महादेव जानकर यांनी चर्चेत सहभाग घेतला होता. शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी बिंदूनामावली तपासणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्याची पूर्णपणे तपासणी झाली आहे.
हा विषय जिल्हा परिषद, ग्रामविकास, मागासवर्ग कक्ष यांची एकत्रित बैठक घेऊन तांत्रिक विषय, सकारात्मक बिंदूनामावली तपासणे व कागदपत्रांची पडताळणी करून भरती प्रक्रिया तातडीने झाली पाहिजे हा शासनाचा मानस आहे.
ही भरती प्रक्रिया होताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची शासन दखल घेत आहे. बदली हा विषय जिल्हा परिषद अंतर्गत येत असल्याने ही प्रक्रिया १८ डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे, असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.
बिंदूनामावली बाबत विविधस्तरावरील प्राप्त तक्रारीनंतर नियुक्ती प्राधिकारी असलेल्या जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अद्ययावत केलेली व कार्यरत शिक्षकांची पदे बिंदूनामावली अद्ययावतीकरणाची कार्यवाही केली असून ही बिंदूनामावली मागासवर्ग कक्षाच्या सहायक आयुक्तांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणित करुन दिली आहे.
त्यानुसार राज्यात जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची २४,४६२ रिक्त पदे आहेत. जिल्हा परिषदेच्या बिंदूनामावलीमध्ये एनटीसी (भजक) प्रवर्गाच्या रिक्त जागा जवळपास ५३२ इतक्या दिसून येत आहेत, असे केसरकर म्हणाले.
सन २०२३ मध्ये जिल्हा परिषदेच्या बिंदूनामावलीची तपासणी करताना प्राप्त तक्रारी विचारात घेऊन संबंधित जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यवाही केली असल्यामुळे व त्याची पडताळणी करून सहायक आयुक्त, मागासवर्ग कक्ष यांनी जिल्हा परिषदांची बिंदूनामावली प्रमाणित केली असल्यामुळे त्यामध्ये तफावती राहिल्या नाहीत, असेही केसरकर यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.
शासनस्तरावरुन तसेच शिक्षण आयुक्त यांच्या स्तरावरुन एनटीसी प्रवर्ग तसेच इतर सर्व प्रवर्गाच्या बिंदूनामावली तपासणीतील त्रुटी दूर करण्यासंदर्भात सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार बिंदूनामावली अद्ययावत करण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.