नांदेडः आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यातील संघर्ष टिपेला पोहोचताना पहायला मिळत असतानाच जरांगे पाटील यांच्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी छगन भुजन यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यात ओबीसींचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. येत्या ७ जानेवारीला नांदेड जिल्ह्यातील नरसी नायगाव येथे तब्बल ७० एकरात हा महामेळावा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन सभा घेत आहेत. जरांगे यांच्या सभा तर दररोजच होत आहेत. नांदेड जिल्ह्यात जरांगे पाटील यांनी सहा सभा घेतल्या आहेत. या सर्व सभांमधून जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा एकेरी उल्लेख करत टीका केलेली आहे. जरांगेच्या या सभांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता नांदेड जिल्ह्यातील नरसी नायगाव येथे छगन भुजबळांनी ओबीसी महामेळाव्याचे आयोजन केले आहे.
येत्या ७ जानेवारीला नरसी नायगाव येथे तब्बल ७० एकर मैदानावर ओबीसींचा हा महामेळावा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती ओबीसी जनमोर्चाचे समन्वयक डॉ. बी.डी. चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
छगन भुजबळांच्या या महामेळाव्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ओबीसी नेते प्रकाशअण्णा शेंडगे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर, आ. गोपीचंद पडळकर यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
नरसी नायगाव येथे होणाऱ्या भुजबळांच्या महामेळाव्या चार लाखांहून अधिक ओबीसी बांधव उपस्थित राहणार आहेत, असे या समन्वय समितीच्या वतीने सांगण्यात आले. नांदेड जिल्ह्यात होणाऱ्या पहिल्या सभेत छगन भुजबळांसह अन्य ओबीसी नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष राहणार आहे.
या पत्रकार परिषदेला अविनाश भोसीकर, महेंद्र देमगुंडे, दत्तात्रय मोहिते, प्रकाश राठोड आदींची उपस्थिती होती. नरसी नायगाव येथील महामेळाव्याला जास्तीत जास्त ओबीसी बांधवांना एकत्रित करण्याचा संयोजन समितीचा प्रयत्न असून त्या दृष्टीने तयारीही सुरू करण्यात आली आहे.
भुजबळांच्या नांदेडात चार सभा
मनोज जरांगे पाटील यांनी नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सहा सभा घेऊन छगन भुजबळांवर टिकास्त्र सोडले आहे. आता नांदेड जिल्ह्यात छगन भुजबळांच्या चार सभा घेण्याचे नियोजन संयोजन समितीने केले आहे. त्यापैकी नरसी नायगाव येथील पहिली सभा पार पडल्यानंतर माहूर, भोकर आणि माळेगाव येथे सभा घेण्यात येणार आहेत. या सभेच्या तारखा लवकरच निश्चित केल्या जाणार आहेत, असे समितीने म्हटले आहे.