आरक्षण लाटणाऱ्या विष्णू कऱ्हाळेचे जातीयवादी फुत्कार,बाबासाहेबांना अभिवादन करण्यापासून परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना रोखले!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): देशभर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले जात असतानाच छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे चालणाऱ्या विद्यापीठातच आज एक संतापजनक प्रकार उघडल्याचे समोर आले आहे. परीक्षा विभागातील उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळे याने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यापासूनच परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना रोखले आणि दमबाजी केली. विशेष म्हणजे विष्णू कऱ्हाळेने बाबासाहेबांच्या संविधानातील तरतुदीनुसार आरक्षणाचा लाभ लाटून विद्यापीठात नोकरी मिळवली आहे. त्यानेच महापरिनिर्वाण दिनी जातीयवादी फुत्कार सोडल्यामुळे त्याच्यावर आता विद्यापीठ प्रशासन काय कारवाई करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आज देशभर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठातही महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळी समता शांती पदयात्रा काढून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचे संविधान’ या विषयावर व्याख्यानही आयोजित करण्यात आले. हे सगळे होत असतानाच परीक्षा विभागाच्या पीएचडी विभागातील उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळे याचा माजोरडेपणा समोर आला आहे. स्वतःला आदिवासी असल्याचे सांगणाऱ्या कऱ्हाळेने महापरिनिर्वाण दिनीच जातीयवादी फुत्कार सोडले.

आवश्य वाचाः आणखी एक ‘चारसौ बीसी’: पीएच.डी. विभागाचे उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळेंनी बोगस कागदपत्रांच्या आधारे मिळवली विद्यापीठात नोकरी!

 दरवर्षी प्रमाणेच याहीवर्षी परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी फुले आणि हार आणले होते. परीक्षा विभागातीलच बाबासाहेबांची प्रतिमा खुर्चीवर ठेवून अभिवादन करण्याचे त्यांचे नियोजन होते.

 हे कर्मचारी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याची तयारी करत असल्याचे कळताच परीक्षा विभागातील उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळे याच्या मनातील जातीयवादाची उबळ बाहेर आली. त्याने अभिवादनाची तयारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले आणि तुम्ही कोणाच्या परवानगीने अभिवादनाचा कार्यक्रम घेत आहात? अशी दमबाजी केली. तेव्हा आम्ही दरवर्षीच बाबासाहेबांना अभिवादन करतो. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक आणि अन्य अधिकारी- कर्मचारीही अभिवादन कार्यक्रमात सहभागी होतात, असे त्या कर्मचाऱ्याने कऱ्हाळेला सांगितले.

हेही वाचाः पीएच.डी. विभागाचे उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळेंकडून परीक्षा विभागातही ‘चारसौ बीसी’, दोन गुणाचे वाढवून केले २० गुण!

तरीही कऱ्हाळे त्या कर्मचाऱ्यांना अभिवादन करू द्यायला तयार नव्हता. कऱ्हाळेने दमबाजी केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी अभिवादन कार्यक्रमाची तयारी थांबवली. कऱ्हाळेने आडकाठी केल्यामुळे कर्मचारी संतप्त झाले. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी आल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे कऱ्हाळेविरुद्ध तक्रार केली. त्यांनी कऱ्हाळेविरुद्ध कारवाई करण्याऐवजी कर्मचाऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आणि नंतर अभिवादनाचा कार्यक्रम झाला.

हेही वाचाः परीक्षा विभागातील उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळेंचे संस्थाचालकांशी साटेलोटे, ‘बिदागी’ म्हणून मिळवली पत्नीच्या नावाने आळंदला गॅस एजन्सी!

बाबासाहेबांच्याच संविधानातील तरतुदीनुसार आरक्षणाचा लाभ लाटणाऱ्या आणि स्वतःला आदिवासी असल्याचे सांगणाऱ्या कऱ्हाळेला एवढा माज कशाचा आला? त्यांनी कोणाच्या भरवश्यावर जातीयवादी फुत्कार सोडत बाबासाहेबांना अभिवादन करण्यापासून कर्मचाऱ्यांना रोखले? असा संतप्त सवाल हे कर्मचारी करत असून कऱ्हाळेंविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत आहेत.

परवानगीची गरजच काय?

 कोणत्याही महापुरूषाच्या जयंती अथवा पुण्यतिथी दिनी जो तो कर्मचारी आपापल्या परीने अभिवादन करत असतात. परीक्षा विभागातील कर्मचारीही आज तेच करत होते. त्यांनी स्वतंत्र किंवा वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले नव्हते. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि फुले वाहून अभिवादन करणे एवढाच त्यांचा हेतू होता.

हेही वाचाः उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळेंच्या ‘कृष्णकृत्यां’वर कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंकडूनही पांघरूण, तब्बल १० महिने उलटूनही कारवाई नाहीच!

असे अभिवादन करण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरजच काय? हे जर उपकुलसचिवपदावर असलेल्या विष्णू कऱ्हाळेला कळत नसेल तर परीक्षा विभागासारख्या संवेदनशील विभागात तो यापदावर काम करण्यास सक्षम कसा? असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

कोण आहे विष्णू कऱ्हाळे?

विष्णू कऱ्हाळे हा विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील पीएच. डी. विभागाचा उपकुलसचिव आहे. त्याने बोगस अनुभव प्रमाणपत्र सादर करून अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून विद्यापीठात अधीक्षकपदावर नोकरी मिळवली आहे. नंतर आरक्षणाचाच लाभ घेत त्याने सेवाज्येष्ठतेनुसार सहायक कुलसचिव आणि उपकुलसचिव पदावर पदोन्नतीही मिळवली. फसवणूक करून बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या कऱ्हाळेला आतापर्यंत विद्यापीठ प्रशासन पाठीशी घालत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!