परीक्षा विभागातील उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळेंचे संस्थाचालकांशी साटेलोटे, ‘बिदागी’ म्हणून मिळवली पत्नीच्या नावे गॅस एजन्सी!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळात कार्यरत असलेले उपकुलसचिव विष्णू मारोती कऱ्हाळे यांनी बोगस अनुभवप्रमाणपत्रावर नोकरी आणि त्याच आधारे पदोन्नती मिळवल्यानंतर परीक्षा विभागात अनेक ‘कृष्णकृत्ये’ करायला सुरूवात केली. संस्थाचालकांशी साटेलोटे करून रग्गड कमाई केली. संस्थाचालकांशी व्यावसायिक संबंध प्रस्थापित केले. परीक्षेच्या कामात केलेल्या मदतीची बिदागी म्हणून पत्नीच्या नावाने आळंदला गॅस एजन्सी मिळवल्याची धक्कादायक माहिती न्यूजटाऊनच्या हाती आली आहे.

परभणी जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) नोकरीसाठी आलेल्या विष्णू मारोती कराळे यांनी परभणीच्या एमएसडब्ल्यू महाविद्यालयाच्या बोगस अनुभवप्रमाणपत्रावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अधीक्षकपदावर नियुक्ती मिळवली. त्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार उपकुलसचिवपदावर पदोन्नतीही मिळवली.

हेही वाचाः आणखी एक ‘चारसौ बीसी’: पीएच.डी. विभागाचे उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळेंनी बोगस कागदपत्रांच्या आधारे मिळवली विद्यापीठात नोकरी!

उपकुलसचिवपदी पदोन्नती मिळाल्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षेच्या कामात धोरणात्मक निर्णयाचे अधिकार विष्णू कऱ्हाळेंना प्राप्त झाले. मग त्यांनी आपली मर्जी संपादन करणाऱ्या संस्थाचालकांवर ‘मेहेरनजर’ दाखवायला सुरूवात केली. मर्जीतल्या संस्थाचालकांच्या महाविद्यालयांनी शासनाने मंजूर केलेल्या प्रवेश क्षमतेपेक्षा कितीतरी पटींनी जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिले. या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची विद्यापीठाच्या नियमानुसार ७५ टक्के उपस्थिती भरत नसतानाही त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची आवेदनपत्रे स्वीकारून त्यांच्या नियमबाह्य परीक्षा घेण्याचे ‘कर्तव्य’ बजावले. त्यासाठी कुलगुरूंची परवानगी घेण्याचीही त्यांना आवश्यकता वाटली नाही.

हेही वाचाः पीएच.डी. विभागाचे उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळेंकडून परीक्षा विभागातही ‘चारसौ बीसी’, दोन गुणाचे वाढवून केले २० गुण!

७५ टक्के हजेरी अट पूर्ण न करणाऱ्या आणि अतिरिक्त प्रवेश देऊन आपले उखळ पांढरे करून घेणाऱ्या संस्थाचालकांशी विष्णू कऱ्हाळे यांनी संधान बांधले. या संस्थाचालकांना केलेल्या नियमबाह्य मदतीच्या बदल्यात विष्णू कऱ्हाळे यांनी  रग्गड ‘बिदागी’ही मिळवली.

विष्णू कऱ्हाळे हे अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. त्यांनी परीक्षेच्या कामात केलेल्या नियमबाह्य मदतीच्या बदल्यात एका राष्ट्रीय पक्षाचा सक्रीय कार्यकर्ता असलेल्या एका संस्थाचालकाने कऱ्हाळे यांना बिदागी म्हणून फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे अनुसूचित जमातीच्या कोट्यातून पत्नीच्या नावाने गॅस एजन्सी मिळवून दिली. कोहिनूर गॅस एजन्सी असे या गॅस एजन्सीचे नाव आहे. सध्या ही गॅस एजन्सी तो संस्थाचालकच चालवतो आणि त्या बदल्यात विष्णू कऱ्हाळेंना दरमहा २५ हजार रुपये बिदागी ही देतो.

विष्णू कऱ्हाळेंनी अशा अनेक संस्थाचालकांशी व्यावसायिक संबंध प्रस्थापित केले असण्याची शक्यता आहे. संस्थाचालकांसोबत प्रस्थापित केलेल्या व्यावसायिक संबंधातूनच फुलंब्री तालुक्याशीच काय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याशीही सुतरामही संबंध नसलेल्या विष्णू कऱ्हाळेंना पत्नीच्या नावाने गॅस एजन्सी मिळाली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे मूळ रहिवाशी असलेल्या नागरिकांना गॅस एजन्सी मिळवण्यासाठी खस्ता खाव्या लागतात. परंतु राजकीय लागेबांधे असलेल्या संस्थाचालकाशीच विष्णू कऱ्हाळेंनी संधान बांधल्यामुळे त्यांना फुलंब्री तालुक्यातील आळंदमध्ये अगदी सहजपणे पत्नीच्या नावाने गॅस एजन्सी मिळाली. त्याबदल्यात विष्णू कऱ्हाळेंनी त्या संस्थाचालकाच्या महाविद्यालयाचे किती ‘कोहिनूर’कृत्ये करून दिली? हा चौकशीचा विषय आहे.

उस्मानाबाद उपकेंद्रातून कऱ्हाळे विद्यापीठात कसे परतले?

विष्णू कऱ्हाळे यांच्या विरोधात अनेक संस्थाचालकांच्या आधीपासूनच तक्रारी आहेत. त्यांच्यावर गंभीर स्वरुपाच्या अनियमिततेचे आरोप ठेवण्यात आले. काही संस्थाचालकांनी तर लेखी तक्रारी आणि पत्रकार परिषद घेऊन विष्णू कऱ्हाळेंच्या ‘कृष्णकृत्यां’चा पर्दाफाश केल्यानंतरही विद्यापीठ प्रशासन कऱ्हाळेंच्या विरोधात कारवाई करायला तयार नव्हते. शेवटी दबाव वाढल्यामुळे विष्णू कऱ्हाळेंची उस्मानाबाद उपकेंद्रात बदली करण्यात आली.

 उपकेंद्रात गेल्यामुळे परीक्षेच्या कामकाजात विष्णू कऱ्हाळेंना कोणताही हस्तक्षेप करता येत नव्हता. परिणामी ‘अपकमाई’चे स्रोतच बंद झाल्यामुळे विष्णू कऱ्हाळे अस्वस्थ होते. अखेर विद्यमान कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची नियुक्ती केल्यानंतर विष्णू कऱ्हाळेंनी विद्यापीठाच्या अधिकार मंडळावरील काही सदस्यांशी संधान बांधले आणि सूर्यवंशींना ‘राजी’ करून घेण्यात यश मिळवत पुन्हा विद्यापीठात बदली करून घेतली. सध्या ते परीक्षा विभागातील महत्वाच्या अशा पीएच.डी. विभागाचे उपकुलसचिव आहेत.

कुलगुरू येवले काय कारवाई करणार?

संस्थाचालकांचा वरदहस्त आणि विद्यापीठाच्या अधिकार मंडळांवरील काही सदस्यांची संपादन केलेली मर्जी यामुळे आपले कोणीही वाकडे करू शकत नाही, अशा अविर्भावात विष्णू कऱ्हाळे वावरत आहेत. आता विद्यमान कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे जाता जाता तरी विष्णू कऱ्हाळेंच्या ‘कृष्णकृत्यां’ची चौकशी करून त्यांच्याविरोधात कारवाई करतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!