पुणेः अवकाळी पावसामुळे राज्यातील १७ जिल्ह्यांतील ९० हेक्टर शेती क्षेत्रातील पिकांची नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषि विभागाने काढला आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बुलढाणा जिल्ह्याला बसला असून या जिल्ह्यातील सर्वाधिक ३४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. दरम्यान, पुढील २४ तासांत राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस झाला. राज्यातील १७ जिल्ह्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असून काही ठिकाणी पावसाचा बरोबरच गारपीटीचाही तडाखा बसला आहे. त्यामुळे ९० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषि विभागाने व्यक्त केला आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे द्राक्षे, कांदा, डाळींब, टोमॅटो, हरभरा, संत्रा, कापूस, तूर, भात आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बुलढाणा जिल्ह्याला बसला असून या जिल्ह्यातील ३४ हजार हेक्टर शेती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात ३० हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील १५ हजार हेक्टर तर धुळे जिल्ह्यातील ४ हजार ६०० हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे.
दरम्यान, येत्या २४ तासांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पाऊस सुरूच रहाण्याची शक्यता असून त्यामुळे उरल्यासुरल्या पिकांचीही नासाडी होण्याचा धोका आहे.
राज्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात कमालीची घट झाली असून अचानक थंडी वाढली आहे. या आठवड्याच्या अखेरीस देशभरात थंडी वाढण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.