मुंबईः राज्यातील सहकारी बँकांपैकी अव्वल दहा बँकांपैकी एक बँक म्हणून स्थान मिळवलेल्या मुंबईस्थित अभ्युदय सहकारी बँकेचे प्रशासन आणि कारभारातील त्रुटींवर बोट ठेवत या बँकेचे संचालक मंडळ भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी बरखास्त केले. पुढील वर्षभरासाठी या बँकेचा कारभार पाहण्यासाठी रिझर्व्ह बँकेने भारतीय स्टेट बँकेचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्यप्रकाश पाठक यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.
अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असले तरी बँकेवर रिझर्व्ह बँकेने कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. रिझर्व्ह बँकेने नियुक्त केलेल्या प्रशासकाच्या मार्गदर्शनाखाली सर्व बँकिंग व्यवहार सुरळीत सुरू राहतील असे, रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
प्रशासन मानकांबाबत हयगयीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे निरीक्षण करता ही कारवाई करणे आवश्यक ठरले, असे रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
प्रशासक सत्यप्रकाश पाठक यांना मदत करण्यासाठी सल्लागारांची एक समितीही नेमण्यात आली आहे. या समितीत स्टेट बँकेचे माजी महाव्यवस्थापक व्यंकटेश हेगडे, सनदी लेखापाल महेंद्र छाजेड आणि कॉसमॉस सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले यांचा या समितीमध्ये समावेश आहे.
खातेदारांवर काय परिणाम?
बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत रिझर्व्ह बँकेने कोणताही इशारा दिलेला नाही. बँकेच्या सर्व शाखांचे सर्व प्रकारचे कामकाज नित्यनेमाने सुरु राहणार आहे. त्यामुळे खातेदारांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. बँकेच्या सर्व सेवा नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू राहणार आहेत.
केवळ प्रशासकाच्या नियुक्तीमुळे बँकेच्या दैनंदिन परिस्थितीवर थेट रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण राहील आणि तज्ज्ञ सल्लागारांच्या मदतीमुळे बँकेचा कारभार अधिक सक्षम होईल, असे अभ्युदय सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रेमनाथ सालियन यांनी म्हटले आहे.