साताराः प्रस्थापित मराठे ७० वर्षे सत्तेत होते. ते काय करत होते? गांजा ओढत होते का? त्यांनी मराठ्यांना आरक्षण का दिले नाही? देवेंद्र फडणवीसांना घेरण्यासाठी आरक्षणाचे हत्यार वापरले जात आहे. त्यासाठीच मराठ्यांसह अनेक समाजाची आंदोलने सुरू आहेत, असा आरोप रयत क्रांतीचे संस्थापक आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे. ते कराडमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
मराठ्यांच्या पोरांनी शेती तरी माती अन् शाळा शिकली तरी माती होत आहे. मराठा समाज खेड्यापाड्यांत राहणारा, शेती करणारा समाज आहे. कालांतराने शेतीचे तुकडे झाले आणि शेतावर पोट भागत नसल्यामुळे शिकलेल्या मराठा समाजातील मुले नोकरीसाठी बाहेर पडली. प्रस्थापित मराठे ७० वर्षे सत्तेवर होते. ते काय गांजा ओढत होते का? त्यांनी मराठ्यांना का आरक्षण दिले नाही? सध्या फक्त देवेंद्र फडणवीसांना घेरण्यासाठी आरक्षणाचे हत्यार वापरले जात आहे, असे सदाभाऊ खोत म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नाच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. मात्र दुर्देवाने कोणीही या प्रश्नांच्या मुळाशी जात नाही. फडणवीसांनी दिलेले आरक्षण टिकले होते. आघाडी सरकारने योग्य भूमिका न घेतल्यामुळे आरक्षण टिकले नाही. सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी सर्वांना समान न्याय देणे गरजेचे आहे. त्यासाठी संपूर्ण आरक्षणाची फेरमांडणी करावी लागेल, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.