मुंबईः राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून कोकणवगळता सर्वच विभागात टंचाईजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस तुटीमुळे शेकतरी हवालदिल झाला आहे. सांगली आणि जालना जिल्ह्यात तर अत्यल्प पावसामुळे भीषण स्थिती निर्माण झाली आहे.
राज्यात १ जून ते २६ ऑगस्ट या काळात सरासरी ७७२.४ मिलीमीटर पाऊस पडतो. परंतु यंदा या काळात केवळ ७०९.५ मिलीमीटर म्हणजे सरारीपेक्षा ८ मिलीमीटर पाऊस कमी झाला आहे. राज्याचा विभागनिहाय विचार केल्यास मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २१ कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यात सरासरीपेक्षा १८ टक्के कमी तर विदर्भात सरासरीपेक्षा ९ टक्के कमी पाऊस झाला आहे.
मराठवाड्यात सरासरी ४५१.७ मिलीमीटर पाऊस पडतो. यावर्षी प्रत्यक्षात ३७२.३ मिलीमीटरच पाऊस झाला आहे. पावसाची ही तूट १८ टक्के आहे. नांदेड जिल्हा वगळता मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ३३ टक्के कमी, बीडमध्ये ३२ टक्के कमी, हिंगोली जिल्ह्यात ३४ टक्के कमी, जालना जिल्ह्यात तब्बल ४८ टक्के कमी, लातूरमध्ये ८ टक्के कमी, उस्मानाबाद जिल्ह्यत २३ टक्के कमी तर परभणी जिल्ह्यात २५ टक्के कमी पाऊस झाला आहे.
मध्य महाराष्ट्रात सरासरी ५६० मिलीमीटर पाऊस पडतो. परंतु यंदा ४४४.३ टक्के म्हणजे २१ टक्के कमी पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात ३४ टक्के कमी, सांगली जिल्ह्यात ४५ टक्के कमी, सातारा जिल्ह्यात ३६ टक्के कमी, धुळे जिल्ह्यात २३ टक्के कमी, नंदूरबार जिल्ह्यात २१ टक्के कमी, सोलापुरात २७ टक्के कमी, पुण्यात १७ टक्के कमी, जळगाव व कोल्हापूर जिल्ह्यात १४ टक्के कमी तर नाशिक जिल्ह्यात ९ टक्के कमी पाऊस झाला आहे.
विदर्भात सरासरी ७५७ मिलीमीटर पाऊस पडतो. यावर्षी प्रत्यक्षात ६७२.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाची ही तूट ९ टक्के इतकी आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ३३ टक्के कमी, अकोला जिल्ह्यात ३० टक्के कमी,, बुलडाण्यात २२ टक्के कमी, गोंदिया जिल्ह्यात१७ टक्के कमी, वर्धा जिल्ह्यात १० टक्के कमी, नागपुरात ६ टक्के कमी आणि चंद्रपुरात ४ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे मोठी तूट आल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचीही मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी पावसाच्या तुटीची सर्वाधिक झळ जालना आणि सांगली जिल्ह्याला बसली आहे. या दोन्ही जिल्ह्यात पाऊस तुटीमुळे अत्यंत भीषण परिस्थिती आहे.
धरणातील पाणीसाठाही चिंताजनक
राज्यातील जलसाठ्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी सरासरी २० टक्के घट झाली आहे. जलसंपदा विभागाने २७ ऑगस्टपर्यंत राज्यातील मोठ्या धरणातील पाणीसाठ्याची स्थिती सांगितली आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातील मोठ्या सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. २७ ऑगस्ट रोजी राज्यातील मोठ्या धरणात सरासरी ६३.४८ टक्के पाणीसाठा नोंदला गेला आहे. गेल्या वर्षी याच तारखेला म्हणजे २७ ऑगस्ट २०२२ रोजी या धरणात ८३.३४ टक्के पाणीसाठा होता. पाणीसाठ्यातील ही तूट २० टक्के इतकी आहे.
मराठवाड्यात भीषण स्थिती
मराठवाडा विभागातील प्रकल्पांमध्ये केवळ ३१.६१ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी हाच जलसाठा ७४.६४ टक्क्यांवर होता. त्यामुळे आता पुढील काही दिवसांत जर पाऊस झाला नाही तर मराठवाड्याला पुन्हा भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पावसाळ्याची तीन महिने निघून गेली आहेत. आता केवळ एकच महिना उरला आहे. या महिनाभरात किती टक्के पाऊस पडतो आणि किती टक्के जलसाठा सिंचन प्रकल्पांत जमा होतो, यावरच पुढील जलसाठ्याची गणिते ठरणार आहेत.
सिंचन प्रकल्पातील विभागनिहाय जलसाठा असाः कोकण- ८८.२६ टक्के, मराठवाडा- ३१.६१ टक्के, नागपूर-७७.७५ टक्के, अमरावती-६९.६१ टक्के, नाशिक-५८.६० टक्के, पुणे- ६८.७२ टक्के.