छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): विभागीय सहसंचालक कार्यालयातील प्रशासन अधिकारी वनिता उदयराव उर्फ व्ही. यू. सांजेकर यांच्या चौकशीसाठी मुंबईचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. सांजेकर यांच्याविरुद्धची चौकशी करून १५ दिवसांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिले आहेत.
सांजेकर यांच्या कार्यपद्धतीबाबत उच्च शिक्षण संचालकांकडे नोव्हेंबर २०२२ पासून एकूण सात तक्रारी प्रलंबित आहेत. त्यात लोहारा येथील भारतीयराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षण संघटना, उस्मानाबाद, औरंगाबाद, स्वाभिमानी मुप्टा, वैजापूरच्या चेतना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, विद्यापीठाचे अधिसभा व स्थायी समिती सदस्य आणि अन्य शिक्षक संघटनांचा समावेश आहे.
औरंगाबादच्या विभागीय सहसंचालक कार्यालयातील प्रशासन अधिकारी व्ही. यू. सांजेकर यांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल विविध प्राध्यापक संघटना आणि संस्थाचालकांनी सहसंचालक आणि उच्च शिक्षण संचालकांकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. तरीही त्यांच्या विरोधात उच्च शिक्षण संचालकांकडून कोणतीही कारवाई केली जात नव्हती. त्यामुळे आपले ‘कुणीच वाकडे’ करू शकत नाही, अशा अविर्भात सांजेकर वर्तन करत होत्या आणि प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि संस्थाचालकांची पिळवणूक करत होत्या.
मे महिन्यात तर सांजेकरांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातील माकणी येथील महाविद्यालयात जाऊन कहरच केला होता. या महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आपले गुलाम आहेत, अशा पद्धतीने सांजेकरांनी त्यांच्याशी वर्तन केले होते. अरेरावी आणि उद्धटपणाची भाषा करत प्राध्यापकांना अपमानित करत संस्थाचालकाची फुल्ल टू चाटुगिरी केली होती. या चाटुगिरीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर औरंगाबाद विभागातील प्राध्यापक संघटना संतप्त झाल्या होत्या. त्यांनी सहसंचालक आणि उच्च शिक्षण संचालकांकडे तक्रारी करत सांजेकरांविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. त्यासाठी शिक्षक संघटनांनी सहसंचालक कार्यालयासमोर वेळोवेळी आंदोलनेही केली होती.
तारीख पे तारीख
शिक्षक संघटनांकडून सांजेकरांविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी जेव्हा जेव्हा आंदोलने करण्यात आली, तेव्हा तेव्हा उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी कधी आठ दिवसांत तर कधी दोन दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मे महिन्यांपासून म्हणजेच गेल्या चार महिन्यांपासून शिक्षक संघटना सांजेकरांविरुद्ध कारवाईसाठी पाठपुरावा करत होत्या. तरीही कारवाई होत नव्हती.
९ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांतीदिनी शिक्षक संघटनांनी पुन्हा आंदोलन केले. तेव्हाही उच्च शिक्षण संचालक देवळाणकर यांनी दोन दिवसांत उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते.
अखेर देवळाणकर यांनी मुंबई विभागाचे सहसंचालक डॉ. केशव तुपे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आणि १५ दिवसांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश या चौकशी समितीला दिले. उच्च शिक्षण संचालकांनी ९ ऑगस्ट रोजी हे आदेश जारी केले. त्यानुसार २४ ऑगस्ट रोजी १५ दिवसांची मुदत संपत आहे. ही समिती २३ ऑगस्ट रोजी औरंगाबादेत प्रत्यक्ष चौकशीसाठी येण्याची शक्यता असून त्यादिवशी तक्रारदारांचे म्हणणेही ऐकून घेतले जाणार आहे. सांजेकरांविरुद्धच्या या आरोपांची होणार चौकशी:
बनावट सेवापुस्तिका बनवल्या
उच्च शिक्षण संचालक डॉ. देवळाणकर यांनी सांजेकरांना बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीत जी कारणे दिली आहेत, त्यातील सर्वात गंभीर कारण आहे ते बनावट सेवापुस्तिका तयार करून दिल्याचे.
लोहारा येथील भारतीय राष्ट्रीय शिक्षण संस्थेला विचारात न घेताच सांजेकर यांनी या संस्थेच्या शंकरराव पाटील महाविद्यालयाच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बनावट सेवापुस्तिका तयार करून दिल्याचा आरोप आहे. महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी आणि प्रभारी प्राचार्यांशी संगनमत करून आणि संस्थेची पूर्वपरवानगी न घेताच सांजेकरांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेची दुसरी प्रत तयार करून दिल्याची तक्रार या संस्थेच्या सचिवांनी उच्च शिक्षण संचालकांकडे ३ नोव्हेंबर २०२२ रोजी केली होती.
शासनाच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप
सांजेकर या मनमानी करून शासनाच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करून प्राध्यापकांमध्ये अकारण भीती निर्माण केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबतची तक्रार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने १० मे २०२३ रोजी उच्च शिक्षण संचालकांकडे केली होती. सांजेकर या सहसंचालकांची पूर्वपरवानगी न घेताच माकणी येथील महाविद्यालयात चौकशीसाठी गेल्या असता तेथील प्राध्यापकांशी हिटलरशाही पद्धतीने बोलून शासकीय कर्तव्य विसरणे, पातळी सोडून बोलून अवमानित करणे, मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा गुंडाळून ठेवून संस्थाचालक हाच महाविद्यालयाचा मालक आहे, असा दम प्राध्यापकांना देणे आणि ‘लाईट लागली मी सत्य बोलते,’ असे सांगून अंधश्रद्धेला खतपाणी घालत अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणे इत्यादी आरोप सांजेकरांवर ठेवण्यात आले आहेत. सांजेकर या प्राध्यापकांबद्दल कायम पूर्वग्रहदूषित आसूया बाळगत असल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.
वेतन बंद करण्याच्या धमक्या
सांजेकर या प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत बोलून अपमानित तर करताच, शिवाय संस्थाचालकांना सांगून तुमचे वेतन बंद करीन, अशा उघड धमक्याच प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना देत असल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सांजेकर या कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका दाबून ठेवतात आणि कर्मचाऱ्यांकडे पैशांची मागणी करतात, अशाही तक्रारी आहेत. याबाबतची तक्रार विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी उच्च शिक्षण संचालकांकडे ११ मे २०२३ रोजी केली होती.
कामासाठी पैशाची मागणी
सांजेकर या प्राध्यापकांना धमकावतात, उद्धट व अपमानास्पद बोलतात, कामासाठी पैशाची मागणी करतात, वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली करतात आणि वरिष्ठांच्या अधिकारात हस्तक्षेप करतात आणि पदाचा गैरवापर करतात अशी तक्रारही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने २४ मे २०२३ रोजी उच्च शिक्षण संचालकांकडे केली होती.