‘अशाच बोलत राहिलात तर तुमचा दाभोळकर करू’, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी


मुंबईः राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘अशाच बोलत राहिलात तर तुमचा दाभोळकर करू’ असे ट्विट करून ही धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, या धमकीनंतर ठाकूर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त केला जात आहे. संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, यासाठी काँग्रेसने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. याच मुद्यावर आक्रमक भूमिका घेत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

ट्विटरवर आलेल्या या धमकीनंतर यशोमती ठाकूर यांनी ‘शिव-शाहू, फुले, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर’ असे सूचक ट्विट करून धमकी देणाऱ्याला प्रत्युत्तर दिले आहे. माझ्या जिविताला काही झाले तर त्यास गृहमंत्री जबाबदार असतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

असेच बोलत राहिलात तर दाभोळकर करू, असे ते बोलत आहेत. महात्मा गांधीविषयी त्यांनी काहीही बोलले तरी चालेल, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दलही काही बोलले जाते आणि या लोकांवर आम्ही बोललो तर आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली जाते. भिडेंच्या वादात भाजपला खेचू नका, असे फडणवीस म्हणतात, परंतु त्यांच्या पक्षाचा खासदार आमच्या विरोधात पोलिसात तक्रार करायला गेला. माझ्या जीवाला काही झाले तर त्यास गृहमंत्री जबाबदार राहतील, असे ठाकूर म्हणाल्या.

भिडेंना प्रोत्साहन देण्यात येत आहे. भिडेंना पोलिस सुरक्षा देत आहेत, मात्र आम्हाला नाही. आम्हाला यात ओढू नका, असे फडणवीस म्हणतात. पण त्यांच्याच पक्षाचा खासदार आमच्या विरोधात तक्रार द्यायला गेले होते. आमचा जीव गेला तरी चालेल, पण यांचे सर्व उघडे करणार, असे ठाकूर म्हणाल्या.

भिडेंविरोधात गांधीवादी संतप्त, सुरु केले विचारा प्रश्न आंदोलन

वर्धाः महात्मा गांधी आणि महात्मा फुले यांच्याबद्दल संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांनी अत्यंत आक्षेपार्ह विधाने केली आहेत. वर्धा जिल्ह्याची ओळख गांधी जिल्हा म्हणून आहे. म्हणून अशा प्रवृत्तीची तोंडे बंद पाडली पाहिजे, ही गांधी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची नैतिक जबाबदारी ठरते. त्यांच्यावर कारवाईची भूमिका घेतली पाहिजे. पण जिल्ह्यातील आमदार, खासदार याबद्दल एक शब्दही बोलत नाही. म्हणून प्रश्न विचारा हे आंदोलन करत असल्याचे भारतीय लोकशाही अभियान आणि जिल्हा सर्वोदय मंडळाने स्पष्ट केले आहे.

भिडेंच्या नांग्या ठेचा, बच्चू कडूही आक्रमक

संभाजी भिडेंच्या वक्तव्यामुळे प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडूही आक्रमक झाले आहेत. महापुरूषांवर टिका करताना आपली औकात तपासली पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्यात तुमचे योगदान काय आहे? भिडे त्यांच्या वयानुसार स्वातंत्र्यापूर्वी जन्माला आले असतील. पण त्यांनी स्वातंत्र्यासाठी एखादी लाठी खाल्लेली नाही. पण म. गांधींबद्दल बोलायला ते विसरले नाहीत. त्यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत. हेच वाक्य एखाद्या मुस्लिमाने केले असते तर तुम्ही सर्वजण पेटून उठले असते आणि त्याला देशद्रोही म्हटले असते. देशाबद्दल हिंदू किंवा मुस्लिम कोणी काही बोलत असेल तर त्या व्यक्तीला तशीच शिक्षा दिली पाहिजे, असे बच्चू कडू यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!