छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): मूलतत्ववादी विचारांच्या विरोधात समतेच्या मूल्यांची भक्कम पायाभरणी करणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) चालणाऱ्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले आणि कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांना बाबासाहेबांच्या नावाचा प्रचंड तिटकारा असल्याचे त्यांच्याच कृतीतून समोर आले आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरात नव्याने उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन शनिवारी होणार असल्याचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी जाहीर केले आहे. परंतु या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या इमारतीचे उदघाटन असे हेतुतः टाळून केवळ ‘विद्यापीठाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन’ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे कुणाच्या इशाऱ्यावर हा उल्लेख टाळण्यात आला? असा सवाल केला जाऊ लागला आहे.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे येत्या शनिवारी (२२ जुलै) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येत आहेत. त्यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरात सुमारे सव्वातीन कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राचे उद्घाटन तसेच कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून हाती घेतलेल्या विद्यापीठ गेटच्या सुशोभिकरणाचे उद्घाटन होणार आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार विजेत्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजता विद्यापीठाच्या नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे.
माजी राष्ट्रपतींच्या हस्ते डॉ. आंबेडकर संशोधन केंद्राचे उद्घाटन होणार असल्याचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी जाहीर केलेले असले तरी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाची जी निमंत्रणपत्रिका वितरित करण्यात आली आहे, त्या निमंत्रणपत्रिकेत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रा’च्या नूतन इमारतीचे उद्घाटन असा उल्लेख जाणीवपूर्वक टाळून केवळ ‘ विद्यापीठाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन’ असे छापण्यात आले आहे. विद्यापीठाची ही नूतन इमारत म्हणजे नवीन प्रशासकीय इमारत आहे की काय? असेच ही निमंत्रणपत्रिका वाचून कुणालाही वाटेल.
कुलसचिव डॉ. भगनाव साखळे निमंत्रक असलेल्या या निमंत्रणपत्रिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यामागे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले आणि कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांचा नेमका हेतू काय आहे? बाबासाहेबांचा नामोल्लेख टाळण्याचे हे कारस्थान त्यांनी नेमके कुणाच्या इशाऱ्यावर केले? माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार असल्यामुळे आरएसएसच्या इशाऱ्यावर असे केले गेले आहे का? की कुलगुरू-कुलसचिवांच्या मनात बाबासाहेबांच्या नावाचा प्रचंड तिटकारा असल्यामुळे या दोघांनीच संगनमताने हा नामोल्लेख टाळला?, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.
ज्यांनी निधी दिला, त्यांनाच डावलले; वादानंतर कार्यक्रम रद्द
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालणाऱ्या विद्यापीठात त्यांच्याच नावाचे सुसज्ज आणि अद्ययावत असे संशोधन केंद्र असावे, या हेतूने ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव यांनी राज्यसभा सदस्य असताना त्यांच्या निधीतून या संशोधन केंद्रासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु या संशोधन केंद्राच्या उद्घाटनाच्या वेळी विद्यापीठ प्रशासनाला डॉ. नरेंद्र जाधव यांचाच पद्धतशीरपणे विसर पडला. त्यांना निमंत्रित करण्याचे सौजन्यही विद्यापीठ प्रशासनाने दाखवले नाही. दरम्यान, या संशोधन केंद्राच्या उद्घाटनावरून वाद निर्माण होताच विद्यापीठ प्रशासनाने ‘काही अपरिहार्य कारणास्त’ असे सांगत या संशोधन केंद्राच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. रिपब्लिकन विद्यार्थी सेना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स यांच्यासह विविध संघटनांनी विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर ‘अपरिहार्य कारणास्तव’ सांगत विद्यापीठ प्रशासनाने हा उद्घाटन सोहळा पुढे ढकलला आहे.
कार्यक्रम विद्यापीठाचा, निमंत्रणे मात्र थेट डॉ. हेडगेवार रुग्णालयातून!
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत शनिवारी विद्यापीठ परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांचे आयोजक अधिकृतपणे विद्यापीठ प्रशासन आहे. ‘विद्यापीठाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन’, पद्म गौरव समारंभ आणि विद्यापीठ गेटच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन हे सगळेच कार्यक्रम विद्यापीठाच्या तिजोरीतून पैसा खर्च करून केले जात आहेत. मात्र या कार्यक्रमासाठी निमंत्रणे देण्यासाठी आणि कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आग्रह धरण्यासाठी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चालवल्या जाणाऱ्या डॉ. हेडगेवार रुग्णालयातून फोन करण्यात आले आहेत.
अधिसभा सदस्य डॉ. शंकर अंभोरे यांनाही डॉ. हेडगेवार रुग्णालयातून गायकवाड नावाच्या व्यक्तीने फोन केला आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची आग्रही विनंती केली. कार्यक्रम विद्यापीठाचा आणि तुम्ही हेडगेवार रुग्णालयातून फोन का बरे करताय? असे डॉ. अंभोरे यांनी विचारले असता आम्हाला तसे सांगण्यात आले आहे, असे उत्तर गायकवाड नावाच्या व्यक्तीने दिल्याचे डॉ. अंभोरे यांनी सांगितले. त्यामुळे रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत विद्यापीठ प्रशासनाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आरएसएसचा सक्रीय सहभाग कसा? डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रशासन आरएसएसच्या दावणीला बांधले गेले आहे की काय? असे सवालही केले जाऊ लागले आहेत.
Khup nindniy ahe ,he education setrsthi khup denger ahe , yana ghri bsva.