मुंबईः गेल्या २४ तासांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शाळांना गुरूवारी सुटी जाहीर केली आहे. गडचिरोली आणि चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना गुरूवारची सुटी जाहीर केली आहे. शिक्षण आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून आपापल्या भागातील पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन शाळांना सुटी देण्याचा निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, पुढील २४ तासांत मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार तर विदर्भ-मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आज मुंबई, ठाणे, कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. उद्या गुरूवारी (२० जुलै) ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे तर मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत उद्या गुरूवारीही पावसाचा जोर कायम राहणार असून खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुटी देण्यात आली आहे.
जुलै महिन्याचे काही दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पाऊस सक्रीय झाला असून पुढील काही दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुढील २४ तासांत मुंबई, ठाणे, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही मध्यम स्वरुपाच्या ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्याच्या बहुतांश भागातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून आपत्तीच्या पूर्वसूचना, हवामान खात्याचा अंदाज तसेच त्या त्या भागातील पावसाची सद्यस्थिती लक्षात घेऊन आपापल्या स्थानिक क्षेत्रातील शाळांना सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने शाळांना सुटी जाहीर करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना शिक्षण आयुक्तांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.
गरज नसेल तर घराबाहेर पडू नकाः मुख्यमंत्र्यांचे आवाहन
राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित स्थळी रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट देण्यात आल्यानंतर प्रत्येकाने काळजी घ्यावी. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, असे आवाहन मी सर्व जनतेला करतो, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.