अजित पवारांसह दादा गटाचे मंत्री अचानक शरद पवारांच्या भेटीला, इशाऱ्यावरच पवारांनी गुंडाळायला लावली बैठक


मुंबईः शरद पवारांविरुद्ध बंडखोरी करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होऊन मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवारांसह नऊ मंत्र्यांनी आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये अचानक भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या या आठ बंडखोर मंत्र्यांनी शरद पवारांचे आशीर्वाद मागितले. आम्ही सरकारला पाठिंबा दिला आहे. तुम्हीही आमच्यासोबत चला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध कसा राहील हे पहा, असे सांगत राष्ट्रवादी दादा गटाच्या या मंत्र्यांनी शरद पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु शरद पवारांनी त्यांना कोणतीही प्रतिसाद दिला नाही. उलट इशारा करून बैठक लवकर गुंडाळण्यास सांगितले.

सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेश सुरू होत आहे. त्याच्या आदल्यादिवशीच म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दादा गटाचे सर्व मंत्री अचानक यशवंतराव चव्हाण सेंटरवर धडकले आणि त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे आणि उपसभापती नरहरी झिरवळ, अनिल पाटील, धर्माराव बाबा आत्राम, संजय बनसोडे हे यावेळी उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी शरद पवारांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला.

शरद पवार आणि राष्ट्रवादी दादा गटाच्या मंत्री-नेत्यांची ही बैठक जवळपास चाळीस मिनिटे चालली. या भेटीचा तपशील प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितला. आमचे दैवत, आमचे नेते शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवार, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील आणि बाकी सहगळे मंत्री यशवंतराव चव्हाण सेंटरला वेळ न मागता आलो होतो. शरद पवार हे एका बैठकीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरला आल्याचे कळले. मग आम्ही संधी साधून त्यांची भेट घेतली, त्यांचे आशीर्वाद घेतले, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

 आम्ही त्यांना विनंती केली की, त्यांच्यासाठी आमच्या मनात आदर आहेच. पण राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध कसा राहू शकतो, याचा विचार करावा. येणाऱ्या काळातील राजकारणाविषयी मार्गदर्शन करावे. त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले. पण आमच्या प्रस्तावावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

शरद पवारांनी दादा गटाच्या प्रस्तावावर कोणतेही उत्तर न देऊन हा प्रस्तावच खारीज केल्याचे बोलले जात आहे. दादा गटाचे नेते मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असतानाच जवळपास चाळीस मिनिटे सुरू असलेली ही बैठक आटोपती घेण्याचा इशारा शरद पवारांनी केला. आपल्या प्रस्तावावर शरद पवार काहीच उत्तर देत नाहीत, हे पाहून दादा गटाच्या मंत्र्यांनीही बैठक आटोपती घेतली.

नेमके काय घडले?

 अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर गटाचे नेते यशवंतराव चव्हाण सेंटरवर भेटीला आल्याचे कळताच शरद पवार यांनी तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बोलावून घेतले. बंडखोर नेते शरद पवारांना भेटले, तेव्हा संजय बनसोडे, नरहरी झिरवळ हे शरद पवारांच्या पाया पडले तर आता जाताच विठ्ठला, पांडुरंगा सांभाळून घे आम्हाला, असे छगन भुजबळ म्हणाले.

बंडखोरांनी व्यक्त केली दिलगिरी आणि खंत

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या बैठकीबाबत माहिती दिली. राष्ट्रवादी पक्षापासून वेगळी भूमिका घेऊन सरकार सोबत गेलेल्या फुटीर गटाने घडलेल्या संपूर्ण प्रकाराबद्दल शरद पवारांकडे दिलगिरी आणि खंत व्यक्त केली. या सगळ्यातून पक्ष एकसंध रहावा, यासाठी मार्ग काढण्याची विनंतीही केली. मात्र शरद पवारांनी या विनंतीवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असे पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अचानक शरद पवारांना भेटल्यामुळे आता संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार का? अशा चर्चाही या भेटीमुळे रंगल्या. त्याबाबत विचारले असता जयंत पाटलांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आम्ही याआधीच सरकारसोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्या निर्णयावर सध्या ठाम आहोत. बंडखोर नेत्यांनी केलेल्या विनंतीवर काय उत्तर द्यायचे, हा आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा प्रश्न आहे, असेही पाटील म्हणाले.

फडणवीस म्हणतातः कशाचीच कल्पना नाही!

राष्ट्रवादीचा बंडखोर दादा गट शरद पवारांच्या भेटीला गेल्याच्या घटनेवर उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची मला कल्पना नाही. मात्र, वर्षानुवर्षे शरद पवार हे त्यांचे नेते राहिले आहेत. त्यामुळे भेट घेतली तर त्यात काही वावगे आहे, असे मला वाटत नाही. यातून काही राजकीय समीकरणे तयार होतील का याची मला कल्पना नाही, असे फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *