बा विठ्ठला… समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर: मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे!


पंढरपूर: बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्यांच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम, सुफलाम होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी एकादशीच्या मुख्य शासकीय महापूजेवेळी विठूरायाच्या चरणी घातले.

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे तसेच मानाचे वारकरी दांपत्य भाऊसाहेब मोहिनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे यांच्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.

आषाढी वारीत लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनास आले आहेत. पंढरी व परिसर अवघा पांडुरंगमय झाला आहे. आषाढी वारीत वारकऱ्यांच्या आरोग्याला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यासाठी तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून भाविकांची आरोग्य सेवा करणे विठ्ठल पुजेसारखेच आहे. या वर्षीच्या वारीत स्वच्छतेचे चांगले काम झाले आहे. शासनाने दिलेल्या सूचनांनुसार प्रशासनाने उत्तम नियोजन करून वारकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विठ्ठल दर्शनाच्या ओढीने आलेल्या वारकऱ्यांचा मुख दर्शनाच्या रांगेत शासकीय पूजेच्या वेळात खोळंबा होवू नये म्हणून या काळात मुख दर्शन रांग सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे रांगेतील वारकऱ्यांचे दर्शन जलद व सुलभ झाले,  असे शिंदे म्हणाले.

राज्य शासनाने या एक वर्षाच्या काळात जनकल्याणाचे अनेक निर्णय घेऊन सामान्य माणसाला दिलासा दिला आहे. पंढरपूर नगरपरिषदेकडील कामांसाठी नगरोत्थानमधून १०८ कोटी रुपये आणि शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी १०९ कोटी रुपयाच्या कामाला मान्यता देण्यात आली आहे. मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी ७३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

पंढरपूर शहर विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊन तयार करण्यात येईल. तसेच, ३० खाटांचे रूपांतर १०० खाटांमध्ये लवकरच करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सलग दोन वर्षे आपल्याला आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळणे हे आपले भाग्य असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

अहमदनगर जिल्ह्यातील काळे दांपत्य ठरले मानाचे वारकरी

मुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी कुटुंबातील भाऊसाहेब मोहनीराज काळे (वय ५६) मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) मु. पो. वाकडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर या वारकरी दांपत्यास शासकीय पूजेचा मान मिळाला. काळे दांपत्य २५ वर्षापासून भास्करगिरी महाराज यांच्या सोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी करीत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळालेल्या वारकरी दांपत्यास एक वर्षासाठी मोफत प्रवासाची सेवा दिली जाते. त्या मोफत पासचे वितरण शिंदे यांच्या हस्ते या वारकरी दांपत्यास करण्यात आले.

निर्मल दिंडी पुरस्कार वितर

वारीत सहभागी होणाऱ्या अनेक दिंड्या सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत असतात. या दिंड्यांचा आदर्श घेऊन ‘निर्मल वारी हरित वारी ‘ अभियानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवावा, या उद्देशाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांच्यामार्फत ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार देण्यात येतो. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्री तारकेश्वर गड दिंडी, ता. आष्टी, जि. बीड (एक लाख रुपये व सन्मानचिन्ह), द्वितीय क्रमांक नांदेडकर मंडळीची दिंडी, ता. हवेली, जि. पुणे (७५ हजार व सन्मान चिन्ह) तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्री एकनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था, यशवंतनगर, पैठण जिल्हा औरंगाबाद (५० हजार व सन्मान चिन्ह) या दिंडीला प्रदान करण्यात आले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *