MPSC 2025: महाराष्ट्र गट-ब संयुक्त मुख्य परीक्षेत एकापेक्षा अधिक गुणवत्ता यादीत नाव आले तरी नियुक्ती एका संवर्गातच!


मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा-२०२५ च्या निकालासंदर्भात उमेदवारांमध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकाच उमेदवाराचे नाव एकापेक्षा अधिक संवर्गांच्या गुणवत्ता यादीत आले असले, तरी प्रत्यक्ष नियुक्ती केवळ एका संवर्गातील पदावरच होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

आयोगाने १४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा-२०२५ चा निकाल प्रसिद्ध केला. १७ मे २०२६ रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेच्या निकालामध्ये सहायक कक्ष अधिकारी संवर्गातील ३ पदे, राज्य कर निरीक्षक संवर्गातील २७९ पदे आणि दुय्यम निबंधक (श्रेणी-१)/मुद्रांक निरीक्षक संवर्गातील ८४ पदे अशा एकूण ३६६ पदांचा समावेश आहे.

या परीक्षेसाठी अर्ज करताना उमेदवारांनी मुख्य परीक्षेतील या तीनही संवर्गांकरिता विकल्प दिले होते. निकाल जाहीर करीत असतांना आयोगाने प्रचलित कार्यपद्धतीनुसार संवर्गनिहाय उपलब्ध पदे, उमेदवारांची गुणवत्ता, सामाजिक व समांतर आरक्षण व उमेदवाराने दिलेले विकल्प इ. बाबी निकाल तयार करीत असतांना विचारात घेण्यात आल्या आहेत.

 त्यानुसार वरील तिन्ही संवर्गाची यादी आयोगाच्या संकतेस्थळावर १४ ऑगस्ट, २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे गुणवत्ता यादीतील या तीनही संवर्गाचे उमेदवार हे एकापेक्षा अधिक संवर्गातील गुणवत्ता यादीत आलेले दिसून येतात, असे आयोगाने म्हटले आहे.

उमेदवारांनी अर्ज दाखल करीत असतांना वरील तीनही संवर्गाकरिता विकल्प दिलेला आहे. तो विकल्प विचारात घेऊनच संवर्गनिहाय निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. एक उमेदवार एकापेक्षा अधिक संवर्गाच्या गुणवत्तायादीमध्ये दिसत असला तरी प्रत्यक्षात त्याने दिलेल्या विकल्पानुसार सदर उमेदवाराची या तीनही संवर्गापैकी फक्त एकाच संवर्गातील पदावर नियुक्ती होणार आहे, असेही आयोगाने म्हटले आहे. 

उर्वरित संवर्गातील पदे रिक्त राहणार आहेत. शासनाने नियुक्ती आदेश दिल्यानंतर विहित कालावधीमध्ये संबंधित उमेदवार त्याच्या पदावर रुजू न झाल्यास ते पद रिक्त राहणार असून त्या पदाकरिता प्रतीक्षा यादीमधून आयोगाकडून शासनास शिफारस करण्यात येणार आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

  या परीक्षेच्या निकालासंदर्भात विविध समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या संदेशांमुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी आयोगाने ही वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. उमेदवारांनी अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही आयोगाने केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!