नांदेडच्या गुरूद्वारात पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला, फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश


नांदेड: शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर नांदेडच्या गुरूद्वारात तलवारीने हल्ला केला. निहंग गटाने नांदेडच्या माता साहिब गुरूद्वारात आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास निहंग गटाने हा सशस्त्र हल्ला केल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यामुळे नांदेड शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल हे त्यांची पत्नी व शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांच्या समवेत आज सकाळी नांदेड साहिब गुरूद्वारात आले होते. त्यावेळी एका निहंगाने त्यांच्या हातावर आणि तलवारीने सपासप वार केले. हा हल्ला झाला तेव्हा तेथे चार निहंगा उपस्थित होते, असे सूत्रांनी सांगितले.

हल्ला झाल्यानंतर सुखबीरसिंग बादल यांच्या सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करून हल्लेखोरांना बाजूला केले. हल्ला करणाऱ्या निहंगाला नांदेड पोलिसांनी अटक केली. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या हल्ल्यानंतर सुखबीरसिंग बादल यांना एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.

या हल्ल्यात सुखबीरसिंग बादल यांच्या हाताला जखम झाली असून रूग्णालयात जाताना त्यांनी नांदेड साहिब गुरूद्वारात सत्कारात देण्यात आलेला सिरोपा हे सन्मानवस्त्र हाताला गुंडाळले होते. या हल्ल्यानंतर उडालेल्या गोंधळात हल्लेखोराने अन्य एका पोलिस अधिकाऱ्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात पोलिस अधिकारीही जखमी झाला. 

सुखबीरसिंग बादल यांच्यावर गुरूद्वारात हल्ला होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये धार्मिक शिक्षा मिळाल्यानंतर अमृतसरच्या गुरूद्वारात ते सेवादार म्हणून सेवा देत असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!