जुन्या सेवा नियमात सुधारणा करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरणार, भरती प्रक्रियेचीही होणार पडताळणी


मुंबई: राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरती संदर्भातील सुरू असलेल्या प्रक्रियेची संपूर्ण पडताळणी करूनच पुढील निर्णय घेतला जाईल. बदलत्या शैक्षणिक व प्रशासकीय गरजांनुसार सेवा नियम सुधारित करून भविष्यातील भरती प्रक्रिया नव्या निकषांनुसार राबवण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बुधवारी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतिबंध लागू केला असून त्यानुसार संभाव्य वेतनपदे, अतिरिक्त पदांचा समावेश, अटी-शर्ती आणि विहित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. शिक्षकेतर संवर्गातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेत पदभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे भुसे म्हणाले.

या भरती प्रक्रियेतील सर्व बाबींची खातरजमा करूनच योग्य निर्णय घेतला जाईल. यासंदर्भातील कार्यवाही आणि नियमावलीची अंमलबजावणी तपासून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. जुन्या सेवा नियमात सुधारणा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगत भविष्यातील गरजा लक्षात घेऊन सुधारित सेवा नियमांच्या आधारे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, असे भुसे यांनी सांगितले.

आ. सुनील कर्जतकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, अनिकेत तटकरे, श्रीकांत भारतीय, डॉ.परिणय फुके, जयंत आसगावकर, विक्रम काळे, बच्चू कडू यांनी सहभाग घेतला.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!