
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका खटल्याच्या सुनावणीवेळी ज्या बेरोजगार तरूणांची ‘झुरळ’ (कॉक्रोच) म्हणून संभावना केली, त्याच बेरोजगार तरूणांपैकी एका तरूणाने ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी) ही व्यंगात्मक राजकीय चळवळ सुरू केली असून ही चळवळ सुरू झाल्यानंतर अवघ्या तीनच दिवसांत २० लाखांहून अधिक सदस्यांनी या चळवळीत सहभाग नोंदवला आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीच्या वेळी देशातील बेरोजगार तरूणांची झुरळाशी तुलना केल्यामुळे देशात वाद सुरू झालेला असतानाच अभिजीत दिपके या छत्रपती संभाजीनगरच्या तरूणाने १६ मे रोजी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘सर्व झुरळांसाठी एक नवीन व्यासपीठ सुरू करत आहोत… तुम्हाला सामील व्हायचे असल्यास खालील लिंकवर क्लिक करा. पात्रतेचे निकषः बेरोजगार, आळशी, सतत ऑनलाइन असणारे, व्यावसायिकपणे आपले मत मांडण्याची क्षमता,’ अशी पोस्ट करत लोकांना ‘कॉक्रोच जनता पार्टी’ जॉइन करण्याचे निमंत्रण देणारा गुगल फॉर्म शेअर केला. अभिजीत दिपके या तरूणाने सुरू केलेल्या या व्यंगात्मक राजकीय चळवळीला पाहता पाहता देशातील जेन-झीने प्रचंड प्रतिसाद दिला आणि अवघ्या तीनच दिवसांत कॉक्रोच जनता पार्टीला २० लाखांहून अधिक सदस्य मिळाले.
जे इंटरनेटवर एक विनोद म्हणून सुरू झाले होते, त्याचे रुपांतर आता एका पूर्ण विकसित व्यंगात्मक ऑनलाइन चळवळीत झाले आहे. कोणतीही नोंदणी नसलेल्या या ‘अनधिकृत पार्टी’ने अवघ्या तीनच दिवसांत म्हणजे २० मेपर्यंत २० लाखांहून अधिक सदस्य नोंदणीचा टप्पा ओलांडला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नंतर आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले असले तरी कॉक्रोच जनता पार्टीचा जलवा जेन-झी मनावर गारूड करायचे थांबला नाही. या पार्टीच्या इंस्टाग्राम पेजवर ४० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत तर एक्सवर एक लाखाहून अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत.
सीजेपी म्हणजे एक मोठा, जिद्दी थवा!
कॉक्रोच जनता पार्टीने स्वतःची वेबसाईटही तयार केली आहे. या वेबसाईटवर एक नजर टाकल्यास या राजकीय व्यंगात्मक चळवळीचे व्हिजन आणि मिशन पहायला मिळते. ‘आम्ही दुसरा पीएम केअर्स फंड सुरू करण्यासाठी, करदात्यांच्या पगारावर दावोसमध्ये सुट्टी घालवण्यासाठी किंवा भ्रष्टाचाराला ‘धोरणात्मक खर्च’ नवीन नाव देण्यासाठी आलेलो नाही. ‘पैसा कुठे गेला?’ हे आम्ही येथे आम्ही मोठ्याने, वारंवार, लेखी स्वरुपात विचारण्यासाठी आलो आहोत. व्यवस्था ज्यांची मोजदाद करायलाच विसरली अशा लोकांचे आम्ही प्रतिनिधित्व करतो, असा दावा ‘आळशी बेरोजगारांचा आवाज’ अशी टॅगलाइन असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी करते. शून्य प्रायोजक आणि पाच मागण्यांसह ‘एक मोठा जिद्दी थवा (Swarm)’ अशी ही पार्टी आपली ओळख सांगते.
‘कॉक्रोच’चा पाच कलमी जाहिरनामा
व्यंगात्मक राजकीय चळवळ म्हणून जन्माला आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीने आपला पाच कलमी जाहिरनामाही प्रसिद्ध केला आहे. राजकीय उत्तदायित्व, माध्यमांवरील नियंत्र, स्त्री-पुरूष प्रतिनिधीत्व आणि निवडणूक सुधारणा या सारख्या महत्वाच्या मुद्द्यांना या जाहिरनाम्यात स्पर्श करण्यात आला आहे. तो पाच कलमी जाहिरनामा असाः
- कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) सत्तेत आल्यास कोणत्याही सरन्यायाधीशांना सेवानिवृत्तीनंतरचे बक्षीस म्हणून राज्यसभेची जागा दिली जाणार नाही.
- नागरिकांचा मतदानाचा हक्क हिसकावून घेणे हे दहशतवादापेक्षा कमी नसल्यामुळे सीजेपी किंवा विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यात कोणतेही वैध मत वगळण्यात आले तर मुख्य निवडणूक आयुक्तांना ‘यूएपीए’अंतर्गत अटक केली जाईल.
- संसदेचे संख्याबळ न वाढवता महिलांना ३३ टक्क्यांऐवजी ५० टक्के आरक्षण दिले जाईल. शिवाय सर्व कॅबिनेट मंत्रीपदांपैकी ५० टक्के पदे महिलांसाठी राखीव असतील.
- खऱ्या अर्थाने माध्यम स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी अंबानी आणि अदानी यांच्या मालकीच्या सर्व माध्यम संस्थांचे परवाने रद्द केले जातील. गोदी मीडियाच्या अँकर्सच्या बँक खात्यांची चौकशी केली जाईल.
- एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या कोणत्याही आमदार किंवा खासदाराला २० वर्षांच्या कालावधीसाठी निवडणूक लढण्यास आणि कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यास बंदी घालण्यात येईल.
कोण आहे अभिजीत दिपके?
कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक आणि संयोजक अभिजीत भगवानराव दिपके हा ३० वर्षीय तरूण मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजचा आहे. त्याचे वडिल अभियंता आहेत. अभिजीतने पुण्यातून ब्रॉडकॉस्ट जर्नलिझम या विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी तो अमेरिकेत गेला आहे. सध्या तो बोस्टन विद्यापीठात जनसंपर्क या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. अभिजीत हा पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट म्हणजे राजकीय संवाद रणनितीकार आहे. ज्यांचे काम नॅरेटिव्हची निर्मिती करणे, सार्वजनिक संदेशन आणि डिजिटल प्लॅटफॉर्म राजकीय मत कसे घडवतात, यावर केंद्रित आहे.
अभिजीतने २०२० ते २०२३ या काळात आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील ‘आप’ने जिंकलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्याने मीम्सआधारित डिजिटल प्रचारावर लक्ष केंद्रित करून काम केले. त्यामुळे आपच्या राजकीय, ऑनलाइन आणि युवा सहभागाला आकाराला मिळाला.
अभिजीतचा सहभाग असलेल्या आपच्या सोशल मीडिया टीमने दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने भिनवलेल्या ‘देश के गद्दारों को गोली मारो सालों को’ या स्लोगनला ‘देश के गवारों को, स्कूल भेजो सारों को’ हे सोशल मीडिया कॅम्पेन राबवून भाजपला सडेतोड उत्तर दिले होते.

