सातारा/मुंबईः महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? हा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेला असतानाच महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटलांच्या या दाव्यावर महाविकास आघातील नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात असून त्या प्रतिक्रियांचा रोख पाहता मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीतच संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालय जेव्हा हा निकाल जाहीर करेल तेव्हा एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार कोसळेल आणि पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल, असे अंदाज बांधले जात आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून वारंवार मुख्यमंत्रिपदाबद्दल भाष्य केले जाऊ लागले आहे.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल. पुढच्या वर्षी कशाला, आत्ताच व्हायला आवडेल, असे म्हटले होते. तेव्हापासून मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही अजित पवारांकडे भावी मुख्यमंत्री म्हणूनच पाहू लागले असतानाच जयंत पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
सध्या महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरातील जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. समाधान याचे आहे की महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार आहे, असा दावा जयंत पाटील यांनी कराड येथे एका कार्यक्रमात बोलताना केला.
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार आहे, हे आता जवळपास सर्वांनीच मान्य केले आहे. तेवढ्या वेगाने आमचा पक्ष पुढे जात आहे. म्हणून मला खात्री आहे की, शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भविष्यात राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, असेही जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटलांच्या या दाव्याच्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आवडेलच, असे वक्तव्य केले होते. आता पाटलांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असा दावा केल्यामुळे या चर्चेला नव्याने फोडणी मिळाली आहे.
मुख्यमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून केल्या जात असलेल्या दाव्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी जयंत पाटलांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘त्यासाठी आपण आधी एकत्र बसू… मग सत्ता येईल आणि त्यानंतर महाविकास आघाडीची बैठक होईल. या बैठकीनंतर नक्कीच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, यात काहीही दुमत नाही. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणे हा महाविकास आघाडीचाच निर्णय होता. भविष्यातही अशाप्रकारचे निर्णय घेतले जातील.’
भाषणात तसे आपण बोलत असतो. त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यात ते बोलतील…काँग्रेसच्या मेळाव्यात नाना पटोले बोलतील आणि आमच्या मेळाव्यात आम्ही बोलू… पण महाविकास आघाडी म्हणून जेव्हा आम्ही एकत्र बसतो, तेव्हा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, अशी आमची भाषा असते, असे संजय राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचा समावेश आहे. सत्ता स्थापनेच्या वेळी शिवसेना हा महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष होता. शिवसेनेकडे ५६, राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५४ आणि काँग्रेसकडे ४४ आमदार होते. परंतु शिवसेनेचे ४० आमदार फुटून एकनाथ शिंदेंसोबत गेल्यामुळे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे.
असे असताना मुख्यमंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून वेळोवेळी दावे केले जाऊ लागल्यामुळे आणि मुख्यमंत्री कोणाचा होणार हे अद्यापही ठरलेले नाही, असा सूर महाविकास आघाडीतील अन्य नेते लावू लागल्यामुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून धुसपूस होऊन राजकीय संघर्ष उभा रहाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.