
पुणेः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या इयत्ता बारावीचा म्हणजेच उच्चमाध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा (एचएससी) निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदाच्या बारावीच्या निकालाची टक्केवारी ८९.७९ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात २.९ टक्क्यांनी घट झाली आहे. कोकण विभागीय मंडळाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ९४.१४ टक्के असून लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८४.१४ टक्के आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी राज्य मंडळात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बारावीचा निकाल जाहीर केला. यावेळी मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक, योजना संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक सहसंचालक डॉ. श्रीराम पानझडे आणि कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची उपस्थिती होती.
गेल्या वर्षी इयत्ता बारावीचा निकाल ९१.८८ टक्के लागला होता. दरवर्षीप्रमाणे याही वर्षीच्या निकालात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. यंदा ९३.२५ टक्के मुली आणि ८६.८० टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ६.३५ टक्क्यांनी जास्त आहे. परीक्षा घेण्यात आलेल्या १५४ विषय़ांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून बारावीच्या परीक्षेसाठी एकूण १४ लाख ४४ हजार ७१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख ३३ हजार ०५८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विभागीय मंडळनिहाय निकाल
- कोकण विभाग- ९४.१४ टक्के
- पुणे विभाग- ९१.२५ टक्के
- अमरावती विभाग- ९०.९२ टक्के
- नाशिक विभाग- ९०.७२ टक्के
- मुंबई विभाग- ९०.०८ टक्के
- कोल्हापूर विभाग- ८९.९७ टक्के
- छत्रपती संभाजीनगर विभाग- ८८.६८ टक्के
- नागपूर विभाग- ८८.६७ टक्के
- लातूर विभाग- ८४.१४ टक्के
गुणवंतांची संख्याही घटली
यंदा बारावीच्या परीक्षेत ७ हजार ५१० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. २३ हजार ९६४ विद्यार्थ्यांना ८५ ते ९० टक्के, ४५ हजार २८६ विद्यार्थ्यांना ८० ते ८५ टक्के, ६७ हजार ४९१ विद्यार्थ्यांना ७५ ते ८० टक्के गुण मिळाले आहेत. ९० हजार १९६ विद्यार्थ्यांना ७० ते ७५ टक्के गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षी बारावीच्या परीक्षेत ८ हजार ३५२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते.यंदा या संख्येत ८४२ ने घट झाली आहे.
शाखानिहाय निकाल
- विज्ञान शाखा- ९६.४४ टक्के
- कला शाखा- ७८.०२ टक्के
- वाणिज्य शाखा- ८७.०४ टक्के
- व्यवसाय अभ्यासक्रम (एमसीव्हीसी)- ८२.७४ टक्के
- आयटीआय शाखा- ८१.७८ टक्के
बोर्ड सर्टिफिकेटवर नावात बदल
यापूर्वी गुणपत्रिका आणि बोर्ड सर्टिफिकेटवर आडनाव, विद्यार्थ्याचे नाव आणि मग वडिलांचे नाव यायचे. यावेळी त्यात बदल करण्यात आला आहे. आता अपार आयडी किंवा आधार कार्डवर ज्याप्रमाणे नाव असते तसेच नाव गुणपत्रिका आणि बोर्ड सर्टिफिकेटवर देण्यात येणार आहे. गुणपत्रिका आणि सर्टिफिकेटसाठी ए-४ साईजचा कागद वापरला गेला आहे. त्यावर विद्यार्थ्याचा फोटो आणि क्यूआर कोड वापरला गेला आहे.
