‘एबीव्हीपी ही कुत्र्यांचीच संघटना…परत एकदा सांगतो..कुत्र्यांचीच संघटना…रेकॉर्ड करून पाठवू का तुला?’ जेईएसचे प्राचार्य डॉ. गणेश अग्नीहोत्री यांची वादग्रस्त क्लिप


जालनाः जालना येथील जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्नीहोत्री यांनी मोठ्या ‘आत्मविश्वासा’ने आणि ‘धाडसा’ने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) विद्यार्थी आघाडी असलेली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी/अभाविप) ही ‘कुत्र्यांचीच संघटना’ असल्याचे ‘प्रशस्तीपत्र’ देऊन नवा वाद ओढवून घेतला आहे. विशेष म्हणजे स्वतःला आरएसएसचा ‘निष्ठावान स्वयंसेवक’ असल्याचे सांगत फिरणाऱ्या प्राचार्य अग्नीहोत्री यांनीच अभाविपबाबत असे विधान केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

११ एप्रिल रोजी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जेईएस महाविद्यालयाच्या प्रांगणात पक्षीमित्र अभियानाचे आयोजन केले होते. उन्हाळा असल्यामुळे झाडांवर पक्षांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था करण्याच्या हेतूने हे अभियान आयोजित करण्यात आले होते. या अभियानाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. गणेश अग्नीहोत्री यांच्या हस्ते करावे या हेतूने अभाविपचे जालना जिल्हा समन्वयक पवन नरवडे आणि अभाविपचे अन्य कार्यकर्ते प्राचार्य डॉ. अग्नीहोत्री यांच्याकडे गेले.

नरवडे आणि अभाविपचे अन्य कार्यकर्ते दालनात आल्यानंतर ‘केवळ आंदोलने करण्यापेक्षा पक्षीमित्र अभियानासारखे चांगले उपक्रम राबवत जा’ असा तिरकस सल्ला प्राचार्य डॉ. गणेश अग्नीहोत्री यांनी पवन नरवडे आणि अन्य कार्यकर्त्यांना दिला. तिथून बाचाबाचीला सुरूवात झाली. या बाचाबाचीत ‘एबीव्हीपी ही कुत्र्यांचीच संघटना’ असल्याचे ‘प्रशस्तीपत्र’ प्राचार्य डॉ. गणेश अग्नीहोत्री यांनी मोठ्या ‘आत्मविश्वासा’ने आणि ‘धाडसा’ने देऊन टाकले. या वादग्रस्त विधानानंतर कार्यकर्त्यांनी प्राचार्यांकडून उधळली जात असलेली स्तुतीसुमने मोबाइलमध्ये रेकॉर्ड करायला सुरूवात केली….हा वाद वाढतच गेला. अभाविपचे कार्यकर्ते पवन नरवडे आणि प्राचार्य डॉ. अग्नीहोत्री यांच्यातील हाच तो संवाद

प्राचार्य अग्नीहोत्रीः सर इथे लिहून टाका या ऑर्गनायझेशनला बंदी म्हणून…
कार्यकर्ता नरवडे: सर तसं नाही…एबीव्हीपीला कुत्रे वगैरे म्हणून नका…
प्राचार्य अग्नीहोत्रीः अरे काही फरक पडत नाही मला…काही फरक पडत नाही मला… कुत्र्यासारख्याच…परत एकदा सांगतो… कुत्र्यासारख्याच!
कार्यकर्ता नरवडे: सर तसं म्हणू नका..प्लीज….
प्राचार्य अग्नीहोत्रीः नाही, कुत्र्यासारख्याच…मी रेकॉर्ड करून पाठवू का तुला?  म्हणजे तू सगळीकडे व्हायरल करशील…लगेच करतो मी…
कार्यकर्ता नरवडे: मला वैयक्तिक काय म्हणायचे ते म्हणा सर पण संघटनेला तसे बोलू नका..
प्राचार्य अग्नीहोत्रीः परत एकदा सांगतो…एबीव्हीपी ही कुत्र्यांचीच ऑर्गनायझेशन आहे.
कार्यकर्ता नरवडे: तसं नाही सर…तुमच्याकडून मला अशी अपेक्षा नाही…तुम्ही असे बोलसाल म्हणून…
प्राचार्य अग्नीहोत्रीः तुझ्याकडून मला अपेक्षाच नाही ना…हे बघ माझ्याबद्दल तुला काहीही इमेज असो…तू निगेटिव्ह इमेज घेऊन जा मला काही फरक नाही पडणार…
कार्यकर्ता नरवडे: माझा वैयक्तिक तुमच्याशी काहीही संबंध नाही. कॉलेजमध्ये ऍडमिशन आहे म्हणून संबंध आहे…
प्राचार्य अग्नीहोत्रीः (त्वेषाने) ऑर्गनायझेशन म्हणून मला त्या ऑर्गनायझेशनचा राग आहे राग…
कार्यकर्ता नरवडे: तुमच्या वैयक्तिक विरोधात काही आंदोलन केलेले नाही…त्यामुळे तुम्हाला राग असण्याचे काही कारण नाही…
प्राचार्य अग्नीहोत्रीः वैयक्तिक नाही? अरे तुम्ही काय केलंय माहितीय का…ज्या गोष्टींचा संबंध नव्हता आपला त्या गोष्टीवर यांनी आंदोलन केलंय….
कार्यकर्ता नरवडे: नाही नाही…एखादी व्यक्ती किंवा विद्यार्थ्याला घेऊन आम्ही आंदोलन नाही करत…
प्राचार्य अग्नीहोत्रीः कशाला गोष्टी करता रे तुम्ही…तुमच्यापेक्षा राजकारण जास्त कळत असेल ना आम्हाला…
कार्यकर्ता नरवडे: नाही, ही गोष्ट तुमच्या लक्षात नाही आली सर…
प्राचार्य अग्नीहोत्रीः अच्छा प्राचार्यांना तू असं बोलतो…
कार्यकर्ता नरवडे: हां बोलतोय…
प्राचार्य अग्नीहोत्रीः (उपरोधिकपणे) हे तुमच्या लक्षात आलं नाही?

त्यानंतर बाचाबाची वाढत गेली आणि प्राचार्य अग्नीहोत्री यांच्या रागाचा पारा वाढतच गेला…सुरक्षा रक्षकांना बोलावून कार्यकर्त्यांना बाहेर हाकलून लावा असे फर्मान सोडले….‘सेक्युरिटीला बोलवा आणि बाहेर हाकला यांना…बाहेर निकालो इनको…. अरे त्याच्या मुसक्या धरा आणि बाहेर हाकला त्यांना…’  असे प्राचार्य अग्नीहोत्री बोलत असताना या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.

अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मोबाइलवर रेकॉर्ड केलेली ही ऑडिओक्लिप समाजमाध्यमावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. प्राचार्य डॉ. अग्नीहोत्री यांनी अभाविपबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी बुधवारी अभाविपचे देवगिरी प्रांताचे प्रदेश मंत्री डॉ. वरूणराज नन्नवरे यांच्या नेतृत्वाखाली जेईएस महाविद्यालयात कुत्रेसोबत घेऊनच ‘विद्यार्थी आत्मसन्मान’ आंदोलन केले. या आंदोलनाच्या वेळी जेईएस महाविद्यालयातील एक महिला प्राध्यापिका, कर्मचारी आणि अभाविपचे पदाधिकारी/कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकही उडाली.

प्राचार्य डॉ. अग्नीहोत्री यांच्याविरोधात पोलिसांत दोन तक्रारी करण्याची घोषणा अभाविपचे देवगिरी प्रांताचे प्रदेश मंत्री डॉ. वरूणराज नन्नवरे यांनी केली आहे. आता ते या निर्णयावर ठाम राहतात की ‘प्राचार्यांनी माफी मागितली, ही बाब विचारात घेतली आहे’ असे सांगत ‘विद्यार्थी आत्मसन्माना’शी तडजोड करतात, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. न्यूजटाऊनने प्राचार्य डॉ. अग्नीहोत्री यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!