पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी सुरू, सीए आणि मुख्य व्यवस्थापकावरही होणार कारवाई


मुंबई: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजातील आर्थिक गैरप्रकारांबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून विविध पातळ्यांवर चौकशी सुरू आहे. कारखाना भाडे तत्वावर देताना केलेल्या त्रिपक्षीय करारातील अटींचा भंग झाला असल्यास साखर आयुक्तांकडे लवाद प्रक्रियेअंतर्गत (आर्बिट्रेशन) प्रकरण चालवण्याची कार्यवाहीही करण्यात येईल, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गुरूवारी विधानसभेत दिली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यासंदर्भात आमदार विलास भुमरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उत्तर दिले.

संत एकनाथ सहकारी साखर कारखाना २०१४-१५ मध्ये सचिन घायाळ शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला १८ वर्षांच्या कराराने भाडे तत्वावर देण्यात आला होता. त्या वेळी कंपनीने सुमारे ५७ कोटी रुपयांचे दायित्व स्वीकारले होते. मात्र कारखान्याच्या कामकाजाबाबत काही तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर लेखापरीक्षण करण्यात आले. या लेखापरीक्षणात काही आर्थिक गैरप्रकार आढळून आले. या प्रकरणात २६ फेब्रुवारी रोजी सचिन घायाळ शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या सर्व भागधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहकारी संस्थांच्या कायद्यातील कलम ८३ अंतर्गत स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली असून ती लवकर पूर्ण करून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल. याशिवाय कारखान्याचे लेखापरीक्षण करणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंटविरुद्धही कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कारखान्यात मुख्य व्यवस्थापक (सीएम) म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

कारखान्याने बुलढाणा अर्बन बँकेकडून ३० कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याची बाबही खरी असून त्यापैकी १३ कोटी ८३ लाख रुपये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे देणे फेडण्यासाठी वापरल्याचे दिसून आले आहे. उर्वरित १६  कोटी १७ लाख रुपये कारखान्याच्या आधुनिकीकरणासाठी वापरल्याचा दावा करण्यात आला असला तरी त्याची पडताळणी सुरू असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!