
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे पदच्च्युत अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती मानसिंग पवार आणि त्यांच्यासोबत विश्वस्त मंडळात असलेल्या टोळीने प्लॉटिंग करून विकलेल्या संस्थेच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर सध्या टोलेजंग बंगले उभे आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या सह धर्मादाय आयुक्तांनी मानसिंग पवारांसह नऊ जणांची संस्थेच्या विश्वस्त मंडळातून हकालपट्टी करतानाच संस्थेच्या मालकीची ही जागा ताब्यात घेण्याचे आदेश संस्थेच्या विश्वस्त मंडळाला दिले आहेत. विशेष म्हणजे रोख रक्कम मोजून प्लॉट खरेदी करणाऱ्या प्लॉटधारकांनीच अतिक्रमण केले, असे भासवण्याचा प्रयत्न मानसिंग पवार यांनी केला. आता संस्थेचे विद्यमान विश्वस्त मंडळ ही जागा ताब्यात घेण्याची कारवाई कधी आणि कशी सुरू करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कन्नडच्या श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मानसिंग बाळासाहेब पवार आणि संस्थेच्या अन्य ९ पदाधिकाऱ्यांनी कन्नडमधील सर्वे नंबर ४०/२ मध्ये प्लॉट क्रमांक १ ते १०६ असा लेआऊट प्लॉन मंजूर झाल्यानंतर याच सर्वे क्रमांकातील संस्थेच्या मालकीच्या मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे प्लॉट क्रमांक १०७ ते १२६ चे नकाशे तयार केले आणि हे प्लॉट विविध व्यक्तींना विकले, अशी तक्रार संस्थेचे सभासद दिलीप पाटील व बिपीन थोरात यांनी सह धर्मादाय आयुक्तांकडे दाखल खटल्यात केली होती.
कन्नडमधील सावित्राबाई फुले कन्या विद्यालयाजवळ ही जागा आहे. स्नेहनगर आणि सुवर्ण पालेश्वर कॉलनी म्हणून ओळखल्या जाणारी ही कन्नडमधील उच्चभ्रूंची वसाहत आहे. श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मालकीच्या या जागेवर सध्या कन्नड शहरातील नामवंत व्यक्तींचे टोलेजंग बंगले उभे आहेत. छत्रपती संभाजीनगरचे सह धर्मादाय आयुक्त आर. एस. पावसकर यांनी ही जागा ताब्यात घेण्याचे आदेश संस्थेच्या संचालक मंडळाला दिले आहेत. त्यामुळे संस्थेचे संचालक मंडळ बंगल्यांसह ही जागा ताब्यात घेणार की कसे? हा कळीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सर्वे नंबर ४०/२ मधील मंजूर लेआऊट प्लॅनमधील मोकळी जागा कन्नड नगर परिषदेला हस्तांतरित केली आहे, आम्ही मोकळ्या जागेवर प्लॉट क्रमांक १०७ ते १२६ तयार केले नाहीत किंवा ते कोणत्याही व्यक्तीला विकले अथवा हस्तांतरित केलेले नाहीत, असा युक्तीवाद या खटल्याच्या सुनावणीदरम्यान मानसिंग पवार आणि अन्य सदस्यांनी केला. १९७५ मध्ये सर्वे नंबर ४०/२ मध्ये लेआऊट प्लॅन मंजूर झाला होता आणि या लेआऊट प्लॅनमध्ये मोकळ्या जागेची तरतूद होती, असे मानसिंग पवार यांनी सुनावणीदरम्यान मान्य केले.
सर्वे नंबर ४०/२ मधील प्लॉट नंबर १०७ ते १२६ विकण्यात आल्याचा मानसिंग पवार यांनी इन्कार केला. परंतु प्लॉट नंबर १०७ ते १२६ वर काही व्यक्ती अतिक्रमण करून रहात असल्याची आपल्याला कल्पना आहे. या प्लॉट्सशी संस्थेचा काहीही संबंध नाही. संस्थेने सर्वे नंबर ४०/२ च्या मंजूर लेआऊट प्लॅनमधील मोकळी जागा कन्नड नगर परिषदेला हस्तांतरित करण्यात आल्यामुळे या मोकळ्या जागेचे नियमन आणि विकास करण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे, असे सांगत मानसिंग पवार यांनी अंग झटकण्याचा प्रयत्न केला.
एकीकडे त्यांनी असा दावा करताना त्याचवेळी या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध मनाई आदेशासाठी संस्थेने २०२४ मध्ये विशेष दिवाणी खटला दाखल केल्याचेही सांगितले. परंतु महसुली दस्तऐवजांमुळे मानसिंग पवार आणि त्यांच्या टोळीची बनवेगिरी उघडी पडली आणि त्यांनी प्लॉट नंबर १०७ ते १२६ बेकायदेशीरपणे विविध व्यक्तींना हस्तांतरित केल्याचे स्पष्ट झाले. संस्थेच्या मालकीच्या जागेवर प्लॉट पाडून त्याची विक्री कोणा-कोणाला करण्यात आली, याची सविस्तर नोंद सह धर्मादाय आयुक्त आर. एस. पावसकर यांनी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या निकालात घेण्यात आली आहे. ती अशी-
कोणा-कोणाला विकले प्लॉट?
- संस्थेचे तत्कालीन सचिव लक्ष्मण नानासाहेब मोहिते यांनी सर्वे नंबर ४०/२ मधील १६७.५१ चौरस मीटर क्षेत्रफळाचा प्लॉट नंबर ११८ हा ३ जून १९९३ रोजीच्या विक्रीपत्राद्वारे मीना गणेश कुलकर्णी यांना विक्री केला. या प्लॉटवर टोलेजंग बांधकाम झालेले आहे.
- प्लॉट नंबर १०७ संतोष आनंदराव जंगले यांना विकण्यात आला. नंतर जंगले यांनी हा प्लॉट नोंदणीकृत विक्रीपत्राव्दारे ९ जून २०११ रोजी दिगंबर रघुनाथ नलावडे यांना विकला.
- प्लॉट नंबर १०८ नानासाहेब दागू भोजने यांना विकण्यात आला. भोजने यांनी हा प्लॉट नंतर २० मे २०११ रोजीच्या नोंदणीकृत विक्रीपत्राद्वारे संतोष कैलास रिंधे यांना विकला.
हेही वाचाः लोकायुक्तांच्या आदेशानुसार प्राचार्य डॉ. विजय भोसलेंना दोन वेतनवाढी रोखण्याची ‘शिक्षा’, पण आदेश डावलून त्याही परस्पर घातल्या घश्यात! - संस्थेने दि. २८ एप्रिल १९९४ रोजी जारी केलेल्या वाटपपत्राद्वारे प्लॉट नंबर ११३ आणि ११४ संस्थेचेच सदस्य अन्वर खान मोहम्मद नूर खान यांना विकण्यात आला. म्यूटेशन एन्ट्री क्रमांक ९९६६ द्वारे या प्लॉटच्या हक्काच्या अभिलेखात त्यांच्या नावाची नोंद घेण्यात आली.
- प्लॉट नंबर १०९ मधुकर बच्चू राठोड यांना विकण्यात आला. सध्या या प्लॉटवर रविंद्र मधुकर राठोड यांचा बंगला आहे. त्यांच्या पत्नी रंजना रविंद्र राठोड या सध्या कन्नड नगरपरिषदेच्या उपाध्यक्षा आहेत.
- प्लॉट नंबर ११० मनीषा मधुकर महाले व शिवाजी टाक यांना विकण्यात आला. त्यांनी या प्लॉटवर संयुक्त बांधकाम केले आहे.
हेही वाचाः शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय भोसलेंची सेवापुस्तिकाच खोटी, संस्थेच्या सरचिटणीसांनी २६ वर्षांपूर्वी केली होती तक्रार; पण सहसंचालकांकडून कारवाई शून्य - दिनांक २८ एप्रिल १९९४ रोजीच्या वाटपपत्राद्वारे प्लॉट नंबर १११ आणि ११२ अनुक्रमे अजयकुमार कन्हैय्यालाल वर्मा आणि संजयकुमार कन्हैय्यालाल वर्मा यांना विकण्यात आला.
- संस्थेने दिलेल्या वाटपपत्राआधारे प्लॉट नंबर ११५ किरण नथू बोरसे यांना विकण्यात आला. ३१ मे २००३ च्या म्यूटेशन एन्ट्रीद्वारे त्यांच्या हक्कांची नोंद या प्लॉटच्या अभिलेखात घेण्यात आली. त्यांनी हा प्लॉट नंतर सुदाम नेमीचंद राठोड यांना विकला. म्यूटेशन एन्ट्री नंबर १४२९९ द्वारे त्यांच्या हक्काची नोंद या प्लॉटच्या अभिलेखात घेण्यात आली.
- प्लॉट नंबर ११९ रचना पांडे आणि कांतीलाल कासलीवाल यांना विकण्यात आला. या प्लॉटवर सामाईक बांधकाम करण्यात आले आहे.
- प्लॉट नंबर १२० भाऊसाहेब एकनाथ पवार यांना विक्री करण्यात आला.
- प्लॉट नंबर १२१-ए व प्लॉट नंबर १२१-ब शकुंतला पांडुरंग कदम आणि पोपटराव राजधर आहेर यांना विकण्यात आला. ३० ऑगस्ट २००४ आणि १६ जुलै २०१३ रोजीच्या म्यूटेशन एन्ट्रीद्वारे त्यांच्या हक्काची नोंद या प्लॉटच्या अभिलेखात घेण्यात आली.
- प्लॉट नंबर १२२ भाऊसाहेब रामकृष्ण बारगळ आणि प्लॉट नंबर १२३ नाना पुंजाबा थेटे यांना विक्री करण्यात आला.
- प्लॉट नंबर १२४ ते १२६ नेमके कोणाला विक्री करण्यात आले, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

