उद्योगपती मानसिंग पवार यांच्यासह ९ जणांची कन्नडच्या छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त मंडळातून हकालपट्टी, सह धर्मादाय आयुक्तांचा दणका


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): कन्नड येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मालकीच्या जागेचे संरक्षण करण्याऐवजी त्या जागेवर प्लॉटिंग करून त्या भूखंडांची बेकायदेशीरपणे विक्री केल्याप्रकरणी आणि संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापकपदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीस संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापकपदी नियुक्ती करून त्याला कोणतेही व्याज न आकारता संस्थेची रक्कम वापरू दिल्याप्रकरणी दोषी ठरवून छत्रपती संभाजीनगर विभागाचे सह धर्मादाय आयुक्त आर.एस. पावसकर यांनी छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती मानसिंग पवार यांच्यासह ९ जणांची संस्थेच्या विश्वस्त मंडळावरून हकालपट्टी केली आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या मालमता व निधीचा गैरवापर करणाऱ्या संस्थाचालकांना चांगलाच चाप बसणार आहे.

छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मानसिंग बाळासाहेब पवार आणि संस्थेच्या अन्य ९ पदाधिकाऱ्यांनी आर्थिक अनियमितता, गैरव्यवहार आणि संस्थेच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करत त्यांना महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त संस्था १९५० च्या कलम ४१ ड अन्वये संस्थेच्या विश्वस्त मंडळावरून काढून टाकण्याची मागणी करणारा अर्ज छत्रपती संभाजीनगर येथील बिपीन राजाराम थोरात आणि कन्नड येथील दिलीप नारायणराव पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर विभागाच्या सह धर्मादाय आयुक्तांकडे १९ मे २०१६ रोजी केला होता. त्या अर्जावर तब्बल ९ वर्षे, ९ महिने आणि ८ दिवस प्रदीर्घ सुनावणी झाल्यानंतर सह धर्मादाय आयुक्त पावसकर यांनी संस्थेचे अध्यक्ष मानसिंग पवार यांच्यासह नऊ जणांना संस्थेच्या विश्वस्त मंडळावरून हकालपट्टी केल्याचा निर्णय २७ फेब्रुवारी रोजी दिला.

हेही वाचाः ‘शालार्थ आयडी’प्रमाणेच ‘एचटीई सेवार्थ’मध्येही घोटाळा? बोगस नियुक्त्यांवर वेतन अनुदानाची उधळण, वाचा कन्नडच्या प्राचार्याच्या नियुक्तीचे धक्कादायक प्रकरण

कन्नड येथील सर्वे क्रमांक ४०/२ मधील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मालकीच्या जागेवर भूखंड क्रमांक १ ते १०६ असा लेआऊट प्लॅन मंजूर झाला. या लेआऊट प्लॅनमध्ये संस्थेच्या मोकळ्या जागेचे संरक्षण करण्यात संस्थेचे अध्यक्ष मानसिंग पवार व अन्य पदाधिकारी अपयशी ठरले. मानसिंग पवार व संस्थेच्या अन्य विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे भूखंड क्रमांक १०७ ते १२६ चे नकाशे तयार केले आणि विविध व्यक्तींना या भूखंडांची विक्री केली, असा आरोप थोरात आणि पाटील यांनी सह धर्मादाय आयुक्तांकडे केलेल्या अर्जात केला होता.

 या भूखंडांच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेचा त्यांनी गैरव्यवहार केला. त्यांनी सर्वे क्रमांक ३० आणि ३१ मधील अतिक्रमित जागेवर मुलांचे वसतिगृह, व्यायामशाळा आणि कॅंटिनच्या बेकायदेशीर बांधकामासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) मिळालेल्या निधीचा गैरवापर करून संस्थेचे आर्थिक नुकसान केले, असा आरोपही बिपीन थोरात व दिलीप पाटील यांनी केला होता.

हेही वाचाः प्राचार्यपदी तर दूरच, डॉ. विजय भोसले सहायक प्राध्यापकपदावर नियुक्तीसही अपात्र, कन्नडच्या शिवाजी महाविद्यालयाचा नियुक्ती आदेशही नियमबाह्य!

मानसिंग पवार यांनी आपले पद व अधिकारांचा दुरूपयोग करून प्रा. डॉ. व्ही.एन. भोसले हे संस्थेच्या कन्नड येथीलच कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापक म्हणून कार्यरत असतानाही त्यांची बेकायदेशीरपणे संस्थेच्या शिवाजी वरिष्ठ महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली आणि संस्थेच्या बँक खात्यातून त्यांना १ लाख ८६ हजार २४५ रुपये जास्तीचे वेतन अदा केले. त्यामुळे महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायद्याच्या कलम ४१ डमधील तरतुदींनुसार विश्वस्त मंडळातून काढून टाकण्यास पात्र ठरतात, असा जोरदार युक्तीवाद बिपीन थोरात व दिलीप पाटील यांनी सह धर्मादाय आयुक्तांकडे केला.

या आरोपांचा प्रतिवाद करताना मानसिंग पवार व संस्थेच्या अन्य विश्वस्तांनी गैरव्यवहाराचे आरोप फेटाळून लावले. मंजूर झालेल्या लेआऊट प्लॅनमधील मोकळी जागा कन्नड नगर परिषदेला हस्तांतरित करण्यात आली असून संस्थेच्या मोकळ्या जागेवर आम्ही भूखंड क्रमांक १०७ ते १२६ तयार केले नाहीत किंवा अन्य कोणत्या व्यक्तीला हे भूखंड हस्तांतरित केले नाहीत. आम्ही कोणत्याही जमिनीवर अतिक्रमण केले नाही किंवा निधीचा गैरवापरही केलेला नाही, असा बचावात्मक युक्तिवाद केला.

हेही वाचाः लोकायुक्तांच्या आदेशानुसार प्राचार्य डॉ. विजय भोसलेंना दोन वेतनवाढी रोखण्याची ‘शिक्षा’, पण आदेश डावलून त्याही परस्पर घातल्या घश्यात!

संस्थेच्या विश्वस्त मंडळातून आम्हाला काढून टाकण्यासाठीच अर्जदारांनी खोटे आणि निराधार आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळून लावण्यात यावा, असा युक्तीवादही मानसिंग पवार व अन्य प्रतिवादींनी केला. मात्र मानसिंग पवार व अन्य प्रतिवादींचा युक्तिवाद फेटाळून लावत सह धर्मादाय आयुक्त पावसकर यांनी मानसिंग पवार व अन्य प्रतिवादींविरुद्ध महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या कलम ४१ ड (१) (सी) आणि (डी) मधील तरतुदींनुसार आरोप निश्चित केले.

सह धर्मादाय आयुक्तांची निरीक्षणे

  • मानसिंग पवार व अन्य प्रतिवादींनी सर्वे क्रमांक ४०/२ मध्ये मंजूर लेआऊट प्लॅनमधील संस्थेची मालमत्तेचे म्हणजेच मोकळ्या जागेचे संरक्षण करण्यात अपयशी ठरून त्यांच्या कर्तव्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले.
  • मानसिंग पवार व अन्य प्रतिवादींनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त संस्था कायद्याच्या कलम ३६(१)(अ) मधील तरतुदींचे उल्लंघन करून संस्थेच्या मालकीच्या जागेवर बेकायदेशीररित्या भूखंड क्रमांक १०७ ते १२६ तयार करून विविध व्यक्तींना विकले.
  • मानसिंग पवार यांनी प्रा. डॉ. व्ही.एन. भोसले हे संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापक म्हणून नोकरीला असतानाही त्यांना संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापकपदी नियुक्त करून संस्थेच्या खात्यातून १ लाख ८६ हजार २४५ रुपये वेतन देऊन संस्थेचे आर्थिक नुकसान केले. त्यांना संस्थेचा पैसा बिनव्याजी वापरू दिला.
  • हेही वाचाः शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय भोसलेंची सेवापुस्तिकाच खोटी, संस्थेच्या सरचिटणीसांनी २६ वर्षांपूर्वी केली होती तक्रार; पण सहसंचालकांकडून कारवाई शून्य
  • कन्नड येथील सर्वे क्रमांक ४०/२ मधील जागा ही संस्थेचीच मालमत्ता आहे आणि तिची नोंद संस्थेच्या श्येड्यूल-१मध्ये घेण्यात आलेली आहे. सर्वे क्रमांक ४०/२ मधील भूखंडावर १९७५ मध्येच लेआऊट प्लॅन मंजूर करण्यात आला होता आणि त्या लेआऊट प्लॅनमध्ये मोकळ्या जागेसाठी (ओपन स्पेस) तरतूद करण्यात आली होती, हे मानसिंग पवार यांनी कबुल केले.
  • छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाने सर्वे क्रमांक ४०/२ मधील १६७.५१ चौरस मीटर जागा मीना गणेश कुलकणी यांना १९९३ मध्ये विकली आणि वाटप पत्रांच्या आधारे संस्थेने १९९३ पासून काही भूखंड हस्तांतरित केले.
  • हेही वाचाः हम करे सो कायदा: व्यवस्थापन परिषदेचा निर्णय पायदळी तुडवत कुलगुरू डॉ. विजय फुलारींनी केली मराठी विभागप्रमुखपदी डॉ. रमेश जाधवांची नियुक्ती!
  • महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त संस्था कायद्याच्या कलम ३६(१) मधील तरतुदींचे उल्लंघन करून भूखंड क्रमांक १०७ ते १२६ विकण्यात आले किंवा हस्तांतरित करण्यात आले, हे स्पष्ट होते.
  • संस्थेच्या मालमत्तेचे अतिक्रमणापासून संरक्षण करण्यात आणि सर्वे क्रमांक ४०/२ मधील अतिक्रमित जमिनीचा ताबा परत मिळवण्यात तातडीने कारवाई करण्यात अपयशी ठरून मानसिंग पवार आणि अन्य प्रतिवादींनी त्यांच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केले.

मानसिंग पवारांसह या ९ विश्वस्तांची हकालपट्टी

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर आणि सादर केलेले साक्षी-पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर सह धर्मादाय आयुक्त आर. एस. पावसकर यांनी मानसिंग पवार यांच्यासह नऊ पदाधिकाऱ्यांची संस्थेच्या विश्वस्त मंडळातून हकालपट्टी केल्याचा निर्णय दिला आणि संस्थेच्या विश्वस्त मंडळाने कन्नड येथील सर्वे क्रमांक ४०/२ मधील भूखंड क्रमांक १०७ ते १२६ सह मोकळ्या जागेचा ताबा मिळवण्यासाठी पावले उचलावीत, असाही आदेश दिला. हकालपट्टी झालेल्या विश्वस्तांची नावे अशीः मानसिंग बाळासाहेब पवार, (अध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर), अशोक आबाराव आहेर (टाकळी, ता. कन्नड), डॉ. दामोदर धोंडीबा शिंदे (कन्नड), डॉ. आनंदराव कोंडदराव महाले (कन्नड), चंद्रकांत बाबुराव देशमुख (कन्नड), चिंतामण गुलाबराव मोरे (कन्नड), बाबासाहेब लक्ष्मणराव मोहिते (छत्रपती संभाजीनगर), कृष्णाराव शामराव पाटील (गव्हाळी), डॉ. पांडुरंग केशवराव निकम ( संस्थेचे सचिव, छत्रपती संभाजीनगर).

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!