
लातूरः काँग्रेसचे दिवगंत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसून टाकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपची लातूरकरांनी चांगलीच जिरवली. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या युतीने ४७ जागांवर दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमताचा आकडा पार केला. या निवडणुकीत भाजपला केवळ २२ जागा मिळाल्या. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यापैकी ४ उमेदवार विजयी झाले आहेत. लातूरमधील ‘वंचित’च्या विजयाचा स्ट्राईक रेट तब्बल ९९ टक्के आहे.
लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लातूरमधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला होता. लोकनेते असलेल्या विलासराव देशमुख यांच्याबद्दल लातूरकरांच्या मनात आदराची भावना आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या विधानामुळे लातूरमध्ये भाजप बॅकफूटवर गेला आणि चव्हाणांचे विधान भाजपला चांगलेच महागात पडले.
लातूर महानगरपालिकेच्या ७० जागांसाठी काल गुरूवारी मतदान झाले. आज सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर लातूरकरांनी विलासराव देशमुखांबद्दल त्यांच्या मनात असलेला आदर ईव्हीएममधून दाखवून दिला आणि काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी युतीच्या पारड्यात तब्बल ४७ जागा टाकल्या. त्यापैकी काँग्रेसने ४३ तर वंचित बहुजन आघाडीने ४ जागा जिंकल्या.
काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या युतीने लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठी मुसंडी मारत बहुमताचा आकडा पार केला आणि भाजपची दाणादाण उडवली. २०१७ मध्ये लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ३६ जागा जिंकून लातूर महापालिकेची सत्ता मिळवणाऱ्या भाजपला या निवडणुकीत केवळ २२ जागा मिळाल्या.
विशेष म्हणजे लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एक जागा मिळाली. त्यामुळे लातूरमध्ये काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीचीच सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘वंचित’च्या विजयाचा स्ट्राईक रेट ९९ टक्के!
लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती होती. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने फक्त ५ उमेदवारच उभे केले होते. त्यापैकी ४ उमेदवार मताधिक्याने विजयी झाले आहेत. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या विजयाचा स्ट्राईक रेट तब्बल ९९ टक्के इतका आहे. अन्य कोणत्याही राजकीय पक्षाच्या विजयाचा स्ट्राईक रेट वंचित एवढा नाही.
या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार अंकिता भडीकर (प्रभाग क्रमांक-२ अ, ४ हजार ३९० मते), सचिन गायकवाड (प्रभाग क्रमांक-४ अ, ५ हजार ५६८ मते), निकिता सोमवंशी (प्रभाग क्रमांक-७ अ, ४ हजार ६७६ मते) आणि अमोल लांडगे (प्रभाग क्रमांक-१३) मधून विजयी झाले आहेत.
