अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकासाठी राज्यस्तरीय स्पर्धा जाहीर, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): राज्यात पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीक स्पर्धा सन २०२५-२६ जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेअंतर्गत रब्बी हंगामातील रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पाच पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनिल वानखेडे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती व मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने व नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन दरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबवण्यात येते.

पीक निहाय (प्रत्येक पीकासाठी स्वतंत्र) सर्वसाधारण गटासाठी ३०० रूपये व आदिवासी गटासाठी १५० रूपये शुल्क राहील. स्पर्धेच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय तसेच आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!