
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक, कलावंत मानधन सन्मान योजनेसाठी सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी समिती गठीत केली असून या समितीवर ज्येष्ठ लोककलावंत, शाहीर डॉ. शेषराव पठाडे यांच्यासह अन्य चौदा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष आहेत तर उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रापं) हे सदस्य सचिव राहणार आहेत. समितीत अशासकीय साहित्यिक सदस्य म्हणून डॉ. शेषराव पठाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय रंगनाथ जोगदंड, गणेश निकम, आदिनाथ कुबेर, वशिष्ठ शिरसाट, अविनाश शिरसाट, नामदेव गायकवाड, सदानंद मगर, सीताराम मते, चंद्रकांत सावंत यांचीही सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिकेचे उपायुक्त, सांस्कृतिक संचालनालयाचे सहायक संचालक, जिल्हा समाज कल्याण अधिकारी हेही पदसिद्ध शासकीय सदस्य असणार आहेत.
ज्येष्ठ साहित्यिक, लोककलावंत, कलाकार यांना वृद्धापकाळात जीवन सुखकर जावे यासाठी राज्य सरकारकडून राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक, कलावंत मानधन सन्मान योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत या क्षेत्रातील ज्येष्ठ आणि गरजू व्यक्तींना दरमहा पाच हजार मानधन दिले जाते. या योजनेसाठी अर्ज आपले सरकार पोर्टलवरून ऑनलाइन भरावा लागतो. जिल्ह्यातील प्रलंबित अर्ज समितीने निकाली काढावेत आणि गरजूंना न्याय द्यावा, अशी अपेक्षा कलावंत बाळगून आहेत.
डॉ. शेषराव पठाडे हे प्रसिद्ध लोककलांवत आणि शाहीर आहेत. या समितीवर अशासकीय साहित्यिक सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक, लोककलावंत आणि कलाकारांच्या मानधनाचा प्रश्न वेगाने निकाली लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या नियुक्तीबद्दल डॉ. पठाडे यांनी सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह सर्व संबंधितांचे आभार मानले आहेत.
