
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): देशात कोणत्या जाती-धर्माचा पक्षकार आहे, हे पाहून न्याय दिला जात असून रामजन्मभूमी देशातील कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा विषय असल्याचे सांगत ती हिंदूंच्या हवाली करण्यात आली. परंतु बोधगयेतील महाबोधी महाविहार हा केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील कोट्यवधी बौद्धांच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय असतानाही रामजन्मभूमीचाच निकष लावून महाविहार बौद्धांच्या हवाली का केले जात नाही? त्यासाठी पुराव्यांची मागणी केली का केली जाते? असा खडा सवाल अखिल भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी रविवारी केला.
आपल्या प्रेरणादायी धम्मदेसनांद्वारे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्मितीसाठी धम्म प्रचार-प्रसाराच्या कार्याला वाहून घेतलेले भिक्खू करूणानंद थेरो यांचा महाथेरो विधान समारंभ आणि कठीण चिवरदान धम्मसोहळा रविवारी रोजी नागसेन वनातील मिलिंद महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या धम्मसोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
देशभरात सध्या बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. सम्राट अशोकांनी ज्या महाविहाराची निर्मिती केली, ज्या बोधगयेत तथागत भगवान गौतम बुद्धाचा संबोधी प्राप्त झाली ते ऐतिहासिक स्थळ फक्त आणि फक्त बौद्धांचेच आहे. ते अन्य दुसऱ्या कोणाचेही असू शकत नाही. ब्रिटिश इतिहासकारांनी महाबोधी महाविहाराचा इतिहास लिहून ठेवला आहे. चीनी प्रवशांनीही या ऐतिहासिक भूमीची नोंद करून ठेवली आहे. परंतु बोधगयेतील महाबोधी महाविहारावर बौद्धांनी हक्क सांगितल्यानंतर त्याचे पुरावे लागतील, असे सांगण्यात आले. अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याचा निकाल देताना हा देशातील कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा विषय असल्याचे सांगितले गेले आणि रामजन्मभूमी हिंदूंच्या हवाली करण्यात आली. मग महाबोधी महाविहार हाही केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील कोट्यवधी बौद्धांच्या श्रद्धेचा विषय असताना मात्र पुरावे मागितले जातात, असे भीमराव आंबेडकर म्हणाले.
रामजन्मभूमीत बौद्ध धम्माचे अवशेष
अयोध्येतील रामजन्मभूमीत उत्खनन सुरू करण्यात आले तेव्हा बौद्ध धम्माशी संबंधित अवशेष सापडले. त्याच आधारे आम्ही रामजन्मभूमी बौद्धांची असल्यामुळे ती बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावी, अशी मागणी करणारी पुनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली आणि आमच्या वकिलालाच एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. देशात कोणत्या जाती-धर्माचा पक्षकार आहे, हे पाहून न्याय दिला जात आहे, असेही भीमराव आंबेडकर म्हणाले.
बौद्ध राजांच्या काळात भारत महासत्ता
देशातील बौद्ध धम्म आणि बौद्ध राजांचा इतिहास मिटवण्याचे सातत्याने प्रयत्न झाले. त्यामुळे देशातील बौद्ध राजांचा इतिहास पुन्हा नव्याने मांडण्याचे प्रयत्न होणे आवश्यक आहे. सध्या देशातील राज्यकर्ते भारताला महासत्ता बनवणार असल्याचे सांगत सुटले आहे. परंतु दोन हजार वर्षांपूर्वी बौद्ध राजांच्या काळात भारत महासत्ता होता. बौद्ध राजांच्या काळात देशात ठिकाठिकाणी विद्यापीठे होती. या ज्ञानांच्या केंद्रात जगभरातील लोक ज्ञान ग्रहण करण्यासाठी येत होते, याची मांडणी करून ते आपण देशातील लोकांना सांगितले पाहिजे, असे भीमराव आंबेडकर म्हणाले. कोणत्याही धम्मसोहळ्यात भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसोबतच राजा सम्राट अशोकाचीही प्रतिमा ठेवली पाहिजे आणि सम्राट अशोकाची जयंतीही तेवढ्याच थाटामाटात साजरी करण्यात आली पाहिजे, असेही आंबेडकर म्हणाले.
धर्माच्या रकान्यात बौद्ध आणि जातीच्या रकान्यात जात लिहा
देशात धम्म परिवर्तनाची नांदी सुरू झाली आहे. जेवढ्या गतीने आपण पुढे जात आहोत, तेवढ्यात ताकदीने आपणाला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय संविधानाच्या कलम २५ नुसार धर्मांतर हा मूलभूत हक्क आहे. परंतु धर्मांतर विरोधी कायदे करून धर्मांतराच्या घटनात्मक मूलभूत हक्कच उद्धवस्त करण्यात आला आहे. आता देशात जातनिहाय जनगणना केली जाणार आहे. त्यावेळी धर्माच्या रकान्यात बौद्ध आणि जातीच्या रकान्यात न विसरता तुमची जात लिहा. तुम्ही महार, मातंग, चांभार या जातीतून बौद्ध धम्म स्वीकारला असेल तर तुमची जात आवश्य नोंदवा आणि देशात धम्मक्रांती गतीमान आहे, हे दाखवून द्या. धर्माच्या रकान्यात बौद्ध आणि जातीच्या रकान्यात तुमची जात लिहिल्याशिवाय बौद्ध धर्मियांची नेमकी संख्या कळणार नाही, असे भीमराव आंबेडकर म्हणाले. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात योगदान द्या. बोधगयेत येऊन सक्रीय सहभाग नोंदवा, असे आवाहन भिक्खू संघानेही धम्मदेसनांमध्ये केले.
यावेळी भिक्खू शरणानंद महाथेरो, भिक्खू प्राचार्य डॉ. खेमधम्मो, बोधी पालो, भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो, भिक्खू विशुधानंदबोधी महाथेरो, विनय रक्खित महाथेरो,भिक्खू सुमनवन्नो महाथेरो, भिक्खू प्रा. डॉ. एम. सत्यपाल, भिक्खू एस. प्रज्ञाबोधी महाथेरो, भिक्खू धम्मबोधी महाथेरो यांच्यासह या धम्मसोहळ्याचे निमंत्रक प्रा. प्रदीप रोडे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे, मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान, स्मार्ट सिटीचे उपायुक्त रविंद्र जोगदंड, जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे, आंतरराष्ट्रीय गायक पावा, सा.बां. वि. चे अधीक्षक अभियंता एस. एस. भगत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळी मिलिंद महाविद्यालय परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लावलेल्या बोधीवृक्षाजवळ परित्राण पाठ घेतल्यानंतर धम्म रॅली काढण्यात आली. ही रॅली धम्मसोहळ्याच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर धम्मध्वजारोहण करण्यात आले. भिक्खू संघाला भोजनदान दिल्यानंतर मुख्य धम्मसोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. या समारंभात भिक्खू करूणानंद थेरो यांना महाथेरो उपाधी, प्रमाणपत्र आणि कठीण चिवरादन प्रदान करण्यात आले. त्यानंतर दिवसभर धम्मदेसना झाली. सायंकाळी ७.३० वाजता प्रा. संजय मोहोड आणि संचाने धम्मपदावर आधारित विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आण गीत भीमायन ही संगीत मैफल सादर केला जाणार आहे.

