नाट्यशास्त्रात ‘कामसूत्र’चे हिणकस प्रयोग: प्रा. अशोक बंडगरच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल, पत्नीही सहआरोपी


औरंगाबादः पात्रता नसतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात प्राध्यापकपदी नियुक्ती मिळवलेले प्रा. डॉ. अशोक बंडगर याने नाट्यशास्त्रात ‘कामसूत्र’चे हिणकस प्रयोग करत विद्यार्थींनींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून बेगमपुरा पोलिस त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगर याने विद्यार्थ्यांना नाट्यशास्त्राचे धडे देण्याऐवजी भलतेच ‘प्रयोग’ केल्याचे उघड झाल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला हे ‘प्रयोग’ पचतात कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 बुलढाणा जिल्ह्यातील मुलगी मोठी स्वप्ने घेऊन विद्यापीठात नाट्यशास्त्राचे धडे घेण्यास आली. तिने विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात एमपीए म्हणजेच मास्टर ऑफ परफर्मिंग आर्टला प्रवेश घेतला. परंतु तिला आपण ज्या  एमपीएला प्रवेश घेतला तो अभ्यासक्रम प्रत्यक्षात ‘मास्टर ऑफ मॉरल टर्पिट्यूड ऍक्ट’ आहे हे माहीतच नव्हते. त्यामुळे जे घडले ते भयंकर घडले आणि विशेष म्हणजे अशोक बंडगरच्या या कारनाम्यात त्याची बायकोही सहभागी आहे.

 बंडगर याने फिर्यादीसोबत ओळख करून तिचा विश्वास संपादन करून तिला स्वतःच्या घरी ठेवून घेतले. मी तुझा वडिल आणि तू माझी मुलगी आहे, असे बंडगरने त्या मुलीस सांगितल्यामुळे त्या मुलीने बंडगरवर विश्वास ठेवला. त्यानंतर बंडगरने तिच्याशी जवळीक वाढवली आणि तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी शिविगाळ व धमकी देऊन तिची छेडछाड कर तिच्यावर बलात्कार केला.

बंडगरची बायकोही त्याच्या या गुन्ह्यात सामील आहे. फिर्यादी मुलीने बंडगरची बायको पल्लवीला सांगितल्यावर तिने हे सगळे मला मान्य आहे. आम्हाला तुझ्यापासून मुलगा हवा आहे, असे सांगत बंडगरला हे कृत्य करण्यास प्रोत्साहन दिले आणि दोघांनाही वेळोवेळी फिर्यादी मुलीवर बलात्कार केला.

 अशोक बंडगरने हा सगळा प्रकार ११ फेब्रुवारी २०२२ च्या संध्याकाळी ६ वाजेपासून ते ११ फेब्रुवारी २०२३ च्या संध्याकाळी सायंकाळी ५ वाजेपर्यंत केला. बंडगर हा विद्युत कॉलनीत राहतो. तेथे हा प्रकार घडला.

या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३७६(न), १०९,११४, ५०४, ५०६ नुसार  अशोक गुरप्पा बंडगर आणि त्याची बायको पल्लवी अशोक बंडगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक विशाल बोडखे पुढील तपास करत आहेत.

तुझ्यापासून आम्हाला मुलगा हवाय…

न्यूजटाऊन कधीही कुणाच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करत नाहीत. प्रत्येकाला त्याचे खासगी आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य आहे, या घटनात्मक मूल्यावर न्यूजटाऊनचा विश्वास आहे. परंतु फिर्यादी मुलीने बेगमपुरा पोलिसात दिलेल्या  लेखी जबाबात ज्या गोष्टी आल्या आहेत, त्यावर थोडी अधिक माहिती घेतली असता विद्यापीठाच्या भूमीत कार्यरत प्राध्यापकाची कुपमंडूक वृती समोर आली.

अशोक बंडगर आणि त्याची बायको पल्लवी यांना दोन मुली आहेत. (अशी त्यांची कागदोपत्री नोंद आहे.) आपल्याला मुलगा होत नाही, असे त्यांच्या लक्षात आले. आपल्या घरात वंशाचा दिवा येत नाही, या भयाने या नवरा-बायकोला पछाडले. त्यातच ‘ सेटिंग’मध्ये मास्टर असलेल्या बंडगरने बायकोच्या नावाने सुमारे चार कोटीचे कर्ज मिळवून एक प्लांट टाकला. लायकी नसताना मिळत असलेला पगार आणि त्यात कर्जाचा मिळालेला बुस्टर डोस यामुळे चतकोर भाकरीला मोहताज असलेला बंडगर बेबंद झाला. वंशाचा दिवा हवाच असे त्याला वाटू लागले. त्याच्या बायकोलाही तोच वंशाचा दिवा हवा होता. नाट्यशास्त्र विभागातील सहकाऱ्यांशीही बंडगरचे वर्तन बेबंद असेच राहिले. या मुलीवर त्याने अत्याचार करायला सुरूवात केल्यानंतर फिर्यादी मुलीने अशोकच्या पत्नीला सांगितले. त्यावर तिने हे मला मान्य आहे, आम्हाला तुझ्यापासून मुलगा हवाय, असे सांगत अशोक बंडगरला फिर्यादी मुलीवर वांरवार बलात्कार करण्यास प्रोत्साहन दिले.

नांदुऱ्यात खाल्ला बेदम मार

फिर्यादी मुलीने जेव्हा या प्रकाराची तक्रार विद्यापीठातील विशाखा समितीकडे केली, तेव्हा बंडगरने कुलगुरू, कुलसचिव माझ्या शब्दाबाहेर नाहीत, असे सांगून तिला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा विशाखा समितीने सुनावणी घेतल्या आणि आपण यात अडकणार असे बंडगरला वाटले तेव्हा तो काल फिर्यादी मुलीच्या नांदुरा गावात गेला. तिला व तिच्या नातेवाईकांना आधी पैश्याचे आमिष दाखवले व नंतर ते ऐकत नाहीत हे पाहून धमकावण्याचा प्रयत्न केला. पण फिर्यादी मुलीच्या नातेवाईकांनी बंडगरला धोधो धुतले. मनसोक्त मार खावून तेथून तो कसाबसा पळून आला.

विद्यापीठ प्रशासनाने वेळीच कारवाई केली असती तर…

अशोक बंडगरने नेट/सेट किंवा पीएच.डी. ही किमान शैक्षणिक अर्हता नसतानाही २००८मध्ये विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक (तेव्हाचे अधिव्याख्याता पद) म्हणून नियमबाह्य नियुक्ती मिळवली. डॉ. बंडगरसह नियमबाह्यपणे नियुक्त करण्यात आलेल्या इतर अधिव्याख्यात्यांना तत्काळ कार्यमुक्त करून त्यांना देण्यात आलेले वेतन  वसूल करण्यात यावे, अशी शिफारस डॉ. मोरे समितीने केली होती.

बंडगर याच्यासह नियमबाह्य पद्धतीने नियुक्त केलेले अधिव्याख्याता व प्रपाठकांना तत्काळ सेवामुक्त करून पुनःश्च जाहिरात देऊन विहीत अटी व शर्तीनुसार नियुक्त्या देण्यात याव्यात, अशी शिफारस डॉ. मोरे समितीने करूनही बंडगरला विद्यापीठ प्रशासनाने सेवासातत्य दिले. त्याला पीएच.डी.चे गाईड आणि नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुखही बनवले.

मोरे समितीच्या अहवालावर विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर न्यूजटाऊनने बंडगरच्या बेकायदेशीर नियुक्तीचा पुराव्यानिशी पर्दाफाश केल्यानंतरही विद्यापीठ प्रशासन मूग गिळून गप्प बसले. त्यामुळे बंडगरची भीड चेपली आणि त्याने नाट्यशास्त्रात ‘कामसूत्र’चे प्रयोग सुरू केले. विद्यापीठ प्रशासनाने वेळीच कारवाई केली असती तर आज उघडकीस आलेला प्रकार कदाचित टळला असता आणि एका लेकीची अब्रू वाचली असती.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!