MPSC Exam 2025: अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर नागरीसेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलली, २८ सप्टेंबरऐवजी आता ९ नोव्हेंबरला होणार परीक्षा


मुंबई: हावामान विभागाने पुढील काही दिवसांत राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरीसेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा-२०२५ ही परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार २८ सप्टेंबरऐवजी ९ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे एमपीएससीने जाहीर केले आहे. सुरूवातीला एमपीएससीने ही परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला होता. परंतु या निर्णयाला सर्वस्तरातून विरोध झाल्यानंतर माघार घेत एमपीएससीने हा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्राच्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच शिवाय पावसामुळे अनेक महामार्ग बंद आहेत. अशा परिस्थितीत परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात उमेदवारांना अडचणी येणार असल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात होती. परंतु ही परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होईल, असे सांगत परीक्षा पुढे ढकलण्यास एमपीएससीने आधी नकार दिला होता. या नकाराला विरोध झाल्यानंतर माघार घेत एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

एमपीएससीची महाराष्ट्र नागरीसेवा संयुक्त पूर्वपरीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार २८ सप्टेंबर रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती. मात्र राज्यातील अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे आणि हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे आयोगाने आता ही परीक्षा ९ नोव्हेंबरला घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

पूरग्रस्त परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील गावे व तालुक्यांचा परस्परांशी संपर्क तुटलेला असून उमेदवारांना प्रवास व केंद्रांवर पोहोचणे कठीण होण्याची शक्यता आहे. कोणताही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये, या उद्देशाने परीक्षा पुढे ढकलण्यास शासनाने कळवल्याने आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

९ नोव्हेंबरची पूर्वनियोजित परीक्षाही पुढे ढकलणार

महाराष्ट्र नागरीसेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा ९ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आल्यामुळे ९ नोव्हेंबर रोजी होणारी पूर्वनियोजित महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ या सुधारित दिनांक शुद्धीपत्रकाद्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे एमपीएससीने म्हटले आहे. परीक्षेसंबंधी अद्ययावत माहितीसाठी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या शुद्धिपत्रकाचे अवलोकन करावे, असे आवाहन एमपीएससीने सर्व उमेदवारांना केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!