
नांदेडः पीएच. डी.च्या प्रवेशासाठी डिसेंबर २०२४ मध्ये घेतलेल्या पेट-२०२४ परीक्षेच्या निकालानंतरची प्रक्रिया पूर्ण करण्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रशासन सपशेल अपयशी ठरले असून संशोधन सल्लागार समिती अर्थात आरएसीच्या बैठका होऊन दोन महिने उलटले तरी पीएच.डी.साठी संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन मार्गदर्शक/सुपरवायझरच देण्यात आले नसल्यामुळे संशोधन प्रक्रियेलाच खीळ बसली आहे. त्यामुळे पेट-२०२४ उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष खदखदू लागला आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने डिसेंबर २०२४ मध्ये पीएच.डी. च्या प्रवेशासाठी पेट परीक्षा घेतली. परीक्षेपूर्वी पीएच.डी.साठीच्या विद्याशाखानिहाय रिक्त जागांचा तपशीलही जाहीर करण्यात आला होता. त्यात मानव्य विद्याशाखेच्या २१८, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेच्या ३८, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या २९८ आणि आंतरविद्या शाखेच्या ११ रिक्त जागांचा समावेश आहे. २८ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी ५ हजार १२२ विद्यार्थी बसले होते.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने डिसेंबर २०२४ मध्ये पेट परीक्षा घेतल्यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी म्हणजे जून २०२५ रोजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर गुणवत्ता यादी जाहीर करून पेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे जारी करण्यात आली. त्यानंतर १६ जून २०२५ पासून वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेच्या तर १८ जूनपासून मानव्य विद्याशाखेच्या संशोधन सल्लागार समितीच्या (आरएसी) बैठका लावण्यात आल्या.
पेट परीक्षेचा निकाल जाहीर करून विद्यापीठाकडून ५४३ पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती. गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर पेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी संशोधन सल्लागार समितीच्या (आरएसी) बैठका होऊन आपल्याला मार्गदर्शक/सुपरवायझर मिळेल आणि आपले पीएच.डी.साठीचे संशोधन सुरू करता येईल, या अपेक्षेवर होते. परंतु कोणतीही प्रक्रिया वेळत पार पाडण्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रशासन यशस्वी होऊ शकले नाही.
आरएससीच्या या बैठका संपल्यानंतर पेट उत्तीर्ण होऊन पीएच.डी.साठी संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शक/सुपरवायझर आणि संशोधन केंद्र तातडीने देणे आवश्यक होते. परंतु जूनमध्ये आरएसीच्या बैठका होऊनही अनेक विषयातील पीएच.डी.च्या संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आणि संशोधन केंद्र दिले गेले नसल्यामुळे संशोधनाची प्रक्रिया रखडून पडली आहे.
विलंबामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान
पेट परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया विद्यापीठ प्रशासन पूर्ण करू न शकल्यामुळे पेट उर्तीण होऊन पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या संशोधक छात्रांना राष्ट्रीय व राज्यपातळवरील विविध संस्थांकडून देण्यात येणाऱ्या संशोधन छात्रवृत्तीसाठीही अर्ज करता येईनासे झाले आहे. त्यामुळे या संशोधक छात्रांचे आर्थिक नुकसान तर होत आहेच शिवाय त्यांना मनःस्तापही सहन करावा लागत आहे. दरम्यान आज (१९ सप्टेंबर) काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आणि संशोधन केंद्र देण्यात आल्याचे ईमेल पाठवण्यात आले आहेत. पण ही प्रक्रिया एवढ्या संथगतीने का केली जात आहे? असा विद्यार्थ्यांचा सवाल आहे.
विशेष म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या पेट-२०२४ या परीक्षेचा वैधता कालावधी या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याच्या तारखेपासून केवळ एक वर्षाचाच आहे. तशी स्पष्ट नोंदच पेट-२०२४च्या ई-माहितीपुस्तिकेत करण्यात आली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यास उत्तीर्ण विद्यार्थ्यांसमोर वैधता कालावधीचा प्रश्नही आवासून उभा राहणार आहे.

