
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयाची कुलुपे तोडून लावलेले सील छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय सहसंचालक डॉ. पंकजा वाघमारे यांनी ‘विनवणी’ केल्यानंतर संस्थाचलाकांनी उघडले खरे, परंतु पोलिसांसमक्ष पंचनामा करूनच सील उघडा, या मागणीवर दिवसभर महाविद्यालयाबाहेरच ताटकळत राहिलेले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ठाम राहिले. परंतु तसे न झाल्यामुळे सील उघडून हे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी महाविद्यालयात गेले नाही.
कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव आस्मा खान यांनी खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार व अन्य ठिकाणी लावलेली कुलुपे रविवारी रात्री आठ-सव्वाआठ वाजेच्या सुमारास तोडून त्या ठिकाणी सील ठोकले. त्यामुळे आज सकाळी कर्तव्यावर हजर राहण्यासाठी गेलेले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी दिवसभर ताटकळत महाविद्यालयाबाहेरच राहिले. या सील ठोक कारवाईमुळे महाविद्यालयात आलेल्या विद्यार्थ्यांचीही कामे खोळंबली.
आज सकाळी महाविद्यालयात गेल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराला सील ठोकल्याचे लक्षात आल्यानंतर प्रभारी प्राचार्या डॉ. कमरूनिस्सा शेख यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय सहसंचालक डॉ. पंकजा वाघमारे यांच्याबरोबरच विद्यापीठ प्रशासन आणि पोलिसांशीही संपर्क साधून घडलेला प्रकार त्यांच्या कानावर घातला आणि कारवाईची मागणी केली.
अखेर दुपारी चार वाजेच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा, विभागीय सहसंचालक डॉ. पंकजा वाघमारे, प्रशासन अधिकारी वनिता सांजेकर, संजय जगताप असा अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा कोहिनूर महाविद्यालयात दाखल झाला. प्रकुलगुरू डॉ. सरवदे आणि सहसंचालक डॉ. वाघमारे यांनी महाविद्यालयाच्या बाहेर दिवसभर उन-पावसात उपाशी-तापाशी बसलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, ते प्रलंबित प्रश्न सोडवले जातील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये. येथे काय घडतेय, काय घडलेय, याबाबत शासन दरबारी मार्गदर्शन मागवलेले आहे.
बराच वेळ हे उच्च पदस्थ अधिकारी बाहेरच उभे असूनही कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव आस्मा खान यांनी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावलेले सील उघडले नाही. शेवटी प्रकुलगुरू आलेले आहेत, मी सहसंचालक आहे, आम्ही बाहेरच उभे आहोत. दार उघडा आणि आत घ्या. बसून चर्चा करू आणि मार्ग काढू, असे विभागीय सहसंचालक डॉ. पंकजा वाघमारे या संस्थेच्या सचिव आस्मा खान यांना म्हणाल्या. त्यानंतरच आस्मा खान यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला लावलेले सील काढले आणि कुलुप उघडले. त्यानंतर प्रकुलगुरू डॉ. सरवदे, कुलसचिव डॉ. अमृतकर, सहसंचालक डॉ. वाघमारे यांना महाविद्यालयाच्या आत येऊ देण्यात आले. मग त्यांनी आतमध्ये बसून काहीकाळ चर्चा केली.
कोहिनूर महाविद्यालयाला लावलेले सील पोलिसांसमक्ष पंचनामा करूनच उघडा, अशी मागणी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विभागीय सहसंचालक डॉ. पंकजा वाघमारे आणि प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांच्याकडे केली. रविवारी रात्री आठ-सव्वाआठ वाजेच्या सुमारास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जुनी कुलुपे तोडून नवीन कुलुपे लावली आणि सील ठोकले. त्यामुळे महाविद्यालयाच्या इमारतीत रात्री त्यांनी नेमके काय करून ठेवले, याबाबत हे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी साशंक आहेत आणि संस्थाचालकांकडून आपणाला खोट्या गुन्ह्यात अडकवले जाऊ शकते, अशी त्यांना भीती आहे. त्यामुळेच ते पोलिसांसमक्ष सील तोडून पंचनामा करण्याची मागणी करत होते. परंतु सहसंचालक डॉ. वाघमारे यांच्या ‘विनंती’वरून पंचनामा न करताच आस्मा खान यांनी ठोकलेले सील उघडण्यात आले. त्यामुळे महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार उघडले तरी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी महाविद्यालयाच्या इमारतीत गेलेच नाहीत.
कोहिनूर महाविद्यालय हे अशासकीय अनुदानित महाविद्यालय असून या महाविद्यालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संलग्नीकरण दिले आहे आणि राज्य शासनाकडून विभागीय सहसंचालकांमार्फत या महाविद्यालयाला वेतन अनुदान दिले जाते. त्यामुळे या महाविद्यालयावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार हा विद्यापीठ आणि विभागीय सहसंचालकांचा आहे. आपल्या अधिपत्याखालील कोणत्याही महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण गढूळ होणार नाही, याची खबरदारी घेण्याची आणि प्रसंगी कारवाई करण्याची जबाबदारीही या दोन प्राधिकाऱ्यांची आहे. असे असतानाही रात्रीच्या सुमारास कुलुपे तोडून महाविद्यालयाला सील ठोकले गेले असतानाही संस्थाचालकांविरुद्ध पोलिसांत गुन्हे का दाखल केले नाहीत? आदेश देण्याऐवजी विनवणी करून सील का उघडायला लावले? असा येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सवाल आहे. कशी केली विनवणी? पहा व्हिडीओ-
भयभीत प्राध्यापकांना दिले ‘मोला’चे सल्ले…
कोहिनूर शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या छळवणुकीमुळे कोहिनूर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भयभीत झाले आहेत. या भयभीत झालेल्या शिक्षकांना सहसंचालक डॉ. पंकजा वाघमारे यांनी ‘मोलाचे’ सल्लेही दिले. अतिरेक करण्याचे कारण नाही. भावनातिरेकामध्ये निर्णय घेण्याची गरज नाही, असे डॉ. वाघमारे यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सांगितले. आपले सर्व्हिस बुक, आपला पगार विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा महत्वाचे आहे काय? असा ‘मौलिक’ सवालही त्यांनी प्राध्यापकांना केला.
उद्या विद्यापीठात बैठक
दरम्यान, कोहिनूर महाविद्यालयाच्या प्रश्नावर उद्या दुपारी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बैठक ठेवण्यात आली आहे. या बैठकीला कुलगुरू डॉ. विजय फुलारी, प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे आणि विभागीय सहसंचालक डॉ. पंकजा वाघमारे उपस्थित राहतील आणि कोहिनूर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकतील. या बैठकीत मुख्यतः कोहिनूर शिक्षण संस्थेने निलंबित केलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे.

शिक्षकेत्तर असा शब्द नसून शिक्षकेतर असाशब्द असतो.तो वापरा.
अजूनही सुधारणा झाली नाही.शिक्षकेत्तर असा शब्द नसून शिक्षकेतर असा शब्द असतो.तो वापरा.