शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेत तब्बल ३ हजार १८७ उमेदवारांचा निकाल राखीव, माहिती सादर करण्यासाठी आता १५ सप्टेंबरची डेडलाईन


मुंबई: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयबीपीएस या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर झाला असून निकाल राखीव ठेवलेल्या ३,१८७ उमेदवारांनी आपली माहिती १५ सप्टेंबर पर्यंत www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंकमध्ये द्यावी. या मुदतीनंतर माहिती सादर करणाऱ्या उमेदवारांच्या राखीव निकालाबाबत विचार केला जाणार नाही, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २७ मे ते ३० मे आणि ०२ जून ते ०५ जून या कालावधीत राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये एकूण ६० परीक्षा केंद्रांवर शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला एकूण २,२८,८०८ परीक्षार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २,११,३०८ परीक्षा दिली होती.

या परीक्षेचा निकाल १८ ऑगस्ट रोजी गुणयादी व गुणपत्रक (SCORE LIST & SCORE CARD) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. परीक्षेला बसलेल्या आणि निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या बी.एड. व डी.एल.एड. अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेल्या एकूण ६,३२० उमे‌दवारांपैकी २,७८९ उमेदवारांचा निकाल २५ ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. तद्नंतर ०३ सप्टेंबर रोजी ३४४ उमेदवारांचा निकाल प्रसिध्द करण्यात आला आहे.

निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या बी.एड. व डी.एल.एड.च्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेल्या ६,३२० उमेदवारांपैकी ३,१८७ उमेदवारांनी २ मे अन्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावरील लिंक‌द्वारे अ‌द्यापही माहिती न भरल्याने अशा ३,१८७ उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे.

या उमेदवारांनी १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंकमध्ये माहिती व अंतिम वर्षास प्रविष्ट उत्तीर्ण असल्याबाबतचे निकालपत्र सादर करावे. १५ सप्टेंबर २०२५ नंतर माहिती सादर करणाऱ्या उमेदवारांच्या राखीव निकालाबाबत विचार केला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!