
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): आपण नवप्राध्यापक संघटनेचा अध्यक्ष असून मी सांगतो त्याच उमेदवारांची सहायक प्राध्यापकपदी नियुक्ती करा, अशी दमदाटी करून राज्याचे उच्च शिक्षण संचालकांसह पुण्याच्या विभागीय सहसंचालकांनाही ब्लॅकमेल करणारा प्राध्यापक डॉ. संदीप पाथ्रीकर हे त्यांची मूळ नियुक्ती असलेल्या वाळूजच्या दगडोजीराव देशमुख महाविद्यालयातही ‘भामटेगिरी’ करत असून त्यांनी प्राध्यापकीच्या कर्तव्याला डुम्मा मारलेल्या काळातील वेतनही हडपल्याची धक्कादायक माहिती न्यूजटाऊनच्या हाती आली आहे.
प्रा. डॉ. संदीप पाथ्रीकर हे ‘मी नवप्राध्यापक संघटनेचा अध्यक्ष असून राज्यातील विविध अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये सुरू होणाऱ्या प्राध्यापक भरतीमध्ये मी तुमची प्राध्यापकपदी नेमणूक करून देतो,’ असे आमिष दाखवून भूलथापा मारत तासिका तत्वावर काम करणाऱ्या अनेक उमेदवारांकडून लाखो रुपये उकळले असून त्यांच्याविरुद्ध उच्च शिक्षण मंत्रालयाची फसवणूक तसेच गैरमार्गाने अपसंपदा गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकतीच करण्यात आली आहे.
या तक्रारीच्या आधी प्रा. डॉ. संदीप पाथ्रीकर यांनी जुलै २०२३ मध्ये पुण्याचे तत्कालीन विभागीय सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांना मोबाईलवर कॉल करून अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण प्रसारक समाज या संस्थेच्या ५ अनुदानित महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापक भरतीच्या वेळी मी सांगतो त्याच उमेदवाराची निवड करा, असे सांगत दबाव टाकण्याचा आणि सहायक प्राध्यापक भरती प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. एवढेच नव्हे तर राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांना प्रत्यक्ष भेटून माझे दोन उमेदवार अहमदनगर येथे लावा, असे म्हणत दबाव टाकला होता. विभागीय सहसंचालक डॉ. बोंदर यांनी याबाबतची रितसर फिर्याद १६ जुलै २०२३ रोजी पुण्याच्या बंडगार्डन पोलिस ठाण्यात दिली होती.
आता प्रा. डॉ. संदीप पाथ्रीकर यांच्याबाबत राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती, मुख्यमंत्री व उच्च शिक्षण मंत्र्यांकडे नव्याने लेखी तक्रार करून पाथ्रीकरांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांनी जमवलेल्या अपसंपदेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आल्यामुळे नवा वाद निर्माण झालेला असतानाच प्रा. डॉ. संदीप पाथ्रीकर यांचे वाळूजच्या दगडोजीराव देशमुख महाविद्यालयातील कारनामेही उघडकीस येऊ लागले आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय सहसंचाल कार्यालयातील अनुदान निर्धारण पथकाने २० ऑगस्ट रोजी दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाला भेट देऊन या महाविद्यालयाला अदा करण्यात आलेल्या वेतन अनुदानाचा विनियोग कसा करण्यात आला? याची झाडाझडती घेतली असता प्रा. डॉ. संदीप पाथ्रीकरांनी राज्य शासनाची फसवणूक करून कर्तव्यावर नसलेल्या काळातील वेतनही हडप केल्याचे समोर आले आहे.
या अनुदान निर्धारण पथकाने दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील हजेरीपटाचे अवलोकन केले. तेव्हा प्रा. संदीप पाथ्रीकरांचा हा ‘कारनामा’ उघडकीस आला. प्रा. संदीप पाथ्रीकर हे मार्च २०२४ मध्ये ६ दिवस आणि एप्रिल २०२४ मध्ये ३ दिवस असे एकूण ९ दिवस महाविद्यालयात गैरहजर होते. परंतु महाविद्यालयात गैरहजर असूनही त्यांनी या काळातील वेतन गडप केल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले आहे.
प्रा. पाथ्रीकर हे या कालावधीत कर्तव्यावर नसतानाही त्यांना या कालावधीचे वेतन कसे अदा करण्यात आले? असा सवाल करत या अनुदान निर्धारण पथकाने प्रा. पाथ्रीकर हे या कालावधीत कर्तव्यावर उपस्थित नसतील तर त्यांचा हा कालावधी विनावेतन करून त्याची नोंद पाथ्रीकरांच्या मूळ सेवापुस्तिकेत घ्यावी आणि त्यांनी बेकायदेशीरपणे हडप केलेले वेतन वसूल करून ते तत्काळ चलनाद्वारे शासन खाती जमा करावे, असे निर्देश अनुदान निर्धारण पथकाने दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.ए. हजारे यांना दिले आहेत. त्यामुळे पाथ्रीकर अडचणीत येण्याची शक्यता आहे.

