सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी अखेर एसआयटी स्थापन, परभणीतील एकाही पोलिस अधिकाऱ्याचा समावेश नाही; प्रकाश आंबेडकरांच्या लढ्याला मोठे यश


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): परभणी येथील आंबेडकरी कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार अखेर विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली असून या एसआयटीत परभणी जिल्ह्यातील एकाही पोलिस अधिकाऱ्याचा समावेश नाही.  वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयात लढा दिला आहे.

गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ हे या एसआयटीचे प्रमुख असून या एसआयटीमध्ये पोलिस अधीक्षक अभिजीत धाराशिवकर, राज्य गुन्हे विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल गवाणकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या एसआयटीमध्ये परभणी जिल्ह्यातील कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याचा समावेश करू नये, अशा सूचना औरंगाबाद खंडपीठाने दिल्या होत्या. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना या एसआयटीपासून लांबच ठेवण्यात आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणी आठवडाभरात विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचे आदेश महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांना १४ ऑगस्ट रोजी दिले होते.

११ डिसेंबर २०२४ रोजी परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती. या विटंबनेच्या घटनेमुळे संतापलेला आंबेडकरी समुदाय रस्त्यावर उतरला आणि हिंसाचार उसळला होता. त्यानंतर परभणी पोलिसांनी कोंम्बिग ऑपरेशन राबवत सोमनाथ सूर्यवंशीसह शेकडो लोकांना अटक केली होती. 

सोमनाथ सूर्यवंशीला १२ डिसेंबर रोजी अटक केल्यानंतर दोन दिवसांची पोलिस कोठडी आणि त्यानंतर दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. १४ डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याची तक्रार सोमनाथच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज करून दोषी पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

औरंगाबाद खंडपीठाने दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयानेही औरंगाबाद खंडपीठाचा आदेश कायम ठेवत राज्य सरकारचे अपील फेटाळले होते. सर्वोच्च न्यायालयातही विजयाबाई सोमवंशी यांच्या वतीने ऍड. प्रकाश आंबेडकर यांनीच युक्तीवाद केला होता. त्यानंतर परभणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

सोमनाथच्या मृत्यूच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याची मागणी सोमनाथच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केली होती. खंडपीठाच्या आदेशानुसार अखेर एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!