
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार आणि उद्या धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा वगळता सातही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने दिला असून या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले असून त्यांनी प्रशासनाला अलर्ट राहण्याचे निर्देशही दिले आहेत.
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने आज (१८ ऑगस्ट) रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व लातूर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत आँरेज अलर्ट दिला असून परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत यलो अलर्ट दिला आहे. उद्याही (१९ ऑगस्ट) धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून सातही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला व झालेल्या नुकसानीचे योग्य प्रकारे पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
पर्यटन स्थळे, धबधबे व गर्दीची ठिकाणे येथे स्थानिक पोलीस प्रशासनाकडून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करून आवश्यक ती काळजी घेण्यात यावी, जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करून जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच खाजगी शाळांना सुट्टी संदर्भातील निर्णय घ्यावा, स्थलांतरित नागरिकांच्या निवारा केंद्रांमध्ये योग्य सोयी-सुविधा, अन्न व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. नागरिकांनी नदी, नाले, बंधारे, धरण परिसरात जाणे टाळावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, तसेच अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत स्त्रोतांवरूनच माहिती घ्यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
१००४ गावांना अतिवृष्टीचा फटका
छत्रपती संभाजीनगर विभागात आज ३२.३० मि.मी. पावसाची नोंद झाली असून, विभागातील ५७ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.तसेच दि.१४.०८.२०२५ पुन १८.०८.२०२५ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्ह्यांकडून प्राप्त प्राथमिक माहिती नुसार विभागातील एकूण १००४ गावे बाधित झालेली असून ६ जण ठार तर एक जण जखमी झाला आहे. मृतांमध्ये नांदेड जिल्ह्यातील ३, बीड जिल्ह्यातील २ आणि हिंगोली जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे.
तीन लाख हेक्टर शेतीचे नुकसान
अतिवृष्टीच्या तडाख्यात मराठवाड्यातील ३ लाख २९ हजार ५०९ शेतकरी बाधित झाले असून २ लाख ८० हजार ८६१ हेक्टर ०२ आर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात (जिरायत-२ लाख ७२ हजार ५०७ हेक्टर ०२ आर जिरायती क्षेत्र, बागायत-८ हजार १५८ हेक्टर बागायती क्षेत्र तर १९६ हेक्टर फळपिकाच्या क्षेत्राचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात २०५ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यात दुधाळ मोठी ६९ जनावरे, दुधाळ लहान १०२ जनावरे, ओढकाम करणारी मोठी २८ जनावरे आणि ओढकाम करणाऱ्या लहान ०६ जनावरांचा समावेश आहे तर अंशतः पडझड झालेल्या घरांची संख्या एकूण ४८६ आहे.
