
नागपूरः रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे (KKSU) कुलगुरू डॉ. हरेराम त्रिपाठी हे विद्यापीठातील महत्वाच्या पदांवर त्यांच्या नात्यातील माणसांचीच नियम डावलून नियुक्ती करत असून विद्यापीठाचे नियम आणि प्राधिकाऱ्यांना डावलून निर्णय घेत असल्याची धक्कादायक लेखी तक्रार याच विद्यापीठातील आठ उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील काही विद्यापीठातील कुलगुरूंकडून असेच वर्तन सुरू असतना संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंबाबतीत तक्रार झाल्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या अधिष्ठाता, आयक्यूएसी संचालक व्यवस्थापन व विद्वत परिषदेच्या अध्यक्ष प्रा. कविता होले, अधिष्ठाता कलापिनी अगस्ती, प्रा. हरेकृष्ण अगस्ती, विद्यापीठ नियोजन विकास मंडळाच्या संचालक व विभागप्रमुख प्रा. प्रसाद गोखले, नॅक समन्वयक आणि विभागप्रमुख प्रा. पराग जोशी, विद्या विभागाच्या उपकुलसचिव डॉ. स्मिता फडणवीस, विद्यापीठ नियोजन विकास मंडळाच्या सहायक कुलसचिव कल्याणी देशकर आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. रेणुका बोकारे यांनी राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे लेखी तक्रार करत कुलगुरू डॉ. हरेराम त्रिपाठी यांच्या कार्यशैलीवर गंभीर स्वरुपाचे विविध आक्षेप घेतले आहेत.
कुलगुरू डॉ. त्रिपाठी यांनी आपल्या नात्यातील आणि प्रदेशातील डॉ. देवानंद शुक्ल यांची अर्हता नसताना नियम डावलून कुलसचिवपदी नियुक्ती केली आहे. कुलसचिवपदासाठी दोन वेळा जाहिरात प्रकाश करण्यात आली. परंतु स्वतःच्या नात्यातील प्रदेशातील डॉ. देवानंद शुक्ल यांची कुलसचिवपदी निवड करण्यासाठी दुसऱ्यांदा जाहिरात देण्यात आली. डॉ. शुक्ल यांची अर्हता नसताना नियम डावलून त्यांची निवड करण्यात आली. या पदासाठी आधी अर्ज केलेल्या उमेदवारांना जाणीवपूर्वक अपात्र ठरवले. केवळ एक वर्षासाठी नियुक्ती असलेले आणि परीविक्षा कालावधीत असलेले डॉ. देवानंद शुक्ल यांच्याकडेच वित्त व लेखाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. सही करणारी आणि मान्यता देणारी व्यक्ती एकच ठेवून कुलगुरूंनी नियम धाब्यावर बसवले आहेत.
कुलसचिव पद हे प्रशासकीय पद असल्यामुळे राज्य शासनाचे धोरण व निर्णयानुसार या पदावरील व्यक्तीला मराठी येणे अनिवार्य असून संस्कृत विद्वान असलेल्या उमेदवारास ६ महिन्यांत मराठी शिकणे अनिवार्य असल्याचा नियम बदलून डॉ. शुक्ल यांच्या नियुक्ती आदेशातच मराठीऐवजी संस्कृत शिकण्याची अट घालण्यात आली आहे. कुलगुरू व कुलसचिवांना मराठी भाषा बोलता व लिहिता येत नाही. त्यामुळे विद्यापीठातील व्यवहार मराठीत होत नाहीत, असे या तक्रारीत म्हटले आहे.
विद्यापीठ कायद्यातील कलम ३३ नुसार विविध अध्ययन मंडळाच्या अध्यक्षपदी विद्यापीठाच्या विभागातून किंवा संलग्न महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकांचे नामनिर्देशन करणे आवश्यक असताना कुलगुरू डॉ. त्रिपाठी यांनी त्यांच्या नात्यातील, परिचयातील आणि स्वतःच्या प्रदेशातील प्राध्यापकांचे अध्ययन मंडळाच्या अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन केले आहे. याच व्यक्तींचे पुढे विद्वत परिषद व व्यवस्थापन परिषदेवर नामनिर्देशन केले आहे, असे या तक्रारीत म्हटले आहे.
कुलगुरूंच्या वापरासाठी एकच वाहन आहे. नियमाप्रमाणे एका वाहनाकरिता एकाच चालकाची नियुक्ती करणे क्रमप्राप्त आहे. परंतु कुलगुरूंनी त्यांच्या वाहनाकरिता पूर्वीपासून नियुक्त असलेल्या चालकाव्यतिरिक्त स्वतःच्या गावातील आणखी एका चालकाची जाहिरात प्रक्रिया न राबवता आणि प्राधिकरणाची पूर्वमंजुरी न घेता नियुक्ती केली आणि त्याला आधीच्या चालकापेक्षा जास्तीचे वेतन दिले. ही नियुक्ती म्हणजे वैयक्तिक स्वार्थासाठी विद्यापीठाच्या पैशांचा अनधिकृत वापर आहे.
कुलगुरू डॉ. त्रिपाठी यांनी गेल्या वर्षभरात विविध कंत्राटी व नियमित पदांवर पात्रता नसतानाही १२ हून अधिक नात्यातील, संबंधातील आणि स्वतःच्या प्रांतातील व्यक्तींच्या नियुक्त्या केल्या आहेत. डॉ. त्रिपाठी यांनी कोणत्याही अधिकृत प्राधिकरणाची पूर्वमंजुरी न घेता रामटेक येथील कुलगुरू निवास व निवासी कार्यालयाच्या नुतनीकरणावर २ कोटी रुपयांची वारेमाप उधळपट्टी केली आहे, असेही या तक्रारीत म्हटले आहे.
त्रिपाठींवर अन्य आक्षेप असे
- कुलगुरू त्रिपाठी यांनी विद्यापीठाचा सर्वसाधारण निधी व्यवस्थापन परिषदेच्या अधिकृत पूर्वमंजुरीशिवाय खासगी बँकेत राखीव ठेवला.
- दूरस्थ शिक्षा केंद्राच्या संचालकपदी आपल्याच नातेवाईकाची नियुक्ती करून त्याच्यावर ३० पेक्षा अधिक समित्यांचा कार्यभार सोपवला.
- प्रशासकीय कामकाजासाठी मराठी ज्ञान अपेक्षित असतानाही जाणीवपूर्वक नात्यातील आणि अमराठी अपात्र उमेदवारांच्या नियुक्त्या केल्या.
- शासन व व्यवस्थापन परिषदेने मंजुरी देऊनही त्रिपाठी यांनी दोन वर्षांपासून नियमित पदभरती प्रक्रिया जाणीवपूर्वक लांबवली.
- कुलसचिव पदाची भरती प्रक्रिया राबवताना विशेषज्ञ म्हणून महाराष्ट्रातील विद्यापीठातील कोणत्याही विशेषज्ञास न बोलावता त्रिपाठी हे पूर्वी कार्यरत असलेल्या लालबहादूर शास्त्री केंद्रीय संस्कृत विद्यापीठातील आप्तस्वकियाला विशेषज्ञ म्हणून बोलावले.
- विद्यापीठाच्या शासकीय वाहनाचा कुलगुरूंशिवाय त्यांच्या कुटुंबीयांकडून सर्रास वापर करण्यात येतो. गेल्या वर्षभरात शैक्षणिक सामंजस्य कराराच्या नावाखाली स्वतःच्या निवासस्थानानजीकच्याच संस्थांशी करार केले व त्यासाठी कर्तव्य रजा व पैशांचा दुरुपयोग केला.
- प्राधिकरणाच्या निर्णयानंतरही जाणीवपूर्वक पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेस अनावश्यक विलंब करून विद्यार्थ्यांचे एक वर्षाचे शैक्षणिक नुकसान केले. अध्यादेश डावलून निर्दिष्ट नसलेल्या पीएच.डी. सल्लागार समितीची स्थापना केली आणि विद्वत परिषदेद्वारे मान्य शैक्षणिक वेळापत्रक डावलून पीएच.डी. प्रवेश व अन्य प्रक्रिया राबवली.
- परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणातील चौकशीत विद्वत परिषदेने एका महाविद्यालयाची प्रवेश मान्यता व परीक्षा मान्यता रद्द केलेली असतानाही कुलगुरू डॉ. त्रिपाठी यांनी आपल्या मर्जीतील लोकांची परस्पर वेगळी समिती स्थापन करून प्रवेशास मान्यता दिली.
- कुलगुरू त्रिपाठी हे व्यवस्थापन परिषदेची विषयसूची व इतिवृत अनेकवेळा सूचित करूनही निर्धारित वेळेत सदस्यांना उपलब्ध करून देत नाहीत. प्रत्यक्ष झालेल्या चर्चेनुसार इतिवृत्त तयार न करता व झालेली चर्चा तसेच सदस्यांनी नोंदवलेल्या मतांची उल्लेख न करता परस्पर इतिवृत्त बदलून दिशाबूल करतात.
- कुलगुरू त्रिपाठी हे गुरूकुलातील अध्यापकांना व्यवस्थापन परिषदेने मंजूर केलेली वेतनवाढ प्रदान न करता मानसिक त्रास देतात. गुरूकुलातील शिक्षकांनी दिलेले अर्ज व निवेदने याकडे हेतुतः दुर्लक्ष करतात.

