म्हाडाच्या छत्रपती संभाजीगरातील सदनिकांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत करा ऑनलाईन अर्ज, २६ सप्टेंबर रोजी सोडत


 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): म्हाडाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरातील १ हजार ३४१ निवासी सदनिका भूखंड व नाशिक मंडळातील ६७ सदनिका अशा १ हजार ४०८ सदनिका भूखंडाची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून त्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अमानत रकमेचा भरणा करून अर्ज करता येतील. प्राप्त झालेल्या अर्जांतून २६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सोडता काढण्यात येणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कार्यकारी अभियंता नितीन शिंदे,उपमुख्य अधिकारी जयकुमार नामेवार उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे सोडत जून-२०२५ अन्वये १ हजार ३४१ निवासी सदनिका भूखंड व नाशिक मंडळातील ६७ सदनिका असे १ हजार ४०८ सदनिका भूखंडाची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १ हजार ५६ सदनिका अत्यल्प उत्पन्न गट नक्षत्रवाडी छत्रपती संभाजीनगर व २४४ पैकी ९२ सदनिका अत्यल्प उत्पन्न गट अंबाजोगाई जि.बीड या योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे.

या योजनेसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २ लाख ५० हजार रुपये अनुदान अर्जदारांना प्राप्त होणार आहे. त्यामुळे १० लाख ते १२ लाख ५० हजार रुपयांत या किंमतीत १ बीएचके सदनिका घेण्याची सुवर्णसंधी प्राप्त झालेली आहे. अर्जदारांना डिसेंबर-२०२६ पर्यंत या सदनिकांचा ताबा मिळणार आहे.

छत्रपती संभाजीनगर शहराच्या अत्यंत मोक्याचे ठिकाण असलेल्या चिकलठाणा येथे म्हाडा योजनेअंतर्गत १५४ सदनिकांचा सोडतीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ही योजना जालना रोडपासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे २७ लाख रुपये ते ३४ लाख रुपये या परवडणाऱ्या किंमतीत अर्जदारांना २ बीचके सदनिका घेता येणार आहेत. या योजनाचा ताबा अर्जदारांना डिसेंबर-२०२५ पर्यंत देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत विविध योजनेतील बीड बायपासलगत सातारा परिसर व देवळाई येथील २१ सदनिका व १८ निवासी भूखंडाचा समावेश करण्यात आलेला आहे. अर्जदारांना १५ लाख रुपये किंमतीत सदनिका तसेच ५ लाख रुपये किमतीत भूखंड घेण्याची संधी उपलब्ध आहे.

या जाहिरातीच्या अनुषंगाने अर्जदारांना ३१ ऑगस्ट रोजी रात्री. ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अनामत रक्कमेचा भरणा करुन ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. प्राप्त होणाऱ्या अर्जाची २६ सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे सोडत काढण्यात येणार आहे.

अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता https://housing.mhada.gov.in किंवा https://www.mhada.gov.इन या संकेतस्थळास भेट द्यावी. या सोडतीकरिता मंडळातर्फे हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आलेले असून  अर्ज नोंदणीकरिता – ०२२-६९४६८१००. ऑनलाईन पेमेंट करिता- १८००८९१८२९७, ७०६६०४७२१२, support@easebuzz.in यावर संपर्क साधता येणार आहे. या सोडतीसाठी मंडळाने आपल्या विभागीय कार्यालयात तळमजल्यावर विशेष मदत कक्ष स्थापन केला आहे.

मंडळातर्फे मराठवाडयाच्या विविध जिल्ह्यातील ५२ अनिवासी भूखंड ज्यामध्ये सुविधा भूखंड, रहिवासी भूखंड, सोयीचे दुकाने समावेश करुन जून-२०२५ ई-ऑक्शन (ई-लिलाव) जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांक १ ऑगस्टपर्यंत ११५ अर्जदारांनी अनामत रक्कम भरुन या ई-ऑक्शनमध्ये सहभाग घेतलेला आहे. लवकरच ऑनलाईन पध्दतीने हा लिलाव काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!