महाराष्ट्रात आजही पावसाचा जोर कायम राहणार; मुंबईत मुसळधार, मराठवाडा विदर्भाच्या काही भागात अतिमुसळधार तर काही भागात अतिवृष्टीचा इशारा


मुंबईः वायव्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात वाढलेला पावसाचा जोर आज शनिवारीही (२६ जुलै) कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील पावसाचा जोर आजही काही तासांसाठी कायम राहणार असून कोकणासह मराठवाडा- विदर्भातील काही जिल्ह्यात अतिमुसळधार तर काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

 गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. आजही महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी पुढील चार तास महत्वाचे असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असल्याने रेडअलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्रात उंच लाटा येण्याचाही इशाराही देण्यात आला आहे. समुद्राला आज शनिवारी सर्वात मोठी भरती येणार असून साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे भरतीच्या वेळी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे वीस वर्षांपूर्वी म्हणजेच २६ जुलै २००५ रोजी मुंबईत एका दिवसात ९९४ मिलीमीटर पाऊस झाला होता. पावसाच्या रौद्ररुपामुळे मुंबईकरांची दानादान उडाली होती. आजही २६ जुलै असल्यामुळे मुंबईकरांच्या २० वर्षापूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

वायव्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राने शुक्रवारी सकाळी पश्चिम बंगालजवळील किनारपट्टी ओलांडली. हे कमी दाबाचे क्षेत्र पुढील दोन दिवस ओडिशा, झारखंड व मध्य प्रदेशाकडे वाटचाल करेल आणि कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होईल. त्यामुळे कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात शनिवारी सर्वदूर मुसळधार त अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आज पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा तर रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई आणि ठाणे भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

आज कुठे कसा पाऊस?

अतिमुसळधारः आज शनिवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, गडचिरोली, भंडारा, नागपूर, वर्धा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या भागांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

अतिवृष्टीः पालघर, पुणे घाट परिसर, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून या भागांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.

विजांच्या कडकडाटासह पाऊसः धुळे, नंदूरबार, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर घाट माथा, बीड जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

जोर कधी ओसरणार?

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाचा जोर रविवारनंतर कमी होणार आहे तर कोकण आणि विदर्भातील पावसाचा रोज सोमवारनंतर कमी होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!