
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळाच्या अधिवेशनातच मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल थाला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडीओ शोसल मीडियावर पोस्ट करत ‘कभी जंगली रमी पे आओ ना महाराज म्हणत खोचक टीका केली आहे. भाजपच्या राज्यात काहीच काम नसल्यामुळे कृषी मंत्री पत्ते खेळत आहेत, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत माणिकराव कोकाटे हे मोबाईल फोनवर कोणता तरी तीन पत्त्यांचा गेम खेळताना दिसत आहेत. आ. रोहित पवार यांनी मात्र कोकाटे हे रम्मी खेळत असल्याचा दावा केला आहे. आ. पवार यांनी ‘जंगली रमी पे आओ ना महाराज’ आणि कधी शेतीवर या महाराज, खेळ थांबवा, कर्जमाफी द्या’ असा हॅशटॅग वापरत माणिकराव कोकाटेंवर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे कोकाटेंचा हा गेम खेळतानाचा व्हिडीओ नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनातील असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
हा व्हिडीओ शेअर करत आ. रोहित पवार कोकाटेंवर खोचक टीका केली आहे. ‘सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची ‘कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज’ ही आर्त हाक ऐकू येईल का?, असे आ. रोहित पवार यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही या व्हिडीओवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.’जुगार मटक्याच्या नादी लागलेल्या कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांचे आयुष्य नैसर्गिक असमतोल यामुळे जुगारावर लागल्यासारखं झालं आहे हे कसं कळणार? अजितदादांची अशी कोणती राजकीय अपरिहार्यता आहे की, माणिकराव कोकाटे सारख्या लोकांना त्यांना मंत्रिपदावर ठेवाव लागतं…’ सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही रम्मी मास्टर कृषीमंत्री, ‘शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी’ असे म्हणत या व्हिडीओवरून महायुती सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. ‘विसरा शेती खेळा रम्मी, मिळणार नाही शेतमालाची हमी’ असे आ. आव्हाड यांनी म्हटले आहे.