खुलताबादच्या कोहिनूर महाविद्यालयातील बोगस पदव्यांचे प्रकरण विधान परिषदेतही गाजले, एसआयटीमार्फत चौकशीची मागणी


मुंबईः खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयातील बोगस पदव्यांचे प्रकरण शुक्रवारी विधान परिषदेतही गाजले. छत्रपती संभाजीनगर विभागात बोगस पदव्या तयार करणारे रॅकेट असण्याची शक्यता असल्यामुळे एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याची आणि संस्थेची मान्यता रद्द करण्याची मागणी सदस्यांनी सभागृहात केली. न्यूजटाऊनने या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता.

कोहिनूर शिक्षण संस्थेची सचिव आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान यांनी  पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाची बोगस एम.फिल. पदवी तयार करून त्याआधारे पेट परीक्षेतून सूट मिळवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएच.डी. ला प्रवेश मिळवला. तसेच शेख हाफिज उर रहेमान याने कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या बनावट पदव्या तयार करून कोहिनूर कनिष्ठ महाविद्यालयात सहशिक्षकाची नोकरी मिळवल्याचे प्रकरण न्यूजटाऊनने उघडकीस आणले होते. त्याचे पडसाद शुक्रवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले.

आ. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, चित्रा वाघ, उमा खापरे, डॉ. परिणय फुके व सदाशिव खोत यांनी तारांकित प्रश्नाद्वारे शुक्रवारी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. कोहिनूर महाविद्यालयातील बोगस पदव्यांचे हे प्रकरण समोर आल्यामुळे छत्रपती संभाजीनगर विभागात बोगस पदव्या तयार करणारे रॅकेट असण्याची शक्यता असल्याने एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याची आणि खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयातील गुन्हे दाखल झालेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची तसेच संस्थेची मान्यता रद्द करण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या तारांकित प्रश्नाला लेखी उत्तर दिले. कोहिनूर महाविद्यालयात मोहम्मद हाफिज उर रहेमान मोहम्मद मोईजुद्दीन या सहशिक्षकाची पदवी व पदव्युत्तरची गुणपत्रके तसेच पदव्या बनावट असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षण उपसंचालकांनी त्याची वैयक्तिक मान्यता रद्द केली आहे.  मोहम्मद हाफिर उर रहेमानला कुठलेही शासकीय वेतन अनुदान देण्यात आलेले नाही, असे पाटील म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दोन उमेदवारांनी ( आस्मा खान व मकसूद खान) एम.फिल. च्या आधारे पीएच.डी.साठी प्रवेश घेतला होता. विद्यापीठाकडून या उमेदवारांच्या एम.फिल. पदव्यांची तपासणी केली असता त्या बोगस असल्याचे निदर्शनास आल्याने त्या दोन्ही उमेदवारांचे पीएच.डी.चे प्रवेश रद्द करण्यात आले आहे. त्या दोन्ही उमेदवारांविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!