भारताचा सर्वात महागडा साहित्यिक पुरस्कार ‘जेसीबी प्राइज फॉर लिटरेचर’ बंद, पुरस्कारापोटी देण्यात येत होती तब्बल २५ लाख रुपये रोख रक्कम!


नवी दिल्लीः  भारताचा सर्वात महागडा साहित्यिक पुरस्कार ‘जेसीबी प्राइज फॉर लिटरेचर’ आता बंद करण्यात आला आहे. दरवर्षी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारात २५ लाख रुपये रोख रक्कम देण्यात येत होती. या पुरस्कारात २५ लाख रुपये रोख रक्कम तर मिळत होतीच परंतु हा पुरस्कार भारतीय भाषांतील अनुवादित साहित्याला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर ओळख देणारा एक प्रभावी मंच होता.

शेवटचा ‘जेसीबी प्राइज फॉर लिटरेचर’ हा पुरस्कार २०२४ मध्ये लेखक उपमन्यू चट्टोपाध्याय यांना त्यांच्या ‘लॉरेन्झो सर्चेस फॉर द मिनिंग ऑफ लाइफ’ या पुस्तकासाठी देण्यात आला होता.

पुरस्कार बंद करण्यात आल्याच्या वृत्ताला जेसीबी पुरस्काराच्या लिटरेरी डायरेक्टर मीता कपूर यांनी २१ जून रोजी दुजोरा दिला. परंतु त्यांनी हा पुरस्कार बंद करण्याच्या निर्णयामागे नेमके काय कारण आहे, हे स्पष्ट करण्यास नकार दिला असल्याचे ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

पुरस्कार बंद करण्यात आला आहे. जे स्पष्ट आहे, त्याचा मी इन्कार करणार नाही, असे मीता कपूर म्हणाल्या. परंतु बाकी प्रत्येक बाबीवर त्यांनी ‘नो कमेंट’ एवढेच उत्तर देत पुरस्कार बंद करण्यामागची कारणे सांगण्यास नकार दिला.

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ८(५) अन्वये जारी करण्यात आलेला जेसीबी लिटरेचर फाऊंडेशनचा परवाना रद्द करण्यात आला आहे, अशातच जेसीबी पुरस्कार बंद करण्यात आल्याचे वृत्त धडकले आहे. १२ मार्च रोजी जेसीबी प्राइजच्या वेबसाईटवर जारी करण्यात आलेल्या नोटिशीनुसार फाऊंडेशनने दिल्ली आणि हरियाणाच्या कंपनी रजिस्टारकडे आपला परवाना रद्द करण्यासाठी अर्ज केला होता.

कंपनीला आता आपल्या नावात ‘फाऊंडेशन’ऐवजी ‘प्रायव्हेट लिमिटेड’ असा शब्द जोडावा लागेल, असे या नोटिशीत म्हटले आहे. भारतातील साहित्याच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जेसीबी लिटरेचर फाऊंडेशनच्या वतीने हा साहित्यिक पुरस्कार येत होता.

२०१८ मध्ये स्थापन करण्यात आलेला ‘जेसीबी प्राइज फॉर लिटरेचर’ हा केवळ मोठी रोख रक्कम देणारा पुरस्कारच नव्हता तर तो भारतीय कथा साहित्य विशेषतः अनुवादित रचनांना सन्मानित करणारा एक अग्रणी मंच होता.

आतापर्यंत सातवेळा हा पुरस्कार देण्यात आला. त्यापैकी पाचवेळा या पुरस्काराने अनुवादित साहित्यकृतींना सन्मानित केले आहे.

  • शहनाज हबीब यांनी मल्याळममध्ये अनुवादित केलेल्या बेन्यामीन यांच्या ‘जास्मीन डेज’ या अनुवादित साहित्यकृतीला २०१८ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला.
  • जया श्रीकलातील यांनी मल्याळममध्ये अनुवादित केलेल्या एस. हरिश यांच्या मस्टॅच (Moustache) या साहित्यकृतीला २०२० मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता.
  • फातिमा ई. व्ही. आणि नंदकुमार के. यांनी मल्याळममधून इंग्रजीत अनुवादित केलेल्या ‘दिल्लीः ए सॉलिलॉकी’ या साहित्यकृतीला २०२१ मध्ये हा पुरस्कार जाहीर झाला होता.
  • बारन फारूकी यांनी उर्दूमधून इंग्रजीत अनुवादित केलेल्या खालिद जावेद यांच्या ‘द पॅराडाइज ऑफ फूड’ या साहित्यकृतीला २०२२ मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • जननी कन्नन यांनी तामीळमधून इंग्रजीत अनुवादित केलेल्या पेरूमल मुरूगन यांच्या ‘द फायर बर्ड’ या साहित्यकृतीला २०२३ चा पुरस्कार देण्यात आला होता.

२०१९ मध्ये माधुरी विजय यांच्या ‘द फार फिल्ड’ या साहित्यकृतीला देण्यात आला होता. पेरूमल मुरूगन यांची ‘पूनाची’ साहित्यकृती २०१८ मध्ये आणि ‘ए लोन्ली हार्वेस्ट’ व ‘ट्रायल बाय सायलेन्स’ या साहित्यकृती या पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आली होती. या निर्णयामुळे पेरूमल मुरूगन हे प्रचंड दुःखी झाले आहेत.

ही भारतीय साहित्य विशेषतः भारतीय भाषांसाठी अत्यंत दुःखद बाब आहे. जेसीबी पुरस्काराने भारतीय भाषांचा सन्मान केला आणि अनुवादित साहित्यकृतींना पुरस्कार दिला. हा एक मोठा पुरस्कार होता. लेखकाला २५ लाख रुपये आणि अनुवादकाला १० लाख रुपये मिळत होते. यावरून हा पुरस्कार भारतीय भाषांना महत्व देणारा होता, हे स्पष्ट आहे. मल्याळममधील रचनांना दोन वेळा तर उर्दू आणि तामिळला प्रत्येकी एक वेळा हा पुरस्कार मिळाला, असे मुरूगन म्हणाले.

पेरूमल मुरूगन हे त्यांच्या ‘माधोरु भागन’ या कादंबरीसाठी ओळखले जातात. या कादंबरीचा ‘वन पार्ट वुमन’ या नावाने इंग्रजी अनुवाद करण्यात आला. हिंदीमध्ये या कादंबरीचा ‘नर-नारिश्वर’ या नावाने अनुवाद करण्यात आलेला आहे.

२०२२ चे जेसीबी पुरस्कार विजेते आणि दिल्लीच्या जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठातील उर्दूचे प्राध्यापक खालिद जावेद यांनी हा पुरस्कार बंद करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

‘ही भारतीय लेखन आणि अनुवादाची प्रचंड मोठी हानी आहे. कारण जेसीबी पुरस्कारामुळे एका लेखकाला जी ओळख मिळते ती वैश्विक साहित्यिक क्षेत्रात त्याचे खूप महत्व आहे. अन्यथा भारतीय लेखन आंतरराष्ट्रीयस्तरावर अदृश्यच राहिले असते. भारताचा सामाजिक-राजकीय दृष्टिकोन आणि येथील भाषिक राजकरण लक्षात घेता या निर्णयाचा पुनर्विचार झाला पाहिजे असे माझे मत आहे’, खालिद जावेद यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!