
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी नाटक आणि लोककलांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य कलावंत आणि नाटककार सातत्याने करत आले आहेत, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख आणि सुप्रसिद्ध सिने-पार्श्वगायक, लोककलावंत डॉ.गणेश चंदनशिवे यांनी आज केले.
मराठवाड्याचे भूमिपुत्र तथा मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख आणि सुप्रसिद्ध सिने-पार्श्वगायक, लोककलावंत डॉ.गणेश चंदनशिवे यांना लोककला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘सर्वोत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला आहे. याच अनुषंगाने मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाऊंडेशन, महात्मा गांधी मिशन, अभ्युदय फाऊंडेशन व नागरिकांच्या वतीने डॉ.गणेश चंदनशिवे यांचा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सत्कार सोहळा आज एमजीएमच्या रुक्मिणी सभागृह येथे पार पडला. या सत्काराला उत्तर देताना डॉ. चंदनशिवे बोलत होते.
यावेळी मंचावर एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, ज्येष्ठ अभिनेते प्रा.डॉ.दिलीप घारे, डॉ.दिलीप महालिंगे, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, नीलेश राऊत, डॉ.रेखा शेळके, प्रेरणा दळवी, विजय राऊत, डॉ.शिव कदम आदि मान्यवर उपस्थित होते.
माझा सन्मान जगभर होतो मात्र, आज हा माझ्या मातीतील लोकांनी केलेला सन्मान माझ्यासाठी महत्वपूर्ण असून तो कितीतरी मोठा आहे. आपल्या मायभूमीत आपला गौरव होणे यापेक्षा मोठे काहीही नाही. टेंभुर्णीच्या ग्रामीण रुग्णालयात सफाई कामगार म्हणून सुरू झालेल्या माझ्या प्रवासात अनेक दृश्य आणि अदृश्य माणसांनी माझ्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला असून त्या सर्वांचा मी कायम ऋणी आहे. माझ्या जडणघडणीत माझ्या कुटुंबियांसह शिक्षकांची भूमिकाही अत्यंत महत्वपूर्ण राहिलेली आहे, असे डॉ. चंदनशिवे म्हणाले.
आपली मराठवाड्याची भूमी कलेच्या सर्व क्षेत्रात कुठेही कमी नाही. सर्व कलांमध्ये आपल्या भागातील कलावंत उत्तम आणि प्रतिभासंपन्नतेने काम करत आहेत. डॉ.चंदनशिवे यांना आज सन्मानित करत असताना मनापासून आनंद होत असल्याचे एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम यांनी सांगितले.
गणेशकडे ग्रामीण शहाणपणः गणेशकडे ग्रामीण शहाणपण असून ते त्याच्या विचारांत आणि वागणुकीत सहजपणे जाणवते. कलेच्या क्षेत्रात दुर्मिळ मानली जाणारी विनयशीलता त्याच्यात आहे आणि ती दिखावा न करता नैसर्गिकपणे प्रकट होते. तो यशाच्या शिखरावर पोहोचला असतानाही जमिनीशी नातं बाळगून आहे. त्याला आवाजाची नैसर्गिक देणगी लाभली आहे, असे ज्येष्ठ अभिनेते प्रा.डॉ.दिलीप यावेळी बोलताना म्हणाले.
गणेशला शत्रूच नाहीतः डॉ. गणेश चंदनशिवे यांचा आज होणारा सन्मान हा आमच्यासारख्या शिक्षकांसाठी अभिमानाचा क्षण आहे. कलाक्षेत्रात आपल्याच क्षेत्रातील आपले शत्रू असण्याची शक्यता अधिक असते, मात्र गणेश हा त्याला अपवाद आहे. त्याला शत्रूच नाहीत. येणारा काळ कलावंतांसाठी निर्णायक असून अशावेळी गणेशने नवोदित कलाकारांना घडवून त्यांच्यासाठी आधारवड व्हावे, असे डॉ.दिलीप महालिंगे यांनी सांगितले.
सत्कार सोहळ्यानंतर डॉ.चंदनशिवे यांचे विशेष कला सादरीकरण झाले. या सादरीकरणाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश राऊत यांनी केले. सन्मानपत्र वाचन श्रीकांत देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिव कदम यांनी केले तर आभार महेश अचिंतलवार यांनी मानले.

