
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मझहर खान आणि सचिव आस्मा खान यांनी एम.ए. हिंदी पाठ्यक्रमाचे पेपर दुसऱ्यांकडूनच सोडवून घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून (वायसीएमओयू) कारवाईत अक्षम्य हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गुन्हा घडला त्या ठिकाणी म्हणजेच खुलताबाद पोलिस ठाण्यात फिर्याद न देता छत्रपती संभाजीनगरातील छावणी पोलिस ठाण्यात एक साधे पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात अद्यापही एफआयआर होऊ शकला तर नाहीच शिवाय या प्रकरणातील आरोपींना हेतुतः मदत करण्यात येत असल्यासारखी स्थिती आहे.
खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र व परीक्षा केंद्र आहे. या परीक्षा केंद्रावर जानेवारी महिन्यात झालेल्या एम. ए. हिंदी पाठ्यक्रमाच्या प्रथम सत्राच्या परीक्षेत कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मझहर खान व सचिव आस्मा खान यांनी आपल्याच महाविद्यालयातील कर्मचारी फेरोज शेख आणि बाळू भोपळे यांच्याकडून सर्वच्या सर्व पेपर लिहून घेऊन विद्यापीठाची फसवणूक केली.
परीक्षेशी संबंधित असलेल्या या अत्यंत संवेदनशील प्रकरणात कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी सत्यशोधन समिती स्थापन केली. या समितीच्या सत्यशोधनात डॉ. मझहर खान व आस्मा खान, फेरोज शेख, बाळू भोपळे आणि त्यांना मदत करणारे शेख बादशहा आणि परीक्षा प्रमुख शेख लईख हे दोषी असल्याचे निष्पन्न झाले. सत्यशोधन समितीने आपला अहवाल कुलगुरू डॉ. सोनवणे यांच्याकडे सोपवून २३ दिवस उलटले तरी याप्रकरणातील दोषींविरुद्ध अद्याप कायदेशीर कारवाई करण्यात आली नसल्याचे वृत्त न्यूजटाऊनने ३१ मे रोजी प्रसिद्ध केले.
न्यूजटाऊनच्या वृत्तानंतर मुक्त विद्यापीठाचे प्रशासन हालले आणि कुलसचिव दिपील भरड यांनी छावणी पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नावे २ जून रोजी एक पत्र आवक विभागात दाखल केले. हे पत्र म्हणजे फिर्याद नव्हती तर सत्यशोधन समितीने कोणत्या शिफारशी केल्या आणि एफआयर नोंदवण्यासाठी सहायक कक्ष अधिकारी सतीश बोरसे यांना विद्यापीठातर्फे प्राधिकृत करण्यात आल्याची माहिती देणारे साधे पत्र होते.
या पत्रासोबतच खरे तर मुक्त विद्यापीठाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने कायदेशीर फिर्याद नोंदवणे आवश्यक होते. त्याशिवाय कुठलाही एफआयआर दाखल होणार नाही, हे माहीत असूनही मुक्त विद्यापीठाकडून या पत्रासोबत किंवा पत्र दिल्याच्या किमान दुसऱ्या दिवशीही फिर्यादच देण्यात आली नाही. परिणामी या प्रकरणात चार दिवस उलटले तरी कोणताही एफआयआर होऊ शकला नाही.
हा ‘मदतीचा हात’ कोणाचा?
कोणत्याही प्रकरणात ज्या ठिकाणी गुन्हा घडला, ते ठिकाण ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते तेथेच कायदेशीर फिर्याद नोंदवणे आवश्यक असते. हे माहीत असूनही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव आणि छत्रपती संभाजीनगर विभागीय केंद्राचे प्रभारी संचालक दिलीप भरड यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याची माहिती देणारे पत्र खुलताबाद पोलिस ठाण्याला न देता छावणी पोलिस ठाण्यात दिले.
हा गुन्हाच छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेला नसल्यामुळे एक तर हे पत्र आम्हाला खुलताबाद पोलिस ठाण्याला वर्ग करावे लागेल किंवा तुम्हाला थेट खुलताबाद पोलिस ठाण्यात जाऊन प्राधिकाऱ्याची माहिती देणारे पत्र आणि फिर्याद द्यावी लागेल, असे छावणी पोलिस ठाण्याकडून कळवण्यात आल्यावर आता उद्या खुलताबाद पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात येणार असल्याचे समजते.
परंतु विद्यापीठाने घातलेल्या या घोळात चार दिवस निघून गेले. काही वृत्तपत्रात या संबंधीच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्यामुळे या प्रकरणातील आरोपी सावध झाले. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मिळवण्याच्या हालचाली करण्यासाठी आणि अटक टाळण्यासाठी फरार होण्यासाठीही बऱ्यापैकी वेळ मिळाला आहे. त्यामुळे विद्यापीठाने हा घोळ कशासाठी घातला? असा सवाल उपस्थित होत असून आता कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे हे या कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करणार का?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

