
मुंबईः राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने म्हणजेच सीईटी सेलने २८ सत्रात घेतलेल्या पीसीबी आणि पीसीएम गटाच्या एमएचटी-सीईटी परीक्षेत ३९ प्रश्न चुकीचे असल्याचे समोर आले असून या प्रत्येक चुकीसाठी परीक्षार्थ्यांना एक अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय झाला आहे.
२८ सत्रांमध्ये घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटीमध्ये ३९ प्रश्न चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात सर्वाधिक २८ चुका गणिताच्या प्रश्नपत्रिकेत झाल्या आहेत. भौतिकशास्त्र विषयाचे ७, रसायनशास्त्र विषयाचे ४ आणि जीवशास्त्र विषयाचा एक प्रश्न चुकीचा होता. प्रत्येक सत्रात चुकलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी विद्यार्थ्यांना एक गुण अतिरिक्त मिळणार आहे. २३ एप्रिल रोजी सायंकाळच्या आणि २५ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक ४ अतिरिक्त गुण मिळणार आहेत.
सीईटी सेलने ९ ते १७ एप्रिल या कालावधीत भौतिकशास्त्र-रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) गटासाठी आणि १९ ते २७ एप्रिल या कालावधीत भौतिकशास्त्र-रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) गटासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा घेतली होती. यातील एका दिवशीच्या एका सत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने त्या सत्राची पुनर्परीक्षा ५ मे रोजी घेण्यात आली होती. २८ सत्रात घेण्यात आलेल्या या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या संकेतस्थळावर आक्षेप नोंदवण्याची संधी देण्यात आली होती. त्यात १ हजार ४१४ आक्षेप नोंदवण्यात आले. सर्वाधिक ८७२ आक्षेप गणित विषयावर नोंदवण्यात आले.
निकाल कधी?
सीईटी सेलने एमएचटी-सीईटीसह इतर पाच अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकालाच्या तात्पुरत्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार एमएचटी-सीईटीच्या पीसीएम आणि पीसीबी गटाच्या सीईटीचा निकाल १६ जून रोजी घोषित होणे अपेक्षित आहे. उर्वरित अभ्यासक्रमांच्या सीईटीचे निकाल ४ ते १७ जूनदरम्यान जाहीर केले जाणार आहेत.

