मोसमी पावसाची गती मंदावली, सहा दिवसांपासून मोसमी वाऱ्याचा एकाच जागी मुक्काम; तरीही राज्यात यंदा धुव्वाधार बरसणार


मुंबईः राज्यात मोसमी पावसाचे आगमन अपेक्षापेक्षा लवकर झाले असले तरी सध्या मोसमी पावसाची गती मंदावली आहे. गेल्या सहा दिवसांपासून मोसमी वारे एकाच जागी स्थिरावले आहेत. त्यामुळे मोसमी पावसाचा पुढचा प्रवास मंदावला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

यावर्षी मोसमी वारे वेगाने वाटचाल करत केरळबरोबरच महाराष्ट्रात अपेक्षित वेळेच्या आधीच दाखल झाले. अपेक्षेपेक्षा लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने सुरूवातीला राज्यात दमदार हजेरी लावली. त्यानंतर २८ मेपासून मोसमी वाऱ्यांची वाटचाल खोळंबल्यामुळे मोसमी पावसाची गती मंदावली आहे.

२८ मे रोजी मोसमी वाऱ्यांनी मुंबई, नांदेड, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांपर्यंत मजल मारली होती. परंतु त्यानंतर अरबी समुद्रातून प्रवाह कमी झाल्यामुळे मोसमी वाऱ्यांची वाटचाल थांबली परिणामी राज्यात मोसमी पावसाचा प्रवाहही मंदावला आहे. मोसमी वाऱ्यांची सीमा आजही मुंबई अहिल्यानगर, आदिलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट भागात होती.

राज्यात यंदा धुव्वाधार कोसळणार

मोसमी पावसाची गती सध्या मंदावलेली असली तरी यंदा राज्यात धुव्वाधार पाऊस कोळण्याचा अंदाज आहे. राज्यात यंदा सरासरीच्य १०६ टक्के पाऊस होईल, जुलै महिन्यात राज्यात पावसाचे प्रमाण जास्त राहील, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागा सर्वाधिक ११५ टक्के पाऊस होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.

जून, जुलै महिन्यात धुळे, राहुरी, परभणी, निफाड, अकोला, पाडेगाव आणि कोल्हापुरात पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. दापोली, पुणे, नागपूर, सोलापूर, जळगाव व कराड येथे पावसाच्या खंडाचा कालावधी कमी राहील, असेही डॉ. साबळे म्हणाले.

प्रमाणापेक्षा जास्त पाऊस होत असल्यामुळे पीक उत्पादनावर विपरित परिणाम होत आहे. हवामान बदलामुळे खंडात्मक पर्जन्यमानात मोठे बदल होत आहेत. काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी कमी पाऊस असा मान्सून असल्यामुळे शेतकऱ्यांनी पीर पेरणी पद्धतीत बदल करावा, असे डॉ. साबळे म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!