
मुंबई: इयत्ता ११ वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थ्यांना आता ५ जून रोजी दुपारी २ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. इनहाऊस कोट्यातील जागा भरण्याबाबत करण्यात आलेल्या बदलामुळे ही मुदतवाढ देण्यात आल्याचे शालेय शिक्षण विभागाने कळवले आहे.
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ११ वीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थी नोंदणीसाठी दिनांक २६ मे ते ३ जून हा कालावधी देण्यात आला होता. ६ मेच्या शासन निर्णयातील तरतुदीबाबत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये महाविद्यालयातील इन-हाऊस कोट्यातील जागा भरण्यासाठी आवश्यक बदलाबाबत शासनाने ३१ मे रोजीच्या पत्रान्वये आदेश दिले असल्याने आता या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी ५ जून रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे प्रभारी शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ.श्रीराम पानझाडे यांनी कळवले आहे.
या पत्रानुसार इन-हाऊस कोट्याअंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा आरक्षित असतील. मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय/ वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांच्या शाळाकरीता एक युनिट ग्राह्य धरण्यात येत आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांकरीता त्याच संस्थेची शाळा व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय/ वरिष्ठ महाविद्यालय यासाठी महसुली जिल्ह्यांमध्ये एक यूनिट इन-हाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरण्यात येत आहे.
या बदलाच्या अनुषंगाने संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांच्या संस्थांच्या शाळांचा बदल करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाने केलेल्या बदलाच्या अनुषंगाने इन-हाऊस कोटामधील पसंतीक्रम आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना तसेच पालक/ विद्यार्थी यांना पुरेसा वेळ मिळावा यास्तव विद्यार्थी नोंदणी अंतिम दिनांक ३ जून ऐवजी सुधारित मुदतवाढीसह आता ५ जून रोजी दुपारी २ पर्यंत करण्यात आली आहे.
इयत्ता ११ वी प्रवेशाकरीता इच्छुक विद्यार्थी/ पालक यांनी विद्यार्थी नोंदणी https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यापुढील वेळापत्रक यापूर्वी प्रकाशित केल्याप्रमाणे राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
२ जूनपर्यंत १० लाख ८५ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी २ जून रोजी सायंकाळपर्यंत एकूण १० लाख ८५ हजार ८५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून पुणे विभागात १ लाख ८७ हजार ९२५, मुंबई विभागात २ लाख ६५ हजार ९००, कोल्हापूर विभागात १ लाख ७ हजार १२, छत्रपती संभाजीनगर विभागात १ लाख ४०, नाशिक विभागात १ लाख १२ हजार १०८, नागपूर विभागात ९५ हजार २१०, अमरावती विभागात ९८ हजार ३५९, लातूर विभागात ५८ हजार ५८६, आणि इतर ६१ हजार ७१२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती डॉ.पानझाडे यांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी ई-मेल आयडी – support@mahafyjcadmissions.in अथवा हेल्पलाईन क्रमांक 8530955564 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
