चोराच्या हाती चाव्याः परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी दोषी प्रा. मधुकर चाटसे अवैधरित्या समाजशास्त्र अभ्यास मंडळावर!


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद):  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेच्या कामात दोषी ठरवून शिक्षा ठोठावण्यात आलेले वाळूजच्या राजर्षी शाहू कला व विज्ञान महाविद्यालयातील प्रा. डॉ. मधुकर चाटसे हे समाजशास्त्राच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवडून गेले आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियमाच्या कलम ६४ नुसार प्रा. डॉ. चाटसे हे विद्यापीठाच्या कोणत्याही अधिकार मंडळाचे सदस्य होण्यास अपात्र असतानाही कुलगुरू डॉ.  प्रमोद येवले यांनी त्यांना समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्यत्व सन्मानाने बहाल केले आहे. प्रा. डॉ. चाटसे हे भाजप-आरएसएसप्रणीत विद्यापीठ विकास मंचचे सदस्य असल्यामुळे कुलगुरू त्यांना अभय देत आहेत की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

ऑक्टोबर/नोव्हेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी गंगापूर तालुक्यातील वाळूजच्या राजर्षी शाहू कला व विज्ञान महाविद्यालयात परीक्षा केंद्र देण्यात आले होते. या केंद्रावर बी.ए. अभ्यासक्रमाच्या परीक्षा चालू असताना याच महाविद्यालयातील समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. मधुकर चाटसे यांनी त्यांची पत्नी सीमा मारोती सोनाले या बी.ए. तृतीय वर्षाची लेखी परीक्षा देत असताना परीक्षेचे काम स्वीकारले आणि त्यांनी हे काम केले.

डॉ. मधुकर चाटसे यांनी परीक्षा नियमांचा भंग केल्यामुळे हे प्रकरण महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ च्या कलम ४८(५)(क) नुसार समितीकडे वर्ग करण्यात आले होते. या समितीने कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे अहवाल सादर केल्यानंतर कुलगुरूंनी समितीच्या शिफारशी स्वीकारल्या आणि डॉ. चाटसे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पेपर सेटर, भरारी पथक, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन व परीक्षेशी संबंधित कामे २०२२-२३ आणि २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात देण्यात येबू नये, असा आदेश ९ फेब्रुवारी २०२३ रोजी जारी केला.

प्रा. डॉ. मधुकर चाटसे यांना परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी दोषी ठरवून शिक्षा ठोठावलेला हाच तो विद्यापीठाचा आदेश.

…तरीही उमेदवारी अर्ज वैध कसा?

परीक्षेच्या कामात गैरप्रकार केल्याप्रकरणी दोषी ठरवून शिक्षा ठोठावण्यात आल्यामुळे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ च्या कलम ६४ मधील तरतुदीनुसार प्रा. डॉ. चाटसे हे विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकरणाचे किंवा मंडळाचे सदस्य होण्यास पात्र ठरत नाहीत. तरीही विद्यापीठ प्रशासन आणि कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी प्रा. चाटसे यांचा समाजशास्त्र अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद ठरवला नाही. त्यामुळे ते या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवडून गेले.

प्रा. डॉ. चाटसे यांना परीक्षेच्या कामात गैरप्रकार केल्याप्रकरणी आपणच दोषी ठरवले आणि दोन वर्षे परीक्षेच्या कामकाजातून बाद ठरवण्याची शिक्षा ठोठावली, हे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना चांगलेच माहीत आहे. तरीही प्रा. डॉ. चाटसे हे भाजप-आरएसएस प्रणीत विद्यापीठ विकास मंचशी संबंधित असल्यामुळे त्यांच्यावर खास ‘रेशीम मर्जी’ दाखवण्यात आली आणि डॉ. चाटसे यांचा समाजशास्त्र अभ्यास मंडळाच्या निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला. म्हणूनच डॉ. चाटसे हे या अभ्यास मंडळाचे सदस्य होऊ शकले.

प्रा. डॉ. चाटसे यांची समाजशास्त्र अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी निवड म्हणजेच चोराच्या हाती चाव्या देण्यातलाच प्रकार आहे. परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी दोषी ठरवून शिक्षा ठोठावलेले डॉ. चाटसेच आता या मंडळाचे सदस्य म्हणून समाजशास्त्र विषयाचे पेपर सेटर, परीक्षक, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यासाठीचे शिक्षक, भरारी पथकातील सदस्य आदी बाबींचे निर्णय घेतील. अशा स्थितीत त्यांच्याकडून कोणत्या पारदर्शक कामकाजाची अपेक्षा केली जाणार आहे

कुलगुरू महोदय, या वाचा कायद्यातील तरतुदी

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ च्या कलम ६४ मध्ये प्राधिकरणाच्या सदस्यत्वासाठी निरर्हता स्पष्ट करण्यात आली आहे. या कलमातील (ग) मध्ये ज्यात नैतिक अधःपतनाचा अंतर्भाव असेल अशा कोणत्याही अपराधाबद्दल जी दोषी ठरली असेल किंवा

(ड) मधील तरतुदींनुसार कोणत्याही परीक्षा घेताना व मूल्यमापन करताना, कोणत्याही प्रकारे व कोठेही अनुचित व्यवहार केल्याबद्दल किंवा त्याला चालना दिल्याबद्दल जिला शिक्षा झालेली असेल किंवा

 (च) तिने या  अधिनियमाच्या, परिनियमांच्या किंवा आदेशांच्या तरतुदींचे पालन करण्याचे जाणीवपूर्वक टाळले असेल किंवा नकार दिला असेल किंवा विद्यापीठाच्या हिताकरिता हानीकारक असेल अशी कोणतीही कृती केली असेल किंवा

(छ) तिला गैरव्यवहार केल्याबद्दल सक्षम प्रधिकाऱ्याकडून कोणत्याही प्रकारची शिक्षा झालेली असेल अशी व्यक्ती विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकार मंडळाची सदस्य असण्यास पात्र ठरणार नाही, असे यात म्हटले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ मधील निरर्हतेसंबंधीच्या याच त्या तरतुदी.

आता तरी अपात्रतेची कारवाई करणार का?

या कलमातील पोटकलम (ग), (ड), (च) आणि (छ) नुसार प्रा. डॉ. चाटसे हे समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत राहण्यास अपात्र ठरतात. कुलगुरूंनीच ठोठावलेल्या शिक्षेनुसार २०२२-२३ हे शैक्षणिक वर्ष संपत आलेले आहे आणि २०२३-२४ हे शैक्षणिक वर्ष अद्याप सुरू व्हायचे आहे. त्यामुळे प्रा. डॉ. चाटसे यांना ठोठावलेल्या शिक्षेचा कालावधी पूर्ण व्हायला अद्याप तब्बल वर्षभर बाकी आहे.

तरीही प्रा. डॉ. चाटसे यांच्यावर अपात्रतेची कारवाई का करण्यात आली नाही? भाजप-आरएसएसशी संबंधित व्यक्ती असल्यामुळेच प्रा. डॉ. चाटसे यांना अभय दिले जात आहे का? हे प्रश्न अनुत्तरीत असून कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे आता तरी प्रा. डॉ. मधुकर चाटसे यांचे समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्यत्व रद्द करणार का? हा खरा प्रश्न आहे.

…तरीही चाटसे प्रभारी प्राचार्य कसे?

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियमातील तरतुदींच्या छाताडावर पाय ठेवून समाजशास्त्र अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवडून गेलेले प्रा. डॉ. मधुकर चाटसे हे सध्या वाळूजच्या राजर्षी शाहू कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्यही आहेत. परीक्षेच्या कामात दोषी ठरवून शिक्षा ठोठावण्यात आलेली असल्यामुळे कायदेशीर तरतुदींनुसार प्रा. डॉ. चाटसे हे प्रभारी प्राचार्य म्हणूनही कामकाज पाहू शकत नाहीत. तरीही त्यांच्याकडे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पद देण्यात आले आणि ते विद्यापीठाने मान्यही केले. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियमाची पायमल्ली करून हा सगळा प्रकार चालू आहे. पारदर्शक कारभाराची व्दाही देणारे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे सगळे खपवून कसे घेतात? हाही खरा प्रश्न आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!