मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या वावड्या गेल्या काही दिवसांपासून माध्यमातून पेरल्या जात आहेत. त्यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्याही काही माध्यमातून चालवल्या जात आहेत. त्यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले असून या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणार आणि अजित पवार राष्ट्रवादीचे काही आमदार घेऊन भाजपसोबत जाणार आहेत. त्याबाबत चर्चा करण्यासाठीच अजित पवारांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्याही काही माध्यमातून चालवल्या जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नाही, असे चित्र रंगवण्याचा प्रयत्न काही माध्यमांकडून केला जात आहे. आता अजित पवार यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
अजित पवारांचा फोन बंद आहे. त्यांच्याशी संपर्क होत नाही, अशाही बातम्या चालवल्या गेल्या आहेत. या सर्वच घडामोडींबाबत अजित पवार ट्विट करून स्पष्टीकरण दिले आहे.
खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या वेळी झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबीयांना आणि उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्री सदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी एमजीएम हॉस्पीटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या मंगळवारी १८ एप्रिल रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत. त्या पूर्णतः असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली नाही, याची नोंद घ्यावी, असे ट्विट अजित पवार यांनी केले आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून माध्यमांतून केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता असून अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार सोबत घेऊन भाजपसोबत जाणार असल्याची चर्चाही केली जात आहे. अजित पवार वेगळा विचार करण्याच्या तयारीत असल्याचेही सांगितले जात आहे. ‘विविध सूत्रांचा’ हवाला देऊन या बातम्या पेरल्या जात असून महाविकास आघाडीची एकसंध ‘वज्रमूठ’ फोडण्याचाच या बातम्या पेरण्यामागचा हेतू असल्याचेही स्पष्ट होऊ लागले आहे. आता अजित पवारांनी स्पष्टीकरण दिल्यामुळे या बातम्यांतील फोलपणा दिसू लागला आहे.